उत्तरप्रदेशमध्ये बसला भीषण अपघात; १७ ठार तर ३५ जखमी

uttarpradesh accident
उत्तरप्रदेशमध्ये बसला भीषण अपघात

उत्तरप्रदेशच्या लखनऊमध्ये एका खासगी बसला भीषण अपघात झाला. तीरथपूर गावाजवळ बुधवारी सकाळी ही घटना घडली. भरधाव वेगात असलेली बस पलटी होऊन झालेल्या अपघातात १७ जणांचा मृत्यू झाला. मृतांमध्ये एका महिलेचा समावेश आहे. तर ३५ जण जखमी झाले असून यामधील तीन जणांची प्रकृती गंभीर आहे. या अपघातात बस चालकाला पाय गमवावे लागले. राजस्थानच्या जयपूर येथून ही बस उत्तरप्रदेशच्या गुरसहायगंज येथे जात होती. बस चालकाला झोप लागल्याने हा अपघात झाल्याचे समोर आलं आहे.

झोप लागल्याने झाला अपघात

बुधवारी सकाळी मैनपूरी- इटावा रोडवर तीरथपूर गावाजवळ हा भीषण अपघात झाला. सकाळी ५.३० वाजता ही घटना घडली असून या बसमधून ६० ते ७० जण प्रवास करत होते. या अपघातात १७ प्रवासी जागीच ठार झाले तर ३५ प्रवासी जखमी झाले. जखमींवर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरु आहेत. जखमींमधील ३ जणांची प्रकृती नाजूक असून त्यांना पुढील उपचारासाठी सैफई येथील मेडिकल कॉलेजमध्ये दाखल करण्यात आले आहे.

क्लीनर चालवत होता बस

या बसमधून प्रवास करणाऱ्या प्रवाशांमध्ये वीट भट्टीवर काम करणाऱ्या मजूरांचा समावेश आहे. हे मजूर गावाला जात होते. बसला क्लीनर चालवत असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. बस चालकाला अचानक झोप लागल्याने हा अपघात झाला. या अपघातात बस चालकाला पाय गमवावे लागले. दरम्यान, या अपघाताची चौकशी केली जाणार असल्याची माहिती मैनपूरीचे जिल्हाधिकारी प्रदीप कुमार यांनी सांगितली.

असा झाला अपघात

भरधाव वेगात असलेली बस डिव्हायडरला जाऊन धडकली. त्यानंतर ती पलटी होऊन ५० मीटरपर्यंत घसरत गेली. या अपघातात बसचे मोठं नुकसान झाले. या बसमध्ये जास्त प्रवासी प्रवास करत होते. तसंच काही प्रवासी बसच्या छतावर झोपले होते. मृतांमध्ये छत्रावरुन प्रवास करणाऱ्या प्रवाशांचा समावेश आहे. अपघातात मृत्यू झालेल्यांमध्ये फक्त ८ जणांची ओळख पलटी आहे. तर जखमींमध्ये १५ जणांची ओळख पटली आहे.