हेरगिरीच्या आरोपावरून अमेरिका-रशियामधील तणाव वाढण्याची शक्यता

अमेरिकेचे एका ड्रोन रशियाने पाडल्यानंतर आता या दोन्ही देशांमध्ये तणाव वाढण्याची शक्यता निर्माण झाली आहे. तर क्राइमियाच्या किनाऱ्यावर अमेरिकेने ड्रोन उडवणे हे चुकीचे असल्याचे रशियाकडून सांगण्यात आले आहे. जर का अमेरिकेने अशा पद्धतीने चिथावणी दिली तर त्याचे परिणाम भोगावे लागतील, असा इशारा रशियाकडून देण्यात आला आहे.

USA-Russia tensions likely to escalate over espionage allegations

अमेरिकेचे ड्रोन रशियाच्या युद्धविमानाने पाडल्यानंतर दोन्ही देशांमधील तणाव वाढला आहे. बुधवारी या मुद्द्यावर रशियाचे संरक्षण मंत्री आणि अमेरिकेचे संरक्षण मंत्री यांच्यात फोनवर चर्चा झाली. मिळालेल्या माहितीनुसार, या चर्चेदरम्यान रशियाचे संरक्षण मंत्री म्हणाले की, रशियाची अमेरिकेकडून हेरगिरी केली जात आहे, त्यामुळे ड्रोनची घटना घडली. मंगळवारी काळ्या समुद्रावर रशियाने अमेरिकेचे ड्रोन पाडल्याचा आरोप करण्यात आला होता. ज्यानंतर या दोन्ही देशांमधील तणाव वाढला आहे.

रशियाचे संरक्षण मंत्री सर्गेई सोइगु यांनी बुधवारी अमेरिकेचे संरक्षण मंत्री लॉयड ऑस्टिन यांच्याशी फोनवरून चर्चा केली. यादरम्यान रशियाचे संरक्षण मंत्री म्हणाले की, भविष्यात अमेरिकेने चिथावणी दिली तर रशियाही त्याला योग्य उत्तर देईल. रशियाच्या संरक्षण मंत्रालयाने म्हटले आहे की, क्राइमियाच्या किनार्‍यावरून अमेरिकेचे धोरणात्मक ड्रोन उड्डाण करणे हे चिथावणी देणारे कृत्य आहे. त्यामुळे काळ्या समुद्राच्या प्रदेशात दोन्ही देशांमध्ये युद्धाची परिस्थिती निर्माण होऊ शकते. रशियाला आता अशी कोणतीही कारवाई करायची नाही पण हे असेच चालू राहिले तर त्याला त्याच प्रमाणे प्रत्युत्तर दिले जाईल. या मुद्द्यावर रशियाचे आर्मी चीफ व्हॅलेरी गेरासिमोव्ह आणि अमेरिकन आर्मी चीफ मार्क मायली यांच्यातही चर्चा झाली असल्याचे सांगण्यात आले आहे.

दरम्यान, नुकतेच अमेरिकेचे लष्कराचे टोही ड्रोन रीपर हे काळ्या समुद्राच्यावर उडत होते. ज्याची रशियन फायटर प्लेन SU-27 शी टक्कर झाली. टक्कर झाल्यानंतर अमेरिकेचे हे ड्रोन काळ्या समुद्रात पडले. रशियाने हे लष्करी ड्रोन पाडल्याबद्दल अमेरिकेकडून तीव्र नाराजी व्यक्त करण्यात आली. या घटनेविषयी रशियाच्या राजदूतांकडे नाराजी देखील व्यक्त करण्यात आली. रशियातील अमेरिकेच्या राजदूतानेही यावर नाराजी व्यक्त केली. रशियाच्या लढाऊ विमानाने अमेरिकन लष्करी ड्रोनचा पाठलाग करून तो पाडल्याचा आरोप अमेरिकेकडून करण्यात आला आहे. परंतु, रशियाचे म्हणणे आहे की, हा अपघात होता आणि ड्रोन पाडण्यासाठी कोणत्याही शस्त्राचा वापर करण्यात आला नव्हता.


हेही वाचा – मुलीचा संशयास्पद मृत्यू; आदिवासींचा पोलीस ठाण्यावर हल्ला