Tuesday, March 25, 2025
27 C
Mumbai
Homeदेश-विदेशVHP : सिंहिणीच्या 'सीता' नावाला विहिंपचा आक्षेप, हायकोर्टाने दिले देवी दुर्गेचे उदाहरण

VHP : सिंहिणीच्या ‘सीता’ नावाला विहिंपचा आक्षेप, हायकोर्टाने दिले देवी दुर्गेचे उदाहरण

Subscribe

कोलकाता : पश्चिम बंगालच्या सिलीगुडीतील सफारी पार्कमध्ये वनविभागाने ‘सीता’ नावाच्या सिंहिणीला ठेवले आहे. सिंहिणीच्या या नावाला विश्व हिंदू परिषदेने विरोध करत कलकत्ता उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. यावर सुनावणी घेत असताना उच्च न्यायालयाने देवी दुर्गेचे उदाहरण दिले.

हेही वाचा – Sharad Pawar : राजकीय मैदान 57 वर्षांपासून गाजवणारा तेल लावलेला पैलवान म्हणजेच…

विहिंपच्या याचिकेवर कलकत्ता उच्च न्यायालयात न्यायमूर्ती सौगत भट्टाचार्य यांच्यासमोर बुधवारी सुनावणी झाली. जगभरातील सर्व हिंदूंसाठी प्रभू रामाच्या पत्नी सीता ही पवित्र देवी आहे. मांजराच्या प्रजातीतील प्राण्याला ‘सीता’ हे नाव देण्यात आल्याने हिंदूंच्या धार्मिक भावना दुखावल्या आहेत. असे कृत्य ईशनिंदा आहे आणि सर्व हिंदूंच्या धार्मिक श्रद्धेवर थेट हल्ला आहे, असे विहिंपने म्हटले आहे.

तर, नावाचा काय मुद्दा आहे? कदाचित हे नाव आपुलकीने दिले असावे. तुम्हाला वाटेल की ही निंदा आहे, परंतु काहींसाठी तो स्नेह असेल. सिंहीणीचे नाव सीता ठेवले तर काय अडचण आहे? असा प्रश्न न्यायमूर्ती सौगत भट्टाचार्य यांनी केला. यावर युक्तिवाद करताना विहिंपच्या वकिलाने, कोणत्याही प्राण्याचे नाव कोणत्याही देवी-देवतेच्या नावावर ठेवू नये, असे निर्देश देण्याची विनंती केली. हाच ट्रेण्ड कायम राहिल्यास भविष्यात गाढवांना कोणत्यातरी देवतेचे नाव ईल, अशी भीतीही विहिंपने व्यक्त केली आहे.

हेही वाचा – CBI Raids on Satyapal Malik: सत्यपाल मलिकांच्या घरासह 30 ठिकाणांवर CBI ची छापेमारी, काय आहे प्रकरण?

सुनावणीदरम्यान खंडपीठाने सिंहाचा उल्लेख देवी दुर्गेचे वाहन असा केला. दुर्गापूजेच्या वेळी आपण सिंहाची पूजा करतो. हे त्या व्यक्तीच्या विचारसरणीवर अवलंबून असते. सिंहाशिवाय आपण दुर्गेची कल्पना करू शकतो का? असा प्रश्नही न्यायमूर्तींनी केला. त्यावर, सिंह दुर्गादेवीच्या चरणी असण्याचे एकमेव कारण म्हणजे सर्व बाजूंनी वाईटावर हल्ला करणे हा असतो आणि सिंहाला कोणतेही नाव दिलेले नाही. तसेच आपण सिंहाची नव्हे तर, फक्त देवीची पूजा करतो. सिंहाच्या पूजेसाठी कोणताही मंत्र नाही, असा युक्तिवाद याचिकाकर्त्यांच्या वकिलांनी केला. तथापि, सिंह हा त्या संपूर्ण पूजेचाच एक भाग असतो, असे न्यायमूर्ती भट्टाचार्य म्हणाले.

या सुनावणीत विहिंपने, त्रिपुरा प्राणिसंग्रहालयातून आलेल्या सिंहिणीच्या नावाबाबत बराच गोंधळ असल्याचे सांगितले. त्रिपुरा प्राणिसंग्रहालयाच्या अधिकाऱ्यांनी सिंहांची नावे दिलेली नाहीत. राज्याच्या प्राणीशास्त्र विभागाने सिंहाचे नाव अकबर आणि सिंहिणीचे नाव सीता ठेवले असल्याची वृत्ते प्रसिद्ध झाली आहेत. राज्य सरकार याची जबाबदारी घेण्यास टाळाटाळ करत आहे, असे विहिंपच्या वकिलाने सांगितले. हा युक्तिवाद ऐकून घेतल्यानंतर न्यायालयाने राज्याच्या वकिलांना सिंहांची नावे देण्यात आली आहेत की नाही याची योग्य माहिती न्यायालयाला देण्याचे निर्देश दिले.

हेही वाचा – Nadda Meet Cm Shinde : जेपी नड्डांनी घेतली मुख्यमंत्री शिंदेंची भेट; जागावाटपाबाबत चर्चा?