उत्तराखंड : उत्तरकाशीच्या सिल्क्यरा गावात निर्माणाधीन बोगद्यात गेल्या सात दिवसांपासून 41 कामगार अडकून पडले आहेत. मोठे प्रयत्न करून देखील त्यांना अद्यापही बोगद्याच्या बाहेर काढता आलेले नाही. त्यामुळे आता अडकलेल्या कामगारांचे मनोधैर्य खचू लागले आहे. परंतु, यामुळे चे सहकारी आणि कुटुंबीय प्रशासनाच्या अपयशामुळे संतापले आहेत. त्यांच्याकडून प्रशासनाबाबत रोष व्यक्त करण्यात येत आहे. आत अडकलेल्या 41 मजुरांना नैराश्यातून वाचवण्यासाठी त्यांना डिप्रेशन न येणारी औषध पाठविण्यात येत आहेत. याशिवाय ड्रायफ्रुट्स आणि मल्टीविटामिन औषधही दिले जात आहे. (Uttarkashi: Medicines, dry fruits for food sent to laborers stuck in tunnels to save them from depression)
हेही वाचा – बलात्काराच्या 97 टक्के घटनांमध्ये नराधम असतो परिचयातीलच; NCRB च्या अहवालातून माहिती उघड
रस्ते वाहतूक आणि महामार्ग सचिव अनुराग जैन यांनी रविवारी (ता. 19 नोव्हेंबर) प्रसार माध्यमांशी बोलताना सांगितले की, कामगारांना मल्टीविटामिन, अँटीडिप्रेसेंट्स आणि ड्रायफ्रूट्स पाठवले जात आहेत. चांगली बाब म्हणजे त्यांना आत वीज पुरवली जात आहे. त्यामुळे बोगद्याच्या आत प्रकाश आहे. पाइपलाइनद्वारेही पाणी पाठवले जात आहे. यासाठी 4 इंचाचा पाइप वापरला जात आहे, साधारणपणे तो कॉम्प्रेशनसाठी वापरला जातो. पहिल्या दिवसापासून या पाईपद्वारे अन्न पाठवले जात आहे.
हा बोगदा राष्ट्रीय महामार्ग आणि पायाभूत सुविधा विकास महामंडळ लिमिटेड (NHIDCL) द्वारे बांधला जात आहे. गेल्या रविवारी (ता. 12 नोव्हेंबर) पहाटे साडेपाचच्या सुमारास बोगदा कोसळला होता. तेव्हापासून तेथे बचावकार्य सुरू आहे. मात्र, शुक्रवारी दुपारी अमेरिकन औगर मशीनद्वारे ड्रिलिंग करताना काही समस्या आल्याने ते काही काळ थांबवण्यात आले. मात्र, तोपर्यंत ऑगर मशीनने 60 मीटरच्या ढिगाऱ्यापैकी 24 मीटर ड्रिल केले होते. शुक्रवारी दुपारी 2.45 च्या सुमारास पाचवा पाईप टाकत असताना बोगद्यात मोठा भेगा पडल्याचा आवाज आला. यानंतर बचावकार्य तात्काळ थांबवण्यात आले. बोगदा बांधणाऱ्या एनएचआयडीसीएलने निवेदनात म्हटले आहे की, काम सुरू राहिल्यास आणखी ढिगारा कोसळण्याची भीती तज्ज्ञांनी व्यक्त केली होती. त्यामुळे बोगद्याच्या आतील पाईप पाठवण्याचे काम बंद करण्यात आले.
तर, बीआरओकडून खास मशीन आणून रस्ते तयार केले जात आहेत. अनेक यंत्रे येथे आली आहेत. बचावकार्यासाठी सध्या दोन बोअरिंग मशीन कार्यरत आहेत. ऑगर मशीनने योग्य प्रकारे काम केले तर येत्या दोन ते अडीच दिवसांत आम्ही अडकलेल्या मजुरांपर्यंत पोहोचू शकू, असा विश्वास केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी व्यक्त केला आहे.