नवी दिल्ली : आम्ही 2014मध्ये सत्तेत आलो होतो, तेव्हा जागतिक अर्थव्यवस्थेत दहाव्या क्रमांकावर होतो आणि आज आपण जगातील पाचव्या क्रमांकाची अर्थव्यवस्था बनलो आहोत. हे सहजच घडलेलं नाही. भ्रष्टाचाराच्या राक्षसाने देशाला जखडून ठेवले होते, लाखो करोडो रुपयांच्या घोटाळ्यांमुळे देशाची अर्थव्यवस्था डळमळीत झाली होती. आम्ही गळती थांबवली आणि मजबूत अर्थव्यवस्था बनवली, असा दावा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केला.
हेही वाचा – PM Modi : देशातील महिलांचे मोदींने केले कौतुक, सांगितला परदेशातील ‘तो’ प्रसंग
स्वातंत्र्यदिनानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज, मंगळवारी लाल किल्ल्यावरून देशाला संबोधित केले. गरीब कल्याणासाठी जास्तीत जास्त निधी खर्च करण्याचा आमचा प्रयत्न राहिला. देश जेव्हा आर्थिकदृष्ट्या समृद्ध होतो, तेव्हा गंगाजळीत भर तर पडतेच त्याचबरोबर देशाचे सामर्थ्य वृद्धिंगत होते, असे सांगून पंतप्रधान म्हणाले, तिजोरीतली पै आणि पै इमानदारीने जनताजनार्दनासाठी खर्च करण्याचा संकल्प घेतलेले सरकार असेल तर त्याचा प्रभाव दिसतोच. पाच वर्षांत साडेतेरा कोटी लोक गरिबीच्या श्रुंखला तोडत नव मध्यम वर्गाच्या रूपाने उभे राहिले आहेत, अशी माहितीही त्यांनी दिली.
तिरंगा ध्वजाला साक्ष ठेवून मी दहा वर्षांचा हिशेब देशवासीयांना देत आहे, असे सांगून मोदी म्हणाले, दहा वर्षांपूर्वी राज्यांना तीस लाख कोटी रुपये केंद्र सरकारकडून दिले जात होते. गेल्या नऊ वर्षांत हा आकडा शंभर लाख कोटी रुपयांवर पोहोचला आहे. पूर्वी स्थानिक विकासासाठी भारत सरकारकडून 70 हजार कोटी रुपये दिले जात असत, पण आज ही रक्कम तीन लाख कोटी रुपयांपेक्षाही जास्त झाली आहे. पूर्वी गरिबांच्या घरांसाठी नव्वद हजार कोटी रुपये खर्च केले जात होते. आज ही रक्कम चौपट होऊन चार लाख कोटी पेक्षाही जास्त रक्कम गरिबांसाठी घर उभारण्याकरिता खर्च केले जात आहेत.
हेही वाचा – आमचे सरकार येताच देशात रीफॉर्म, परफॉर्म आणि ट्रान्सफॉर्म…, मोदींनी मांडला 9 वर्षांचा लेखाजोखा
युरियाची बॅग जगभरातील काही बाजारात तीन हजार रुपयांना विकली जाते, ती बॅग माझ्या शेतकऱ्यांना तीनशे रुपयांत मिळावी यासाठी सरकार दहा लाख कोटी रुपये अनुदानापोटी देत आहे. मुद्रा योजनेत वीस लाख कोटीहून जास्त रक्कम देशातील युवकांना स्वरोजगारासाठी देण्यात आले आहेत. आठ कोटी लोकांनी नवा व्यवसाय सुरू केला आहे., इतकेच नव्हे तर, प्रत्येक व्यावसायिकाने एक किंवा दोन जणांना रोजगार पुरवला आहे. सूक्ष्म, लघु, मध्यम उद्योगांना सुमारे साडेतीन लाख कोटी रुपयांचे सहाय्य देत कोरोनाच्या संकटकाळातही त्यांचा व्यवसाय बुडू दिला नाही, त्यांना तग धरता आला. शिवाय, वन रॅन्क वन पेन्शन योजनेसाठी सत्तर हजार कोटी रुपये देशाच्या तिजोरीतून आज पोहोचले आहेत, असे पंतप्रधान म्हणाले.