मुंबई : गेल्या काही दिवसांपासून देशातील राज्यांच्या तापमानात विविध बदल होत असल्याचे पाहायला मिळत आहे. महाराष्ट्रातही तापमानाचा पारा कधी वाढताना तर कधी कमी होताना पाहायला मिळत आहे. परंतु, आता हवामान विभागाकडूनच देशातील काही राज्यांना चिंतेत टाकणारी बातमी देण्यात आली आहे. बंगालच्या उपसागरात चक्रीवादळ निर्माण झाले असून यामुळे देशातील काही राज्यांमध्ये मुसळधार आणि काही राज्यांमध्ये अतिमुसळधार पावसाची शक्यता असल्याचे हवामान विभागाकडून सांगण्यात आले आहे. बंगालच्या उपसागरात तयार झालेल्या चक्रीवादळामुळे एकूण 13 राज्यांना पावसाचा फटका बसणार आहे. (Weather Update Big change in climate, heavy rain warning for these states by Meteorological Department)
बंगालच्या उपसागरात तयार झालेल्या चक्रीवादळामुळे पूर्वोत्तर भारतामधील अरुणाचल प्रदेश, आसाम, मेघालय, नागालँड, मणिपूर, मिझोरम, त्रिपूरा, पश्चिम बंगाल आणि सिक्किम या राज्यांना फटका बसू शकतो. या राज्यांमध्ये पुढील सात दिवस मध्यम ते हलक्या पावसाची हजेरी लागू शकते, असा अंदाज हवामान विभागाकडून व्यक्त करण्यात आला आहे. त्याशिवाय, उत्तर भारतामध्ये हिमाचल प्रदेश आणि उत्तराखंडमध्ये मध्यम पावसासोबतच बर्फवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे. सोबतच पंजाब, हरियाणा, राजस्थान आणि उत्तर प्रदेशमध्ये पुढील दोन दिवस मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे.
या चक्रीवादळाचा फटका बिहार, झारखंड आणि पश्चिम बंगालच्या अनेक जिल्ह्यांनाही बसण्याची शक्यता आहे. या राज्यांमधील काही जिल्ह्यांमध्ये या चक्रीवादळामुळे पुढील दोन दिवस अतिमुसळधार पावसासह वादळी वाऱ्याची शक्यता आहे. हवामान विभागाने व्यक्त केलेल्या अंदाजानुसार, पुढील काही दिवस या चक्रीवादळाचा प्रभाव राहणार असून, काही भागांमध्ये जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे, तर काही भागांमध्ये तापमानाचा पारा खाली जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे सध्या असलेल्या थंडीपेक्षा कडाक्याची थंडी पडू शकते. बंगालच्या उपसागरातील या चक्रीवादळाचा महाराष्ट्राला कोणताही फटका बसणार नाही. परंतु, महाराष्ट्राच्या तापमानात वाढ होऊ शकते. सध्या महाराष्ट्रातील अनेक भागांमध्ये दुपारच्या वेळी तापमानाचा पारा वाढल्याचे पाहायला मिळत आहे.