धक्कादायक! झाडांवर थाटलं क्वारनटाईन होम

social distance in apmc market in navi mumbai

जगभरात थैमान घालणाऱ्या कोरोना व्हायरसने भारतातही हाहाकार उडवला आहे. कोरोनाच्या दहशतीने जनजीवन विस्कळीत झाले आहे. देशात २१ दिवसांसाठी लॉकडाऊन झाल्याने शहरांमध्ये रोजंदारीवर काम करणाऱ्या मजूर व कामगार वर्गाने गावाची वाट धरली. मात्र तिथे गेल्यावर त्यांना क्वारनटाईन करण्यात आले. पण अनेकांनी झाडांवरच क्वारनटाईन होम थाटल्याचे धक्कादायक चित्र पश्चिम बंगालमध्ये बघावयास मिळत आहे. एएनआयने याबद्दल वृत्त दिले आहे.

हेच चित्र भारतातील अनेक गावांमध्येही बघायला मिळत आहे. कामधंदाच नसल्याने मोठ्या संख्येने नागरिक गावांकडे निघाले आहेत. मात्र कोरोनाचा संसर्ग होऊ नये म्हणून या सर्व नागरिकांना तेथील आरोग्य प्रतिनिधी क्वारनटाईनचा सल्ला देत आहेत. आपल्यामुळे कुटुंबीय व इतरांना कोरोनाची लागण होऊ नये या भीतिने सर्वजण क्वारनटाईनसाठी तयारही होत आहेत. पण गावातील छोट्या घरांमध्ये क्वारनटाईनसाठी स्वतंत्र खोलीच नसल्याने त्याला पर्याय म्हणून कोणी शेतात तर तर काही जणांनी गोठ्यात राहण्यास सुरुवात केली आहे. पश्चिम बंगालमधील पुरुलिया य़ेथे चेन्नईतून आलेल्या मजूरांनी  झाडांवर मचाण बांधून आधार घेतला आहे. पण गंभीर बाब म्हणजे यातील अनेकजण दिवसभर गावभर हिंडतात आणि रात्री झाडांवर क्वारनटाईन होतात. यामुळे ग्रामीण भागात कोरोनाचा धोका वाढण्याचीच शक्यता अधिक असल्याचे वर्तवली जात आहे.