नवी दिल्ली : वक्फ (दुरुस्ती) विधेयक 2024 वर संयुक्त संसदीय समितीची (JPC) बैठक दिल्लीत सुरू आहे. आज शुक्रवारी (ता. 24 जानेवारी) साधारणतः सकाळी 11 वाजता ही सभा सुरू झाली. पण या सभेशी संबंधित जो मसुदा तयार करण्यात आला होता, त्यामध्ये अचानक बदल करण्यात आल्याने आणि मसुद्यात प्रस्तावित केलेल्या बदलांवर संशोधन करण्यासाठी पुरेसा वेळ दिला जात नसल्याचा आरोप विरोधी सदस्यांनी केला. यावेळी तृणमूल काँग्रेसचे खासदार कल्याण बॅनर्जी आणि भाजपा खासदार निशिकांत दुबे यांच्यात जोरदार वादावादी झाली. परिस्थिती नियंत्रणात येत नसल्याचे पाहून 10 खासदारांचे समितीच्या सदस्य पदावरून निलंबन करण्यात आले. यामध्ये शिवसेना ठाकरे गटाचे खासदार अरविंद सावंत यांचाही समावेश आहे. (Waqf Bill JPC Meeting 10 MPs including Arvind Sawant suspended)
वक्फ बोर्ड विधेयकासंदर्भातील संयुक्त समितीच्या बैठकीला आज सकाळी सुरुवात झाली. यावेळी समितीच्या बैठकीत काश्मीरचे धार्मिक प्रमुख मीरवाइज उमर फारूक यांच्या नेतृत्वातील शिष्टमंडळाचे म्हणणे मांडण्यात येणार होते. पण मीरवाईज यांना बोलावण्यापूर्वी समिती सदस्यांमध्ये वादावादी झाली. वादावादी आणि गदारोळामुळे बैठक काही काळ थांबवावी लागली. दिल्ली निवडणूक डोळ्यासमोर ठेवून संसदेत वक्फ दुरुस्ती विधेयकाचा अहवाल लवकरात लवकर सादर करण्याचा भाजप आग्रह धरत आहे, असा आरोपही यावेळी विरोधकांकडून करण्यात आला आहे. पण यावेळी झालेल्या गदारोळामुळे 10 विरोधी खासदारांवर कारवाईचा बडगा उभारण्यात आला आहे. यामध्ये कल्याण बॅनर्जी, मोहम्मद जावेद, ए. राजा, असदुद्दीन ओवैसी, नासिर हुसेन, मोहिबुल्लाह, एम. अब्दुल्ला, अरविंद सावंत, नदीमुह हक, इम्रान मसूद या खासदारांता समावेश आहे.
हेही वाचा… Madras HC : कार्यालयातील नकोसे वर्तनसुद्धा लैंगिक छळच, मद्रास हायकोर्टाचे महत्त्वाचे निरीक्षण
याबाबत खासदार अरविंद सावंत म्हणाले की, वक्फ बोर्ड संदर्भात JPC ची स्थापन केली आहे. मात्र, समितीचे काम विक्षिप्त पद्धतीने चालवले जात आहे. 21 तारखेच्या बैठकीत सांगितल जाते की, 4 वाजेपर्यंत तुमच्या सूचना द्या. पण जाणीवपूर्वक वेळ दिला जात नाही मतदारसंघातील कार्यक्रम सोडून आम्ही इथे पोहोचलो. विमानात बसल्यावर सांगतात की, क्लॉक बाय क्लॉक बैठक होणार नाही. आज अचानक सांगितले की उद्याची बैठक रद्द केली आहे, आता म्हणत आहेत 27 तारखेला बैठक होईल. मात्र, आम्ही विनंती केली की, 31 तारखेला ही बैठक घ्या किंवा 13 फेब्रुवारीनंतर बैठक घ्या, पण आमची विनंती धुडकावून लावली.
या समितीचा मनाप्रमाणे कारभार सुरू आहे, आम्ही गुलाम आहोत असे ते आम्हाला वागवत आहेत. पण भाजपा खासदार निशिकांत दुबे हे खोट्यांचे वकील आहेत. काहीही मुद्दे मांडले की त्यांच्या चेअरमनने उत्तर देण्याऐवजी निशिकांत दुबे उत्तर देतात. पण हे आम्हाला मुस्लिम धार्जिणे म्हणतात, मात्र मग हे स्वतः कशाला अजमेरला चादरी चढवायला जातात, असा टोला यावेळी खासदार अरविंद सावंत यांनी लगावला आहे. जेपीसीच्या बैठकीत झालेल्या गदारोळानंतर ही बैठक आता 27 जानेवारीपर्यंत तहकूब करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे.