National Sikh Day: १४ एप्रिल हा दिवस राष्ट्रीय शीख दिन म्हणून घोषित केला जावा, अमेरिकेत खासदारांची मागणी

अमेरिकेचे खासदार राजा कृष्णमूर्ती यांच्यासहीत १२ हून अधिक खासदारांनी अमेरिकेत १४ एप्रिल हा दिवस राष्ट्रीय शीख दिन म्हणून घोषित केला जावा अशी मागणी केली आहे. यांचसंबंधी या खासदारांकडून एक प्रस्तावही सादर करण्यात आला आहे. संबंधित प्रस्तावात अमेरिकेच्या विकासात शीख समुदायाच्या महत्त्वपूर्ण योगदानाला अधोरेखित करतानाच या समुदायाच्या भूमिकेप्रती सन्मान प्रदर्शित करण्यासाठी राष्ट्रीय शीख दिनाची घोषणा करण्याचं समर्थन करण्यात आलंय.

२८ मार्च रोजी सभागृहात मांडण्यात आलेल्या प्रस्तावाच्या प्रवर्तक खासदार मेरी गेल सॅनलोन आहेत. तर कॅरेन बास, पॉल टोन्को, ब्रायन के फिट्झपॅट्रिक, डॅनियल म्यूज, एरिक स्वालवेल, राजा कृष्णमूर्ती, डोनाल्ड नॉरक्रॉस, अँडी किम, जॉन गारामेंडी, रिचर्ड ई नील, ब्रेंडन एफ बॉयल आणि डेव्हिड जी वालाडाओ हे त्याचे सह-प्रस्तावक आहेत. मात्र, AGPC यांच्याकडून या प्रस्तावाचं स्वागत करण्यात आलं आहे.

अमेरिकेत शीख समुदायाविरूद्ध धार्मिक भेदभाव वाढला

काही दिवसांपूर्वी प्रख्यात मानवाधिकार तज्ज्ञ अमृत कौर आकरे यांनी अमेरिकेच्या खासदारांना सांगितले की, अमेरिकेत शीख समुदायाविरुद्ध धार्मिक भेदभाव आणि द्वेषपूर्ण गुन्हे वाढले आहेत. त्यांनी प्रशासन आणि अमेरिकन काँग्रेसकडून ते संपवण्यासाठी पावलं उचलण्याची विनंती केली आहे. सरकारी धोरण आणि कायद्यांचे पक्षपाती स्पष्टीकरण शीखांना सार्वजनिक आणि खाजगी क्षेत्रातील नोकऱ्यांमध्ये नुकसान पोहोचवते. ज्यामध्ये वाहतूक, मनोरंजन, आरोग्य सेवा, सैन्य आणि कायद्याची अंमलबजावणी यांचा देखील समावेश असल्याचं त्यांनी म्हटलं आहे.


हेही वाचा : Mumbai Crime : धक्कादायक! लग्नाला नकार दिल्याने प्रेयसीवर चाकूने हल्ला