आम्हाला फक्त पंतप्रधान मोदींचीच गरज आहे…, पाकिस्तान तरुणाचा व्हिडीओ व्हायरल

इस्लामाबाद : पाकिस्तानमधील एका यूट्यूब पत्रकाराचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये महिला पत्रकाराने एका पाकिस्तानी तरुणाला पाकिस्तानमधील अलीकडच्या परिस्थितीबद्दल विचारल्यानंतर त्याचा उद्वेग पाहायला मिळतो. पंतप्रधान नरेंद्र मोदी पाकिस्तानचे पंतप्रधान असते तर, आपणही चांगल्या किमतीत वस्तूंचा व्यापार करू शकलो असतो, असे सांगत त्याने पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाझ शरीफ यांना लक्ष्य केले आहे. पाकिस्तान आणि भारताची तुलना करणे थांबवावे, कारण दोन देशांमध्ये तुलना करण्यासारखे काहीही नाही, अशी टिप्पणी देखील त्याने केली आहे.

हा व्हिडीओ महिला पत्रकार सना अमजद यांचा आहे. सना अमजद यांनी, पाकिस्तानमध्ये ‘पाकिस्तान से जिंदा भागो, चाहे इंडिया चले जाओ’चे नारे पाकिस्तानात का लावले जात आहेत, असा प्रश्न एका युवकाला विचारला आहे. त्यावर त्या तरुणाने सांगितले की, एकतर माझा जन्म पाकिस्तानमध्ये व्हायला नको होता किंवा भारत आणि पाकिस्तानची फाळणी व्हायला नको होती. फाळणी झाली नसती तर आम्ही टोमॅटो 20 रुपये किलो, चिकन 150 रुपये किलो दराने विकत घेतले असते. सर्व काही योग्य किमतीत उपलब्ध झाले असते. ​​दुर्दैवाची गोष्ट अशी की, आपण इस्लामिक देशात आलो आहोत, पण इथे इस्लामची स्थापना करू शकलेलो नाहीत, असे त्याने म्हटले आहे.

मोदीच बनले असते पाकिस्तानचे तारणहार
आपल्याकडेही नरेंद्र मोदींसारखे पंतप्रधान असते तर, देशाची ही स्थिती झाली नसती. मोदी हे खूप चांगले नेते आहेत आणि संपूर्ण भारत देश त्यांना पाठिंबा देतो. जर आपल्याकडे नरेंद्र मोदी असते तर आम्हाला नवाझ शरीफ, बेनझीर, इम्रान खान आणि अगदी जनरल परवेझ मुशर्रफ यांची गरज नसती. आम्हाला फक्त पंतप्रधान मोदींचीच गरज आहे, कारण केवळ तेच या देशाला अशा वाईट परिस्थितीतून बाहेर काढू शकतात, असे सांगून त्या तरुणाने, भारत आज जगातील पाचवी सर्वात मोठी अर्थव्यवस्था म्हणून ओळखला जातो, याकडे लक्ष वेधले.

मोदी महान व्यक्ती
पंतप्रधान मोदींचे कौतुक करताना पाकिस्तानी तरुण म्हणाला, मला नरेंद्र मोदींच्या राजवटीत राहायचे आहे. मोदी अजिबात वाईट व्यक्ती नाहीत, उलट ते एक महान व्यक्ती आहेत, असे सांगून त्या तरुणाने म्हटले आहे की, मोदी आम्हाला मिळतील आणि त्यांनी संपूर्ण देशावर राज्य करत राहावे, अशी मी प्रार्थना करतो.