घरदेश-विदेशआधी कुंकू लाव..., कर्नाटकच्या खासदाराने संभाजी भिडेंची ओढली री!

आधी कुंकू लाव…, कर्नाटकच्या खासदाराने संभाजी भिडेंची ओढली री!

Subscribe

बंगळुरू : महिला पत्रकाराला कुंकू लावण्याचा सल्ला देणाऱ्या शिवप्रतिष्ठानचे संस्थापक संभाजी भिडे यांची री कर्नाटकच्या एका खासदाराने ओढली आहे. एका महिला दुकानदाराने कुंकू न लावल्याबद्दल या खासदाराने तिला दम दिला होता. त्यावरून संभाजी भिडे यांच्याप्रमाणेच या खासदारावर देखील टीका होत आहे.

कर्नाटकातील कोलार जिल्ह्याचे भाजप खासदार एस मुनीस्वामी यांनी 8 मार्च 2023 रोजी महिला दिनानिमित्त प्रदर्शन आणि विक्री मेळ्याचे उद्घाटन केले. त्यावेळी कपाळावर कुंकू नसलेल्या एका महिलेला ते ओरडत असल्याचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. “आधी कुंकू लाव, तुझा नवरा जिवंत आहे ना? तुझ्याकडे कॉमन सेन्स नाही का?” असे खासदार एस. मुनीस्वामी यांनी या महिलेला म्हटले आहे.

- Advertisement -

महिलेला ओरडत असलेला खासदाराचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. त्यावर महिला तीव्र प्रतिक्रिया देत आहेत. खासदार ए. मुनीस्वामी यांनी महिलांचा आदर करावा, असा सूर या महिलांचा आहे. काँग्रेसने या घटनेचा तीव्र निषेध केला आहे. अशा घटनांद्वारे भाजपाची संस्कृती दिसते, असे काँग्रेसने म्हटले आहे. तथापि, खासदार एस. मुनीस्वामी यांनी यावर कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही.

- Advertisement -

संभाजी भिडेंच्या वक्तव्यावरून झाला होता वाद
शिवप्रतिष्ठानचे संस्थापक संभाजी भिडे गेल्या नोव्हेंबरमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेण्याकरता मंत्रालयात गेले होते. या भेटीनंतर, संभाजी भिडे यांच्याशी बोलण्याकरिता एक महिला पत्रकार पुढे आली. त्यांनी संभाजी भिडे यांना प्रश्न विचारण्यास सुरुवात केली. मात्र, त्यांनी तिला अडविले. प्रत्येक स्त्री भारतमातेस्वरुप असते. भारतामाता ही विधवा नाही. त्यामुळे तू आधी कुंकू लाव, मगच मी तुझ्याशी बोलतो, असे संभाजी भिडे म्हणाले होते.

त्यांच्या या वक्तव्यावरून राज्यात तीव्र प्रतिक्रिया उमटल्या होत्या. त्याची दखल राज्य महिला आयोगानेही घेतली होती. महिला पत्रकाराने कपाळावर टिकली लावली नाही म्हणून आपण तिच्या प्रश्नावर प्रतिक्रिया देण्यास नकार दिला आहे. स्त्रीचा तिच्या कर्तृत्वाने सिद्ध होत असतो. आपले वक्तव्य स्त्री सन्मानाला आणि सामाजिक दर्जाला ठेच पोहोचवणारा आहे. त्यामुळे तुमच्या भूमिकेचा खुलासा करण्यास राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष रुपाली चाकणकर यांनी त्यांना सांगितले होते.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -