भारतीय अंतराळ संशोधन संस्था इस्रोने आणखी एक यश मिळवलं आहे. चांद्रयान-3 हे 14 जुलैला प्रक्षेपित करण्यात आलं होतं. आता या चांद्रयान-3 नं चंद्राच्या परिघात यशस्वीरित्या एन्ट्री मारलेली आहे. जवळपास 22 दिवसानंतर इस्रोच्या मोहिमेला यश मिळालं आहे. 40 दिवसांच्या चांद्रयान मिशनमधील हा महत्त्वाचा टप्पा आहे. त्यामुळे आता पुढच्या टप्प्यात चंद्रावर उतरण्यासाठी पुढील 17 दिवस महत्त्वाचे असतील. 23 ऑगस्ट हा इस्रोसह भारताच्या इतिहासातील महत्त्वाचा दिवस असणार आहे. ( Watch First glimpses of the moon captured by Chandrayaan-3 )
चंद्राच्या कक्षेत प्रवेश करताच चांद्रयान-3 ने चंद्राचे काही फोटो घेतले आहेत, जे इस्रोच्या ट्विटर पेजवरून प्रसारित करण्यात आले आहेत. शनिवारी संध्याकाळी सात वाजण्याच्या सुमारास चांद्रयान-3 चंद्राच्या कक्षेत प्रवेश करण्याची प्रक्रिया सुरू झाली आणि ती यशस्वी झाल्याचं इस्रोने म्हटलंय. त्यामुळे आता चांद्रयान-3 चा चंद्राच्या भूमीवर लँड होण्याचा प्रवास सुरू झाला आहे.
आता 23 ऑगस्ट रोजी चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर चांद्रयान सॉफ्ट लँडिंगचा प्रयत्न करणार आहे. हा प्रयत्न जर का यशस्वी झाला तर अमेरिका, रशिया, चीननंतर भारत हा चंद्रावर पोहोचणारा चौथा देश ठरणारे. तसंच, चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर पोहोचणारा भारत हा पहिला देश ठरणार आहे.
The Moon, as viewed by #Chandrayaan3 spacecraft during Lunar Orbit Insertion (LOI) on August 5, 2023.#ISRO pic.twitter.com/xQtVyLTu0c
— LVM3-M4/CHANDRAYAAN-3 MISSION (@chandrayaan_3) August 6, 2023
चांद्रयान-3 चा पुढचा टप्पा कसा असेल ?
स्पेसक्राफ्ट पृथ्वीच्या पाच फेऱ्या पूर्ण केल्या आहेत. चांद्रयान-3 मोहिमेत लँडर, रोव्हर आणि प्रोपल्शन मॉड्यूल आहे. 16 ऑगस्टपर्यंत हे आता चंद्राभोवती भ्रमण करणार आहे. त्यानंतर 17 ऑग्सटला लँडर प्रोपल्शन मॉड्युलपासून वेगळं होईल. ते चंद्राच्या कक्षेत राहून पृथ्वीवरून येणारी रेंजची माहिती घेईल. तर लँडर पुढे जात 23 ऑगस्टला चंद्रावर उतरेल. लँडरच नाव विक्रम ठेवलं गेलं आहे. लँडर रोव्हरचं नाव मागच्या चांद्रयान-2 मोहिमेत घेतलं आहे. लँडरच नाव भारतीय अंतराळ संशोधनाचे जनक डॉक्टर विक्रम ए साराभाई यांच्या नावावर आहे. ही मोहिम चंद्राच्या एका दिवसाच्या बरोबर काम करेल. पृथ्वीच्या तुलनेत बोलायचं झालं तर 14 दिवस असतील.
( हेही वाचा: राज्यातील ४४ रेल्वे स्थानकांचा कायापालट होणार, मोदींच्या हस्ते ‘अमृत भारत स्थानक’ योजनेचा शुभारंभ )
असा असेल चांद्रयान-3 चा प्रवास
- 14 जुलैला चांद्रयान-3, 170 किमी ते 36500 किमी परिघात सोडलं होतं. चंद्राच्या दिशेने जाताना अंडाकृती फिरत ते जवळ जात होतं.
- 15 जुलैला चांद्रयान 3 चं परिघ वाढवून 41762 किमी ते 173 किमी केलं गेलं
- 17 जुलैला दुसऱ्यांदा परिघ वाढवण्यात आला आणि 41603 किमी ते 226 किमी करण्यात आला.
- 18 जुलैला तिसऱ्यांदा परिघ वाढवून 51400 किमी ते 228 किमी करण्यात आला
- 20 जुलै रोजी चौथ्यांदा परिघ वाढवून 71351 किमी ते 233 किमी इतका करण्यात आला.
- 25 जुलैला पाचव्यांदा परिघ वाढवण्यात आला आणि 1,27603 किमी ते 236 किमी करण्यात आला
- 31 जुलै आणि 1 ऑगस्टला मध्यरात्री पृथ्वीच्या कक्षेबाहेर जात चंद्राकडे प्रस्थान केलं.
- 5 ऑगस्टला चंद्राच्या कक्षेत प्रवेश केला.