बृजभूषण सिंह यांना अटक होईपर्यंत लढा सुरूच राहणार, विनेश फोगाटचा निर्धार

भारतीय कुस्ती महासंघाचे अध्यक्ष व भाजप खासदार बृजभूषण सिंह यांच्याविरोधात कुस्तीपटूंकडून आंदोलन केलं जात आहे. अध्यक्ष बृजभूषण सिंह यांनी महिला कुस्तीपटूंचं लैंगिक शोषण केल्याचा आरोप करण्यात आला आहे. त्यामुळे त्यांच्याविरोधात पोलिसांनी FIR सुद्धा दाखल केली आहे. मात्र, अजूनपर्यंत त्यांना अटक न झाल्याने महिला कुस्तीपटू नाराज आहेत. दरम्यान, बृजभूषण सिंह यांना अटक होईपर्यंत लढा सुरूच राहणार, असा निर्धार आशियाई क्रीडा स्पर्धा आणि राष्ट्रकुल स्पर्धेत सुवर्णपदक पटकावणाऱ्या विनेश फोगाटनं घेतला आहे.

आमचा लढा न्यायासाठी आहे. ही लढाई महिनाभरापासून सुरूच आहे. मात्र आम्ही जंतर-मंतरवर एक वर्षांपासून आहोत, असं वाटतंय. आम्हाला येथे रात्रीच्या वेळी उकडतंय किंवा मच्छर चावतात म्हणून नाही तर न्याय मिळण्याची प्रक्रिया खूप संथ आहे. जेव्हा एका अल्पवयीन मुलीसह ७ महिला कुस्तीपटूंनी बृजभूषण सिंह यांच्यावर लैंगिक शोषणाचे आरोप केले होते. तेव्हा आमचं म्हणणं ऐकलं जाईल, असं वाटतं होतं, असं विनेश फोगाट म्हणाली.

जानेवारीमध्ये जेव्हा बजरंग पुनिया, साक्षी मलिक आणि मी जंतर-मंतरवर विरोध करण्याचा निर्णय घेतला. तेव्हा आम्हाला वाटलं की, न्याय मिळण्यासाठी दोन ते तीन दिवसांपेक्षा अधिक कालावधी लागणार नाही. तसेच महिला कुस्तीपटूंच्या सन्मानासाठी पुन्हा विरोध करावा लागेल, असे आम्हाला वाटले नव्हते. आशियाई क्रीडा स्पर्धा जवळच आहेत. आम्हाला भारताचं प्रतिनिधित्व करायचं आहे आणि त्यात पदक जिंकायचं आहे. जर तुम्ही न्यायासाठी लढू शकला नाहीत तर तुमच्या गळ्यातील पदकांना काय अर्थ आहे, असंही विनेश फोगाट म्हणाली.

जोपर्यंत बृजभूषण सिंह यांना अटक होत नाही, तोपर्यंत आम्ही जंतर-मंतरवरून हटणार नाही. महिलांना न्याय मिळवून देण्यासाठी ही एक प्रदीर्घ लढाई होऊ शकते, असंही फोगाट म्हणाली.


हेही वाचा : बंद खोलीत होत होते अत्याचार; विनेश फोगाटचा धक्कादायक आरोप