नवी दिल्ली : आंतरराष्ट्रीय राजकारणात अनेकदा अमेरिका आणि चीन काही निर्णयांवरून अनकेदा आमनेसामने आले आहेत. यंदाही अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी कॅनडा, ब्राझील आणि चीनमधून येणाऱ्या वस्तूंवर टॅरिफ म्हणजेच आयातशुल्क लादले आहे. यावर आता चीनकडूनदेखील कडक शब्दात प्रत्युत्तर देण्यात आले आहे. गेल्या अनेक काळापासून अमेरिकेत या निर्णयाची चर्चा सुरू होती. पण, सोमवारी (3 फेब्रुवारी) मध्यरात्रीपासून हा निर्णय अंमलात आणला. “मेक्सिको आणि कॅनडामधील वस्तूंवर कोणत्याही विलंबाशिवाय 25 टक्के आयातशुल्क वसुलीला 4 फेब्रुवारीपासून सुरुवात होईल,’ असे स्वतः राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी जाहीर केले. (US vs China and Trump Tariffs Trade War)
हेही वाचा : Rahul Gandhi : सावरकरांवरील ते विधान राहुल गांधींना भोवण्याची शक्यता, कोर्टाने दिले हे आदेश
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी जाहीर केलेल्या या निर्णयानंतर आता चीनदेखील आक्रमक झाला आहे. “तुम्हाला व्यापार युद्ध छेडायचे असेल तर ते शेवटपर्यंत लढण्यासाठी आम्ही तयार आहोत,” अशा शब्दात चीनने उत्तर दिले आहे. चीनच्या परराष्ट्र मंत्र्यांच्या प्रवक्त्यांनी ट्विट केले की, “जर अमेरिकेला टॅरिफ वाढवून व्यापार युद्ध किंवा इतर कोणत्या प्रकारचे युद्ध छेडायचे असेल तर आम्ही शेवटपर्यंत ते युद्ध छेडण्यासाठी तयार आहोत.” असे आव्हान दिले आहे. दरम्यान, चीनच्या वस्तूंवर फेब्रुवारी महिन्यात अमेरिकेकडून 10 टक्के कर लागू करण्यात आला होता. तोच कर 4 मार्चपासून 20 टक्के इतका झाला आहे. पण याचे प्रत्युत्तर म्हणून चीननेदेखील विविध प्रकारच्या अमेरिकी उत्पादनावर 15 टक्के आयातशुल्क लादण्याचे जाहीर केले आहे.
नेमकं वादाचे कारण काय?
अमेरिकेमध्ये ‘फेन्टानिल’ या अंमली पदार्थाची तस्करी केली जाते. यावर ट्रम्प सरकारने म्हटले की, ही रसायने चीनमधून येतात आणि मेक्सिकन टोळ्या बेकायदेशीरपणे त्याचा पुरवठा अमेरिकेत करतात. तसेच, कॅनडामध्ये फेन्टानिलच्या प्रयोगशाळा असल्याचा दावा त्यांनी केला आहे. या अंमली पदार्थाच्या अतिसेवनामुळे अमेरिकेत दरवर्षी हजारो लोकांचा मृत्यू होतो. तर याला उत्तर देत चीनच्या प्रशासनाने अमेरिकेवरच निशाणा साधला आहे. ते म्हणाले की, “फेन्टानिलचे संकट हे अमेरिकेचेच पाप आहे. आमच्या प्रयत्नांना सहकार्य करण्याऐवजी अमेरिकेने आमच्यावरच दोषारोप लावले. आयातशुल्क वाढवून चीनवर दबाव टाकण्याचा तसेच ब्लॅकमेल करण्याचा प्रयत्न केला जात आहे. आम्ही त्यांची मदत केली म्हणून आम्हाला ही शिक्षा दिली जात आहे का?” असा सवाल त्यांनी केला आहे. तसेच, ‘आयातशुल्क वैगरे वाढवून चीनला धमकावता येणार नाही. जर फेन्टानिलची समस्या सोडवायची असेल तर तुम्हाला राष्ट्रांना समान वागणूक द्यावी लागेल’ असा सल्ला चीनने अमेरिकेला दिला आहे. तर, ‘अमेरिकेच्या धमक्यांना आम्ही भिक घालत नाही. दबाव टाकणे किंवा धमकावणे हा चीनशी व्यवहार करण्याचा योग्य मार्ग ठरणार नाही,” असे म्हटले आहे.