नवी दिल्ली : दिल्लीहून कोलकात्याला आलेल्या विस्तारा विमानात घडलेली एक धक्कादायक घटना समोर आली आहे. दिल्लीला विमानात बसलेल्या एका अंध महिलेला कोलकाता येथे पोहोचल्यानंतर आधी थांबण्यास सांगण्यात आले आणि नंतर बराच वेळ विमानात तिला एकटीलाच बसवून ठेवले. या महिलेचा मुलगा आयुष केजरीवालने इंस्टाग्रामवर एक पोस्ट शेअर केल्यानंतर ही घटना समोर आली आहे. आता विस्तारा एअरलाइन्सने या संपूर्ण प्रकरणावर माफीनामा आणि स्पष्टीकरण दिले आहे.
View this post on Instagram
आयुष केजरीवालने 3 सप्टेंबर 2023ला आपल्या इंस्टाग्रामवर अकाऊंटवरून एक व्हिडीओ शेअर केला आहे. माझी अंध आई 31 ऑगस्ट रोजी विस्ताराच्या विमानाने दिल्लीहून कोलकाता विमानतळावर पोहोचली. जेव्हा सर्व प्रवासी विमानातून उतरू लागले, तेव्हा आईला थांबण्यास सांगण्यात आले. तथापि, सर्व प्रवासी उतरल्यावर आईला विमानात एकटीलाच बसविण्यात आले.
हेही वाचा – मराठा समाजाला आरक्षण मिळावे हीच आमची भूमिका – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
आई अंध असल्याने कोणीतरी येईल, म्हणून ती वाट पाहात राहिली. खूप वेळाने विमानाची साफाई करण्यासाठी कर्मचारी आले, तेव्हा त्यांना आई आत वाट पाहात असल्याचे आढळले. यानंतर त्यांनी आईला विमानातून खाली उतरवले. आई दृष्टिहीन असल्याने तिच्या प्रवासासाठी ‘सहाय्यक यात्रा योजना’ घेतली होती. मात्र तरीही तिला प्रवासात कोणत्याही प्रकारची मदत मिळाली नाही, असे आयुषने या व्हिडीओमध्ये म्हटले आहे.
नेटिझन्सच्या निशाण्यावर विस्तारा एअरलाइन्स
आयुषने केलेली ही इन्स्टाग्राम पोस्ट वेगाने व्हायरल झाली आहे. विस्तारा एअरलाइन्सच्या या वर्तनाचा अनेक सोशल मीडिया युझर्सनी निषेध केला आहे. विस्तारा एअरलाइन्सकडून किमान अशा प्रकारच्या वर्तनाची तरी अपेक्षा नाही, असे काही युझरनी म्हटले आहे. तर काहींनी आपले पूर्वीचे अनुभवही शेअर केले आहेत.
हेही वाचा – मराठा आरक्षणावर वरवंटा फिरवणारा खरा जनरल डायर…, भाजपाचा ठाकरे गटावर पलटवार
विस्ताराने व्यक्त केला खेद
आयुषच्या पोस्टला उत्तर देताना, विस्तारा एअरलाइन्सने या घटनेबद्दल दु:ख व्यक्त केला आहे. आणि ट्रिपशी संबंधित माहिती मागितली. प्रवाशांची सुरक्षा ही आमची सर्वोच्च प्राथमिक जबाबदारी आहे, असे आम्ही मानतो. विस्तारामध्ये आम्ही चांगली सेवा देण्याचा प्रयत्न करतो, परंतु अपेक्षेनुसार तुम्हाला आमच्याकडून सेवा मिळाली नाही, याचा खेद वाटतो, असे विस्ताराने म्हटले आहे.