घरदेश-विदेशराष्ट्रपतीपद निवडणूक : विरोधकांमधील फुटीमुळे रालोआच्या द्रौपदी मुर्मू यांचा विजय सुकर

राष्ट्रपतीपद निवडणूक : विरोधकांमधील फुटीमुळे रालोआच्या द्रौपदी मुर्मू यांचा विजय सुकर

Subscribe

नवी दिल्ली : देशाच्या १५व्या राष्ट्रपतीच्या निवडीसाठी आज मतदान होत आहे. भाजपाप्रणित राष्ट्रीय लोकशाही आघाडीने द्रौपदी मुर्मू यांना पाठिंबा दिला आहे. तर, त्यांच्याविरोधात विरोधकांकडून माजी केंद्रीय मंत्री यशवंत सिन्हा आहेत. तथापि, विरोधकांच्या गटातच फूट पडून अनेकांनी द्रौपदी मुर्मू यांना जाहीर पाठिंबा दिल्याने त्यांचा विजय सुकर झाला आहे.

देशभरातील सुमारे ४८०० आमदार आणि खासदार राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीसाठी मतदान करतील. सोमवारी सकाळी १० ते संध्याकाळी ५ या वेळेत संसद तसेच राज्यांमधील विधानसभेत हे मतदान होईल. २१ जुलै रोजी संसद भवनामध्ये मतमोजणी होणार असून नवे राष्ट्रपती २५ जुलै रोजी आपल्या पदाची शपथ घेतील. विद्यमान राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांचा कार्यकाळ २४ जुलैच्या मध्यरात्री समाप्त होत आहे.

- Advertisement -

रालोआकडे ४९ टक्के तर विरोधकांकडे ५१ टक्के मते आहेत. त्यामुळे ही निवडणूक चुरशीची होईल, अशी अपेक्षा होती. पण मतदानाची तारीख येईपर्यंत विरोधकांमध्ये फूट पडली. विशेष म्हणजे, विरोधकांच्या बैठकीत यशवंत सिन्हा यांना पाठिंबा देणाऱ्या बिजद, वायएसआर काँग्रेस, अकाली दल, जदएस, झामुमो, शिवसेना और टीडीपी यासारख्या पक्षांनीही द्रौपदी मुर्मू यांना पाठिंबा जाहीर केला. त्यामुळे यशवंत सिन्हा यांना केवळ काँग्रेस, डावे, आप, टीएमसी, एसपी, राजद, राष्ट्रवादी काँग्रेस, सपा, रालोद, टीआरएस, नेशनल कॉन्फरन्स, केरळ काँग्रेस एम यांचे समर्थन आहे. त्यामुळे मुर्मू यांच्या विजयाची औपचारिकता उरली आहे.

हेही वाचा – जास्तीत जास्त घरांवर फडकणार तिरंगा, मुख्यमंत्री शिंदेंकडून केंद्राला आश्वासन

- Advertisement -

मूळच्या ओदिशाच्या असलेल्या द्रौपदी मुर्मू यांना २७ पक्षांनी पाठिंबा दिला असून त्यांना जवळपास ६.६५ लाख मतांचे पाठबळ त्यांना मिळाले आहे. तर, दुसरीकडे यशवंत सिन्हा यांना १४ पक्षांनी पाठिंबा दिला असून ३.६२ लाख मते मिळतील, अशी अपेक्षा आहे. याशिवाय, क्रॉस व्होटिंग होण्याची देखील शक्यात वर्तविण्यात येत आहे. सत्ताधारी रालोआ आणि विरोधकांमधील मतांची ही तफावत लक्षात घेता ६० टक्क्यांहून अधिक मते मिळवून द्रौपदी मुर्मू विजयी होतील, असा अंदाज आहे. त्या विजयी झाल्यावर देशातील सर्वात मोठे संवैधानिक पद भूषविणाऱ्या त्या पहिल्या आदिवासी महिला ठरतील. तथापि, पहिल्या महिला राष्ट्रपती होण्याचा मान महाराष्ट्रातील प्रतिभाताई पाटील यांना मिळाला आहे.

मताचे मूल्य
राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत खासदाराच्या मताचे मूल्य ७०० आहे. गेल्या निवडणुकीच्या वेळी ते ७०८ होते. तर, विविध राज्यांमधील लोकसंख्येनुसार तेथील आमदारांच्या मताचे मूल्य वेगवेगळे आहे. आमदारांच्या मताचे मूल्य सर्वाधिक उत्तर प्रदेशात आहे. तेथील एका आमदाराच्या मताचे मूल्य २०८ आहे. त्याखालोखाल झारखंड आणि तमिलनाडु या राज्यांच्या आमदारांच्या मताचे मूल्य १७६ आहे. तर, महाराष्ट्रातील आमदारांच्या मताचे मूल्य १७५ आहे.

हेही वाचा – निर्णायक सामन्यात भारताचा ५ गडी राखून इंग्लंडवर विजय; मालिकाही घातली खिशात

शिंदे-फडणवीस पुन्हा धक्का देण्याच्या तयारीत
द्रौपदी मुर्मू यांना २०० आमदारांची मते मिळवून देऊ, असा निर्धार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केला आहे. शिंदे-फडणवीस सरकारकडे एकूण १६७ आमदारांचे संख्याबळ असताना २०० मतांचे गणित कसे मांडणार, असा प्रस्न अनेकांना पडला आहे. एकनाथ शिंदे यांच्यामुळे शिवसेनेत पडलेली मोठी फूट तसेच राज्यसभा, विधान परिषद निवडणुकीत महाविकास आघाडीला धक्का देणारे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस एकत्र असल्याने विरोधकांची मते फुटतील का, याबाबत सर्वांनाच उत्सुकता आहे.

विधानसभा अध्यक्षपद निवडणूक तसेच शिंदे-फडणवीस सरकारच्या बहुमत चाचणीसाठी भाजपचे लक्ष्मण जगताप व मुक्ता टिळक हे मतदानाला येऊ शकले नव्हते. नार्वेकर यांना आता मताधिकार असल्याने सत्ताधाऱ्यांकडे आजच्या घडीला १६७ मते आहेत. शिवसेनेने (उद्धव ठाकरे गट) मुर्मू यांना पाठिंबा दिल्याने त्यात आणखी १५ आमदारांची भर पडेल. त्यामुळे उर्वरित १८ मते कोणाची असतील, याबाबत तर्कवितर्क व्यक्त करण्यात येत आहे.

हेही वाचा – आजपासून संसदेच पावसाळी अधिवेशन; अग्निपथसह अनेक मुद्द्यावरून विरोधक होणार आक्रमक

Manoj Joshi
Manoj Joshihttps://www.mymahanagar.com/author/mjoshi/
प्रिंट, चॅनल आणि डिजिटल या तिन्हीचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -