घर देश-विदेश जग आपल्याला बघतेय हे विसरता कामा नये..., सुप्रिया सुळे यांचा मोदी सरकारला...

जग आपल्याला बघतेय हे विसरता कामा नये…, सुप्रिया सुळे यांचा मोदी सरकारला सल्ला

Subscribe

मुंबई : चीन सरकारने नव्याने प्रसिद्ध प्रसिद्ध केलेल्या नकाशामध्ये अरुणाचल प्रदेशवर पुन्हा एकदा दावा करण्यात आला आहे. या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी ट्वीट केले आहे. चीनच्या नकाशाबरोबरच मणिपूर हिंसाचाराचा संदर्भ देत जग आपल्याला बघत असल्याचे विसरता कामा नये, असा सल्ला मोदी सरकारला दिला आहे.

- Advertisement -

प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवरून (एलएसी) दोन-तीन वेळा भारतीय हद्दीत घुसखोरी करण्याचा चिनी सैनिकांचा प्रयत्न भारतीय जवानांनी हाणून पाडला आहे. तरीही, भारतविरुद्ध चीनच्या कुरघोड्या सुरूच आहेत. चीन सरकारने नव्याने एक अधिकृत नकाशा प्रसिद्ध केला आहे. ज्यामध्ये भारतातील काही भाग चीनमध्ये दाखवण्यात आला आहे. भारतातील अरुणाचल प्रदेश आणि अक्साई चीन या भागाला चीनमध्ये दाखवण्यात आलं आहे. चीनचे सरकारी वृत्तपत्र ग्लोबल टाइम्सने ट्वीटरवर चीनने 2023 चा बनवलेला नकाशा शेअर केला आहे.

हेही वाचा – सरकारच्या ज्योतिषांनी म्हणे…, लोकसभा निवडणुकांवरून ठाकरे गटाचा भाजपावर निशाणा

- Advertisement -

याआधी देखील एप्रिल महिन्यात चीनच्या नागरी व्यवहार मंत्रालयाने अरुणाचल प्रदेशातील 11 ठिकाणांची नावे चिनी, तिबेटी आणि पिनयिन लिपीत प्रसिद्ध केली होती. यामध्ये दोन भूभागांची नावे, दोन निवासी क्षेत्रांची नावे, पाच पर्वतीय प्रदेशांची नावे आणि दोन नद्यांची नावे समाविष्ट होती. चीन सरकारच्या प्रांतीय परिषदेने या परिसराला जंगनन असे नाव ठेवून तो तिबेटच्या दक्षिणेकडील भाग असल्याचे म्हटले होते. त्यावेळी भारताने तीव्र आक्षेप घेत नावांच्या या याद्या फेटाळून लावल्या होत्या.

मणिपूरमध्ये देखील हिंसाचाराचा आगडोंब उसळला होता. तिथे दोन महिलांची विवस्त्र धिंड काढण्यात आल्याचा व्हिडीओ व्हायरल झाल्यावर देशभरातून संताप व्यक्त झाला. विरोधकांनी या हिंसाचारावर संसदेत चर्चा घेण्याची आग्रही मागणी केली. त्यावरून सरकारविरोधात अविश्वास ठरावही मांडण्यात आला. पण तरीही, सरकारने ठोस भूमिका जाहीर केली नसल्याचा आरोप विरोधकांनी केला आहे.

हेही वाचा – संजय राऊत यांची देशविरोधक संघटनेशी जवळीक! नितेश राणेंना खात्री, एटीएसला पत्र

या दोन्ही घडामोडींच्या पार्श्वभूमीवर खासदार सुप्रिया सुळे यांनी ट्वीट केले आहे. भाजपाच्या शासनकाळातील परराष्ट्र धोरणाची कठोर चिकित्सा करण्याची वेळ आता आली आहे. युरोपीयन संसदेत मणिपूर संदर्भात ठराव येतो, भूभागावरील हक्क आणि वादग्रस्त नकाशे प्रकाशित केल्यामुळे आपल्या तटस्थ मित्रराष्ट्रासोबतचे संबंध ताणले जातात. याखेरीज धार्मिक व वांशिक अल्पसंख्याकांच्या विरोधातील राजकीय अजेंड्यामुळे परराष्ट्र धोरण प्रभावित झाले, हे नाकारता येत नाही, असे खासदार सुळे यांनी म्हटले आहे.

हेही वाचा – जागावाटपाची घाई कशासाठी – फारुख अब्दुल्ला

या घटनांमुळे देशाच्या प्रतिमेवर अतिशय गंभीर प्रश्न उभे राहिले आहेत. जगाचे या सगळ्या गोष्टींकडे बारीक लक्ष आहे, तुम्ही ते लपवू शकत नाही. शब्दांपेक्षा कृती महत्त्वाची असून या सगळ्यांची समीक्षा आवश्यक आहे. जग आपल्याला बघत आहे, हे विसरता कामा नये, असा सल्ला त्यांनी दिला आहे.

- Advertisment -