Mamata Banerjee Delhi Visit: ममता बॅनर्जी आज सोनिया गांधींना भेटण्याची शक्यता

West Bengal Chief Minister Mamata Banerjee To Meet Sonia Gandhi
Mamata Banerjee Delhi Visit: ममता बॅनर्जी आज सोनिया गांधींना भेटण्याची शक्यता

पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी आज काँग्रेस राष्ट्रीय अध्यक्ष सोनिया गांधींना भेटण्याची शक्यता आहे. त्रिपुरातील भाजप आणि टीएमसीमधील तणावादरम्यान काल, सोमवारी रात्री मुख्यमंत्री ममता बॅनर्जी दिल्ली पोहोचल्या. ममता बॅनर्जीचा हा दिल्ली दौरा पहिल्यापासून ठरलेला होता.

रविवारी त्रिपुरात टीएमसी यूथ ब्रिगेडच्या अध्यक्ष सायोनी घोष यांच्या अटकेविरोधात सोमवारी रात्री टीएमसीच्या खासदारांनी गृहमंत्र्यांची भेट घेऊन नाराजी व्यक्त केली. दरम्यान गृहमंत्र्यांना भेटण्यासाठी वेळ मिळत नसल्यामुळे दिवसभर नार्थ ब्लॉक समोर टीएमसी खासदारांनी निषेध दर्शवला. मिळालेल्या माहितीनुसार, २४ नोव्हेंबरला ममता बॅनर्जी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना भेटण्याचा कार्यक्रम आहे. त्यानंतर २५ नोव्हेंबरला त्या दिल्लीहून परतणार आहेत. दिल्ली दौऱ्याबाबत ममता बॅनर्जी म्हणाल्या की, ‘मी आपल्या दिल्ली दौऱ्यामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना भेटणार आहे. बीएसएफच्या अधिकार क्षेत्रच्या विस्तारावरील मुद्दा त्यांच्या समोर मांडले.’

दरम्यान त्रिपुरात टीएमसी कार्यकर्त्यांनी आपल्यावर हल्ला केल्याचा आरोप केला आहे. त्यांनी असा आरोप केला आहे की, त्रिपुराच्या अगरतला येथील एका पोलीस ठाण्यात घुसून भाजप कार्यकर्त्यांनी त्यांना मारहाण केली. त्रिपुरा पोलिसांसमोर भाजप कार्यकर्त्यांनी लाठ्यांनी मारहाण केली आणि त्यांच्यावर दगडफेक करण्यात आली.

सध्या संसदेच्या अधिवेशनापूर्वी ममता बनर्जी यांचा तीन दिवसीय दिल्ली दौरा अत्यंत महत्त्वाचा मानला जात आहे. तीन कृषी कायदे मागे घेतल्यानंतर बीएसएफच्या अधिकारांसह इतर अनेक मुद्द्यांवर केंद्र सरकारला घेराव घालण्यासाठी विरोधकांना एकत्र करण्याचा प्रयत्न करत असल्याचं बोललं जात आहे. सुत्रांच्या माहितीनुसार, मुख्यमंत्री ममता बॅनर्जी काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांशिवाय इतर विरोधी पक्षांच्या नेत्यांना भेटण्याची शक्यता आहे.


हेही वाचा – एमएसपीवर कायदा करा अन् मृत शेतकऱ्यांना शहिदांचा दर्जा द्या, शेतकरी नेते राकेश टिकैत यांची मागणी