भारतीय कुस्तीसाठी एक वाईट बातमी येत आहे. युनायटेड वर्ल्ड रेसलिंग (UWW) ने भारतीय कुस्ती महासंघाचे सदस्यत्व निलंबित केलं आहे. भारतीय कुस्तीपटूंना यापुढे आगामी जागतिक चॅम्पियनशिपमध्ये भारतीय ध्वजाखाली भाग घेता येणार नाही. समितीने कुस्ती महासंघाच्या (WFI) अध्यक्षपदाच्या निवडणुकीला झालेला विलंब हे त्याचं प्रमुख कारण ठरलं आहे. युनायटेज वर्ल्ड रेसलिंगने 30 मे रोजी भारतीय कुस्ती महासंघाला पुढच्या 45 दिवसांमध्ये घेण्यासंदर्भात पत्र लिहिलं होतं. तसंच, जर या निवडणुका झाल्या नाहीत तर तुमचं सदस्यत्व रद्द करण्यात येणार असल्याचं, या पत्रात स्पष्ट म्हटलं होतं. (UWW Vs WFI Canceled Membership of Indian Federation Decision of United World Wrestling)
क्रीडा मंत्रालयाने कुस्तीपटूंनी बृजभूषण सिंह यांच्यावर लैंगिक शोषणाचे आरोप केल्यानंतर भारतीय कुस्ती महासंघांच्या सदस्यांना निलंबित करण्यात आलं आणि अॅडहॉक कमिटी स्थापन करण्यात आली. त्यानंतर कुस्ती महासंघाच्या निवडणुकांसाठी जम्मू आणि काश्मीरचे माजी न्यायाधीश एम एम कुमार यांची निवडणूक अधिकारी म्हणून नियुक्ती देखील करण्यात आली होती.
भारतीय कुस्ती महासंघाच्या निवडणुका या 11 जुलै रोजी होणार होत्या. पण तेव्हा आसाम रेसलिंग असोसिएशनने आपल्या मान्यतेसाठी आसाम उच्च न्यायालयात निवडणुकांवर स्थगिती आणली होती. त्यानंतर अॅडहॉक समितीने आसाम कुस्ती महासंघाला मान्यता दिली होती. त्यामुळे 11 जुलै रोजीच्या निवडणुका या रद्द करण्यात आल्या होत्या. त्यानंतर निवडणूक अधिकारी एम एम कुमार यांनी 12 ऑगस्ट ही तारीख दिली होती. परंतु यावेळेस दिपेंद्र हुड्डा यांच्या समर्थनार्थ हरियाणा कुस्ती महासंघानं निवडणुकांवर स्थगिती आणणारी याचिका हरियाणा उच्च न्यायालयामध्ये दाखल केली होती. त्यामुळे 12 ऑगस्ट रोजी देखील या निवडणुका रद्द करण्यात आल्या.
…म्हणून सदस्यत्व रद्द केलं
कुस्ती महासंघाच्या या निवडणुका एकूण 15 जागांसाठी होणार आहेत. दरम्यान, 12 ऑगस्ट रोजी या निवडणुका होणार होत्या. यासाठी भाजपचे खासदार बृजभूषण सिंह यांचे निकटवर्तीय संजय सिंह यांच्यासह आणखी चार जणांनी या निवडणुकांसाठी अर्ज केला होता. तसंच, दिल्लीतील ऑलंपिक भवनात हे अर्ज पाठवण्यात आले. परंतु, या दिवशीही या निवडणुका झाल्या नाहीत. त्यामुळे युनायटेड वर्ल्ड रेसलिंगने भारतीय कुस्ती महासंघाचे सदस्यत्व रद्द केले.
( हेही वाचा: Maharashtra News : शासनाने राज्यात दुष्काळ जाहीर करावा; राष्ट्रवादी काँग्रेसची मागणी )