तात्काळ इराक सोडून परत या!

अमेरिकाचे आपल्या नागरिकांना आदेश

कासिम सुलेमानीच्या मृत्यूनंतर बगदादमधील अमेरिकन दूतावासाने आपल्या नागरिकांना तात्काळ इराक सोडण्याचे आदेश दिले आहेत. कासिम सुलेमानी इराकचा टॉप कमांडर होता. नागरिकांनी हवाई मार्गेने किंवा ते शक्य नसल्यास रस्ते मार्गाने दुसर्‍या देशात पोहोचावे,असे अमेरिकन दूतावासाने म्हटले आहे. सुलेमानीच्या मृत्यूनंतर काही तासांनी अमेरिकन दूतावासाने हे स्टेटमेंट जारी केले आहे. इराणचे राष्ट्राध्यक्ष हसन रुहानी यांनी थेट अमेरिकेला धमकी दिली आहे. हा अत्यंत गंभीर गुन्हा असून बदला घेण्याचा त्यांनी इशारा दिला आहे.

अमेरिकेमध्ये डोनाल्ड ट्रम्प यांच्याविरोधात महाभियोग सुरु आहे तसेच यावर्षी २०२० मध्ये अमेरिकेत राष्ट्राध्यक्षीय निवडणूक आहे. महाभियोग आणि निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आपण सक्षम, मजबूत आणि निर्णय घेण्याची धडाडी असलेला नेता आहोत, हा संदेश देण्यासाठी ट्रम्प यांनी इतके आक्रमक पाऊल उचलले असावे, असा राजकीय निरीक्षकांचा अंदाज आहे.
अमेरिका आणि इराणमध्ये युद्ध झाल्यास फक्त ऊर्जा पुरवठ्यावरच परिणाम होणार नाही तर, आखातामध्ये राहणार्‍या भारतीयांनाही त्याचा फटका बसेल. सुलेमानी यांच्या मृत्यूनंतर तेलाच्या किंमती आधीच चार टक्क्यांनी वाढल्या आहेत. युद्ध भडकल्यास पश्चिम आशियामध्ये वास्तव्याला असलेल्या ८० लाख भारतीयांच्या भवितव्यावर त्याचा परिणाम होईल. एकट्या सौदी अरेबियामध्ये तीस लाख भारतीय राहतात. यापूर्वी या भागात झालेल्या युद्धाचा तिथे राहणार्‍या भारतीयांसह अनेक परदेशी नागरिकांवर परिणाम झाला होता.

भारताची प्रमुख चिंता
भारतासाठी चिंतेची बाब म्हणजे, पश्चिम आशियात राहणारे भारतीय तिथून मोठ्या प्रमाणावर पैसा पाठवतात. ही रक्कम अब्जावधीच्या घरात आहे. भारतीय अर्थव्यवस्था सध्या अडचणींचा सामना करत असताना दुसर्‍या देशाच्या युद्धामुळे बसणारा फटकाही परवडणारा नाही.