Eco friendly bappa Competition
घर देश-विदेश काहीपण बोलून मोकळं व्हायचं..., गुंतवणूक आणि रोजगारावरून भाजपा आणि मविआत जुंपली

काहीपण बोलून मोकळं व्हायचं…, गुंतवणूक आणि रोजगारावरून भाजपा आणि मविआत जुंपली

Subscribe

मुंबई : गेल्या नऊ वर्षांतील गुंतवणूक आणि रोजगाराच्या संधीवरून आता भाजपा आणि महाविकास आघाडीत जुंपली आहे. सोशल मीडियाच्या माध्यमातून आकडेवारी सादर करत एकमेकांचे दावे खोडून काढण्याचा प्रयत्न दोघांकडून केला जात आहे. महाविकास आघाडी सरकारच्या काळात झालेल्या एमओयूपैकी 23 टक्के कधी अंमलातच आलेले नाही, हाच दर देवेंद्र फडणवीस यांच्या मुख्यमंत्रीपदाच्या कार्यकाळात इतिहासातील सर्वाधिक होता, असे भाजपाने म्हटले आहे. तर, काहीपण बोलून मोकळं व्हायचं आणि निघून जायचं असं आता चालणार नाही, असे प्रत्युत्तर राष्ट्रवादी काँग्रेसने दिले आहे.

- Advertisement -

पुण्यातील आरटीआय कार्यकर्ते प्रफुल्ल सारडा यांनी माहितीच्या अधिकारात गेल्या नऊ वर्षांतील गुंतवणूक आणि रोजगाराच्या संधींबाबतची माहिती मिळवली होती. त्याचा हवाला देत काँग्रेस आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या दोन पक्षांनी मविआ सरकारच्या काळात सर्वाधिक गुंतवणूक आणि रोजगाराच्या संधी उपलब्ध झाल्याचे म्हटले आहे. मविआ सरकारच्या काळात व्यापारात 35 टक्के वाढ झाली तर रोजगार 42 टक्क्यांनी वाढले. फडणवीस सरकारच्या पाच वर्षांत 14,16,224 तर मविआ सरकारच्या केवळ 30 महिन्यांत 18,68,055 सूक्ष्म-लघु-मध्यम उद्योग निर्माण झाले, असे काँग्रेसने म्हटले आहे.

गद्दारीचे दिवस लवकरच जातील – आदित्य ठाकरे

भाजपाच्या फडणवीस सरकारपेक्षा उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वातील मविआ सरकारच सरस होते आणि हे सगळं गद्दारी करून सरकार पडण्याआधी केवळ 30 महिन्यांच्या कालावधीत, कोरोना संकटाच्या काळात करून दाखवले, असे सांगत ठाकरे गटाचे आमदार आदित्य ठाकरे यांनी भाजपावर निशाणा साधला आहे. महाराष्ट्राला अग्रेसर ठेवणारे सरकार गद्दारी करून पाडले गेले नसते, तर महाराष्ट्राची कितीतरी पट भरभराट इतक्यात झाली असती, असा टोला लगावताना, आताचे हे लुटमारीचे, गद्दारीचे दिवस लवकरच जातील आणि पुन्हा मविआ सरकार येईल, असा आशावाद माजी मंत्री आदित्य ठाकरे यांनी व्यक्त केला.

- Advertisement -

आता महाराष्ट्र पुन्हा क्रमांक 1वर

भाजपाने मविआचा दावा फेटाळून लावला आहे. मविआ सरकारच्या काळात झालेल्या एमओयूपैकी 23 टक्के कधी अंमलातच आलेले नाही, हाच दर देवेंद्र फडणवीस यांच्या मुख्यमंत्रीपदाच्या कार्यकाळात इतिहासातील सर्वाधिक होता, असे सांगत भाजपाने आकडेवारीच दिली आहे.

  • 2016 मेक इन इंडिया : एकूण एमओयू 338/ गुंतवणूक : 3,66,214 कोटी
  • 2018 मॅग्नेटिक महाराष्ट्र : एकूण एमओयू 2437/ गुंतवणूक : 5,45,121 कोटी
  • 2019 ते 2022 : एकूण एमओयू 99/ गुंतवणूक : 1,93,704 कोटी
  • वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम 2022 : एकूण एमओयू : 25/ गुंतवणूक : 80,498 कोटी
  • वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम 2023 : एकूण एमओयू : 19/ गुंतवणूक : 1,37,666 कोटी

देवेंद्र फडणवीस यांच्या मुख्यमंत्रीपदाच्या कार्यकाळाशी तुम्ही स्पर्धा करूच शकत नाहीत. महाराष्ट्राच्या इतिहासात सर्वाधिक परकीय गुंतवणूक देवेंद्र फडणवीस यांच्या काळात आली. मविआ सरकार गेल्यावर पुन्हा महाराष्ट्र क्रमांक 1वर आला आहे, असे भाजपाने म्हटले आहे.

जुनी सवय भाजपाने आता तरी सोडावी – रोहित पवार

भाजपा सरकारच्या पाच वर्षात (2014-19) राज्यात 405025 कोटींची परकीय गुंतवणूक आली. मविआ सरकारच्या अडीच वर्षांत राज्यात 329292 कोटींची परकीय गुंतवणूक आली. भाजपा सरकारच्या काळात दर महिन्याला सरासरी 6750 कोटींची विदेशी गुंतवणूक आली तर मविआ सरकार काळात दर महिन्याला सरासरी 10290 कोटी आले, असे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी केंद्र सरकारच्या वाणिज्य व उद्योग विभागाच्या DPIITच्या आकडेवारीचा हवाला देत म्हटले आहे.

मविआ सरकारचा स्ट्राइक रेट कुठे आणि भाजपाचा कुठे? त्यामुळे मविआ सरकारचा काळ आणि भाजपा सरकारचा काळ याच्यात स्पर्धा होऊच शकत नाही. ‘काहीपण बोलून मोकळं व्हायचं आणि निघून जायचं,’ असे आता चालणार नाही. खोटे बोलायचे पण रेटून बोलायचे ही जुनी सवय भाजपाने आता तरी सोडायला हवी, असा टोला त्यांनी लगावला आहे.

- Advertisment -