राष्ट्रपती निवडणूक : मतपेट्या हवाई आणि रस्ते मार्गाने दिल्लीत

राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीसाठी सोमवारी संसदेसह देशभरात मतदान झाले. एनडीएच्या उमेदवार द्रौपदी मुर्मू आणि विरोधी पक्षाचे उमेदवार यशवंत सिन्हा यांच्यासाठी मतदान झाले. सोमवारी सकाळी 10 वाजता मतदानाला सुरुवात झाली आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सर्वप्रथम मतदान केले. सोमवारी सायंकाळी पाच वाजता मतदान प्रक्रिया संपली. त्यानंतर सीलबंद मतपेटी आणि इतर निवडणूक साहित्य नवी दिल्ली येथे पाठविण्यात आले.

वृत्तसंस्थेने एका उच्चपदस्थ अधिकाऱ्याच्या हवाल्याने म्हटले आहे की, राष्ट्रपतीपदाच्या निवडणुका देशात सर्वत्र शांततेत आणि सौहार्दपूर्णपणे पार पडल्या. संसदेत एकूण 99.18 टक्के मतदान झाले आहे. राज्यसभेचे सरचिटणीस आणि मुख्य निवडणूक अधिकारी पीसी मोदी यांनी सांगितले की, विविध राज्यांचे सहाय्यक निवडणूक अधिकारी सीलबंद मतपेट्या घेऊन सोमवारी संध्याकाळी रस्ते आणि विमानातून येण्यास सुरुवात करतील. विमानतळ ते संसद भवनापर्यंत सुरक्षित वाहतुकीसाठी आवश्यक सुरक्षा व्यवस्था करण्यात आली आहे.

त्यानुसार महाराष्ट्र विधान मंडळ सचिवालयाचे प्रधान सचिव तथा सहायक निवडणूक निर्णय अधिकारी राजेंद्र भागवत, उप सचिव तथा सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी ऋतुराज कुडतरकर आणि अवर सचिव सुभाष नलावडे यांनी सदर निवडणूक मतपेटी आणि इतर सीलबंद साहित्य छत्रपती शिवाजी आंतरराष्ट्रीय विमानतळ मुंबई येथून विमानाद्वारे राज्यसभा सचिवालय, नवी दिल्ली येथे नेण्यासाठी प्रयाण केले. तिथे पोहोचल्यानंतर संसद भवनापर्यंत त्या नेण्यासाठी आवश्यक सुरक्षा व्यवस्था करण्यात आली.

मुख्य निवडणूक अधिकारी पीसी मोदी यांनी सांगितले की, राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत संसदेत मतदान करण्यास निवडणूक आयोगाने (EC) परवानगी दिलेल्या ७३६ मतदारांपैकी ७३० (७२१ खासदार, ९ आमदार) यांनी मतदान केले.