Sunday, March 16, 2025
27 C
Mumbai
Homeदेश-विदेशWedding Ceremony : बस्स् संतापलेल्या वधूने मंडपातच दिला लग्नाला नकार..., कारण काय?

Wedding Ceremony : बस्स् संतापलेल्या वधूने मंडपातच दिला लग्नाला नकार…, कारण काय?

Subscribe

जयमाला विधी झाल्यानंतर वऱ्हाडी मंडळी जेवायला बसले. जेवणादरम्यान मटण वाढण्यास उशीर झाला. यावरून शब्दाने शब्द वाढत गेला. मटण खाण्यावरून वरपक्षातील पाहुण्यांनी गोंधळ घातला. वरपक्ष आणि वधू पक्षात जोरदार हाणामारी झाली.

रांची : लग्नाच्या गाठी या स्वर्गात बांधल्या जातात, असे म्हणतात. पण एखाद्या क्षुल्लक कारणाने ही गाठ बसता बसता राहून जाते, असेही चित्र पाहायला मिळते. झारखंडमधील हजारीबाग जिल्ह्यात अशीच एक घटना घडली आहे. क्षुल्लक कारणावरून विवाह सोहळ्यात वादंग निर्माण झाला आणि संतप्त वधून भर मंडपातच लग्नाला नकार दिल्याचा प्रकार घडला. (Wedding Ceremony: The bride refused the marriage due to a dispute over mutton)

झारखंडमधील हजारीबाग जिल्ह्यात एका लग्नसोहळ्यात मटणावरून गोंधळ झाला. यावरून निर्माण झालेला वाद एवढा विकोपाला गेला की, वर पक्षातील वऱ्हाड्यांनी वधूपक्षाकडील लोकांना मारहाण करण्यास सुरुवात केली. वधूपक्षानेही त्यांना जशास तसे उत्तर दिले. त्यामुळे दोन्ही बाजूंनी जोरदार हाणामारी झाली. याच गोंधळात वरमुलगा निघून गेला. आपल्या लग्नात झालेला हा गोंधळ पाहून वधूने थेट लग्नास नकार दिला. पालकांनीही तिच्या या निर्णयाला पाठिंबा दिला.

हेही वाचा – Politics : मंत्रिमंडळ विस्तार लवकरच; मुख्यमंत्र्यांच्या वक्तव्यावर जयंत पाटील म्हणतात, बरेच आमदार…

मिळालेल्या माहितीनुसार, चौपारण ब्लॉकच्या गोविंदपूरतांड गावातील प्रल्हाद गिरी यांच्या मुलीचे लग्न कोडरमा जिल्ह्याच्या गवाणपूर कानको येथील रहिवासी रामकृत गिरी यांच्या मुलाशी निश्चित झाले होते. मंगळवारी रात्री ही मिरवणूक गोविंदपूरतांड येथे पोहोचली. जयमाला विधी झाल्यानंतर वऱ्हाडी मंडळी जेवायला बसले. जेवणादरम्यान मटण वाढण्यास उशीर झाला. यावरून शब्दाने शब्द वाढत गेला. मटण खाण्यावरून वरपक्षातील पाहुण्यांनी गोंधळ घातला. वरपक्ष आणि वधू पक्षात जोरदार हाणामारी झाली. लग्नातील काही वऱ्हाडी नवरदेवाला सोबत घेऊन निघून गेले. तथापि, वराने नंतर लग्नाला होकार दिला असला तरी वधू मात्र नकारावर ठाम राहिली. तिच्या घरच्यांनीही तशीच भूमिका घेतल्याने लग्नाची वरात वधूला सोबत न घेताच परतली.

तेलंगणातही घडला होता असाच प्रकार

तेलंगणामध्ये गेल्यावर्षी डिसेंबर महिन्यात असाच प्रकार घडला होता. वधूकडील मंडळींनी वर पक्षाकडील वऱ्हाडींसाठी ठरवलेल्या मांसाहारामध्ये मटण बोन मॅरोचा समावेश न केल्याने वर पक्षाकडील मंडळी नाराज झाले आणि त्यांनी लग्न मोडण्याचा निर्णयच घेऊन टाकला. वधू निजामाबादची, तर वर जगतियालचा होता. नोव्हेंबरमध्ये नातेवाईकांच्या उपस्थितीत दोघांचाही साखरपुडा पार पडला होता. तर ठरलेल्या दिवशी लग्नासाठी वर आणि त्याचे नातेवाईक हजरही झाले होते. परंतु फक्त लग्न पंगतीत मटण बोन मॅरो न वाढल्याने नवरदेवाने लग्न मोडत असल्याचे जाहीर केले. हे प्रकरण पोलिसांकडे गेल्यावर त्यांनीही वर पक्षाला समजवण्याचा प्रयत्न केला, मात्र काही उपयोग झाला नाही. नवरदेवाने हे लग्नच मोडले.

हेही वाचा – Vishalgad violence : हिंसाचाराची घटना शासन पुरस्कृत, सरकारने खरा सूत्रधार समोर आणावा – वडेट्टीवार


Edited by Manoj S. Joshi