घरट्रेंडिंगतुम्हालाही 'रावणाला कोरोना, दसरा रद्द'चा व्हिडिओ आलाय? जाणून घ्या त्यामागचं सत्य!

तुम्हालाही ‘रावणाला कोरोना, दसरा रद्द’चा व्हिडिओ आलाय? जाणून घ्या त्यामागचं सत्य!

Subscribe

गेल्या काही दिवसांपासून Whatsapp, Facebook वर रावणाचा एक व्हिडिओ भलताच व्हायरल होऊ लागला आहे. या व्हिडिओमध्ये रावणाचा एक पुतळा एका Ambulance वर उताणा ठेऊन नेला जात असल्याचं दिसत आहे. ही Ambulance हरियाणामधली आहे. त्यावर हिंदीतून ‘सेठी अस्पताल, खरखौदा’ असं लिहिलं आहे. पण व्हिडिओ व्हायरल होताना त्यावर लिहून येतंय ‘दिल्लीमध्ये रावणालाही झाला कोरोना, हॉस्पिटलमध्ये केलं भरती, दसरा उत्सव रद्द’, ‘रावण झाला कोरोना पॉझिटिव्ह, हॉस्पिटलमध्ये दाखल’, ‘कोरोनाग्रस्त रावणाचे उपचार कठीण, दिल्लीतील रुग्णालयांनी केले हात वर’! नवरात्रीचा उत्सव सध्या देशभर सुरू असून उद्या म्हणजेच रविवार २५ ऑक्टोबर रोजी दसरा आहे. या दिवशी रावणाचं देशभरात विविध कार्यक्रमांमध्ये दहन केलं जातं. मात्र, यंदा कोरोनाचं संकट समोर असल्यामुळे देशभरातले रावण दहनाचे कार्यक्रम रद्द करण्यात आले आहेत. या पार्श्वभूमीवर हा व्हिडिओ व्हायरल होऊ लागल्यामुळे नक्की हा काय प्रकार आहे? या विवंचनेत सगळेच बुचकळ्यात पडले आहेत!

व्हायरल झाला नसता तरच नवल!

गेल्या ८ ते ९ महिन्यांपासून कोरोना देशात ठाण मांडून बसला आहे. अजूनही कोरोनाची एकही प्रभावी लस समोर आलेली नाही. जागतिक आरोग्य संघटनेच्या अंदाजानुसार कोरोनाची लस येण्यासाठी पुढच्या वर्षीचा जून किंवा जुलै महिना उजाडू शकतो. त्यातच कोरोनाचे रुग्ण वाढण्याचं प्रमाण काही कमी होताना दिसत नाहीये. त्यामुळे आता कोरोनाची भिती वाटून वाटून पुन्हा लोकांनी त्याची मस्करी करायला सुरुवात केली आहे. (जशी ती कोरोनाच्या सुरुवातीच्या काळात केली होती!). शिवाय, वैयक्तिक सुरक्षेची काळजी घेऊन लोकांनी आपले रोजचे व्यवहार देखील सुरू केले आहेत. त्यातच हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर लोकांनी आपली क्रिएटिव्हिटी त्यातही लावली नसती, तरच नवलं! पण नक्की या व्हिडिओमागचं सत्य आहे काय?

- Advertisement -

ही आहे व्हिडिओची कथा!

तर हा व्हिडिओ आहे हरियाणाच्या सोनीपतमधला. गेल्या वर्षी दसऱ्याच्या आधीचा हा व्हिडिओ आहे. सोनीपतच्या खरखौदा भागातल्या सेठी हॉस्पिटलची ही Ambulance आहे. आणि त्यावर ठेवलेला रावणाचा पुतळा देखील खराच आहे. पण त्यामागची कथा वेगळी आहे! यासंदर्भात जागरणनं सेठी हॉस्पिटलच्या टेक्निशियनशी संपर्क साधला असता त्यांनी सत्य माहिती दिली. लॅब टेक्निशियन धर्मवीर म्हणाले, ‘सेठी हॉस्पिटलतर्फे दरवर्षी दसऱ्याचा उत्सव साजरा केला जातो. रावण दहन देखील केलं जातं. गेल्या वर्षी देखील अशीच उत्सवाची तयारी सुरू होती. बहादुरगढमध्य रावणाचा दहनासाठीचा पुतळा तयार करण्यात आला होता. मात्र, १८ ऑक्टोबर २०१९ रोजी संध्याकाळी रावणाचा पुतळा खरखौदाला आणण्यासाठी कोणतंही वाहन मिळालं नाही. त्यामुळे शेवटी नाईलाजाने हा पुतळा अशा पद्धतीने Ambulance वर टाकून आणावा लागला. त्याचदरम्यान रस्त्यावरच्या एका माणसाने त्याचा व्हिडिओ शूट केला. गेल्या वर्षीही हा व्हिडिओ बराच व्हायरल झाला होता.’

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -