घरCORONA UPDATEरुग्णालयाची धक्कादायक जाहिरात, 'मुस्लिमांनी कोरोनाची तपासणी करूनच यावं'!

रुग्णालयाची धक्कादायक जाहिरात, ‘मुस्लिमांनी कोरोनाची तपासणी करूनच यावं’!

Subscribe

देशात कोरोनाचा फैलाव वेगाने होत असताना या विषाणूमुळे आता देशात धार्मिक तेढ निर्माण होते की काय असं चित्र दिसू लागलं आहे. तबलिगी जमात मरकज प्रकरणावरून आधीच वाद सुरू असतानाच आता उत्तर प्रदेशच्या मेरठमधल्या एका रुग्णालयाने छापलेल्या एका जाहिरातीवरून वाद सुरू झाला आहे. या जाहिरातीमध्ये संबंधित रुग्णालयाने ठेवलेल्या अटी या मुस्लिम धर्मियांविषयी दुजाभाव करणाऱ्या असल्याचं समोर आलं. ही जाहिरात सोशल मीडियावर व्हायरल होई लागल्यानंतर संबंधित रुग्णालयाने दुसऱ्या दिवशी पुन्ही माफीनामा देखील जाहीर केला. मात्र, मेरठ पोलिसांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेतली असून या रुग्णालय आणि रुग्णालयाच्या संचालकांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बीबीसीने यासंदर्भातलं वृत्त दिलं आहे.

valentis hospital ad

- Advertisement -

मेरठमधल्या वेलेंटिस रुग्णालयाने स्थानिक वर्तमानपत्रामध्ये एक जाहिरात दिली होती. त्यामध्ये मुस्लीम धर्मियांनी रुग्णालयात उपचारांसाठी येताना त्यांची आणि त्यांच्यासोबत येणाऱ्या व्यक्तीची कोरोना चाचणी करून निगेटिव्ह असल्याचा अहवाल घेऊनच यावे, असं नमूद करण्यात आलं होतं. तसेच, सर्वच मुस्लिम बांधवांसाठी ही आवश्यक बाब आहे असं देखील या जाहिरातीत म्हटलं होतं. ज्या रुग्णांना रुग्णालयात तातडीने भरती करण्याची आवश्यकता आहे, त्यांना मात्र लगेच भरती केलं जाईल पण रुग्ण आणि त्याच्यासोबत येणारी व्यक्ती, यांच्या कोरोना चाचणीचं शुल्क रुग्णांना भरावं लागेल, असं जाहिरातीत म्हटलं होतं.

valentis hospital letter

- Advertisement -

दरम्यान, ही जाहिरात सोशल मीडियावर व्हायरल झाल्यामुळे वेलेंटिस रुग्णालयावर टीका होऊ लागली. त्यानंतर या रुग्णालयाने दुसऱ्या दिवशी वृत्तपत्रांमध्ये माफीनामा प्रसिद्ध केला. ‘आमच्या जाहिरातीतून चुकून जर काही आक्षेपार्ह संदेश दिला गेला असेल, त्यातून कुणाच्या भावना दुखावल्या गेल्या असतील, तर त्यासाठी आम्ही क्षमा मागतो. कुणाच्याही भावना दुखावण्याचा आमचा हेतू नव्हता’, असं या माफीनाम्यामध्ये म्हटलं आहे.

मात्र, रुग्णालयाने जरी माफीनामा जाहीर केला असला, तरी स्थानिक पोलीस प्रशासन कारवाईवर ठाम आहे. मेरठ पोलिसांनी धार्मिक तेढ निर्माण करणाऱ्या या जाहिरातीच्या आधारावर वेलेंटिस रुग्णालयावर गुन्हा दाखल केला आहे. रुग्णालय प्रशासन आणि रुग्णालयाचे मालक डॉ. अमित जैन यांच्याविरोधात वेगवेगळ्या कलमांनुसार एफआयआर दाखल करण्यात आली असून त्यांनी अशी जाहिरात का दिली? याचा तपास सध्या पोलीस करत आहेत. या प्रकरणावर आता न्यायालयातच बाजू मांडली जाईल, अशी भूमिका स्थानिक पोलिसांनी घेतली आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -