वॉशिंग मशिनच्या माध्यमातून पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जींची भाजपावर टीका

कोलकाता : तृणमूल काँग्रेसच्या प्रमुख आणि पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी (West Bengal Chief Minister Mamata Banerjee) यांनी बुधवारी आगळ्यावेगळ्या पद्धतीने केंद्र सरकारवर निशाणा साधला आहे. कोलकाता येथे आयोजित केलेल्या धरणे आंदोलनात त्यांनी स्टेजवर ‘भाजपा वॉशिंग मशीन’ (BJP washing machine) दाखवले. या वॉशिंग मशिनच्या माध्यमातून ममता बॅनर्जी यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर भ्रष्टाचाराचे आरोप असलेल्या नेते कसे दोषमुक्त होतात, याचा खरपूस समाचार घेतला.

घरगुती गॅसच्या वाढत्या किमती, राज्य सरकारचा निधी जारी न करणे आणि केंद्रीय यंत्रणांचा गैरवापर याच्याविरोधात तृणमूल काँग्रेसतर्फे धरणे आंदोलन करण्यात आले. यावेळी हे वॉशिंग मशीन स्टेजवर आणण्यात आले. तृणमूल काँग्रेसने या वॉशिंग मशीनचा व्हिडीओ आपल्या अधिकृत ट्विटर हँडलवर शेअर केला आहे. व्हिडीओमध्ये बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी मशीनमध्ये आधी काळे कपडे टाकताना आणि नेतर मशिनमधून पांढरे कपडे काढताना दिसतात. “भाजपा वॉशिंग मशीन”…. “भाजपा वॉशिंग मशीन”… अशा घोषणा तृणमूल काँग्रेसचे नेते आणि कार्यकर्त्यांनी दिल्या.

केंद्रीय तपास यंत्रणा विरोधी पक्षांच्या नेत्यांना त्रास देत आहेत, पण भाजपमध्ये सामील झालेल्या कोणत्याही नेत्याची चौकशी सुरू करत नाहीत, असे सांगून ममता बॅनर्जी म्हणाल्या, मला धरणे आंदोलन करण्याचा पूर्ण अधिकार आहे. गरज पडल्यास मी पंतप्रधानांच्या निवासस्थानीही धरणे धरू शकतो.

हैदराबादेतही झळकले होते पोस्टर्स
पोस्टरच्या माध्यमातून तेलंगणाचे मुख्यमंत्री केसीआर यांच्या बीआरएसने (Bharat Rashtra Samithi) भाजपावर हल्लाबोल केला होता. इतर पक्षांतून भाजपमध्ये प्रवेश करणाऱ्या नेत्यांवर कोणताही डाग नसल्याचे तसेच छापेमारीही होत नसल्याचे पोस्टर्स हैदराबादमध्ये ठिकठिकाणी लावले होते. दिल्लीतील राज्य उत्पादन शुल्क धोरण घोटाळ्याप्रकरणी सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) केसीआर यांची मुलगी के. कविता (K Kavitha) यांची चौकशी सुरू आहे. या पार्श्वभूमीवर हैदराबादच्या रस्त्यांवर लावलेल्या पोस्टर्सवर मध्य प्रदेशचे नेते व केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया, आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा, महाराष्ट्राचे नेते व केंद्रीय मंत्री नारायण राणे, पश्चिम बंगालचे नेते सुवेंदू अधिकारी यांचे फोटो होते. ईडी-सीबीआयच्या छाप्यानंतर या सर्व नेत्यांनी इतर पक्षांतून भाजपामध्ये प्रवेश केला आणि त्यांचा कलंक धुतला गेल्याचे पोस्टरमध्ये दाखवण्यात आले होते. तर, कविता यांच्या फोटोला ‘खरा रंग कधीच विटत नाही’ अशी कॅप्शन दिली होती.