West Nile Fever Virus : केरळात टोमॅटो फ्लूनंतर West Nile व्हायरसचा धुमाकूळ, एका रूग्णाचा मृत्यू

केरळात टोमॅटो फ्लूनंतर (Tomato Flu) आता वेस्ट नाईल व्हायरसचाही (West Nile Fever Virus ) प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढत आहे. कोरोनाच्या रूग्णसंख्येत (Corona virus) घट होत असतानाच आता केरळमध्ये (kerala) वेस्ट नाईल तापामुळे एका ४७ वर्षीय व्यक्तिचा मृत्यू झाला आहे. तीन वर्षानंतर केरळात पुन्हा एकदा या व्हायरसमुळे एकाचा मृत्यू झाला आहे. यापूर्वी २०१९ मध्ये ६ वर्षांच्या मुलाचाही या वेस्ट नाईल व्हायरसच्या तापामुळे मृत्यू झाला होता.

यापूर्वी मृत्यू झालेल्या व्यक्तिला १७ मे रोजी ताप आणि इतर लक्षणं आढळून आली आहेत. त्यांना थ्रिसूरच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल करण्यात आले आहे. मात्र, त्याची लक्षणं दिसून आल्यानंतर त्याचा मृत्यू झाला. वेस्ट नाईल तापाने मृत्यू झाल्यानंतर आरोग्य विभागही सतर्क झाला आहे. यानंतर ती व्यक्ती राहत असलेल्या ठिकाणी वैद्यकीय पथकही पाठवण्यात आले आहे. येथे सर्व नमुने घेतले जात आहेत. हा विषाणू डासांमुळे पसरतो, त्यामुळे डासांची उत्पत्ती करणाऱ्या जागा संपवण्यात येत आहेत.

केरळचे आरोग्यमंत्री वीणा जॉर्ज यांनी सांगितले की, डासांची उत्पत्ती होण्यापासून रोखलं पाहिजे. याची जबाबदारी प्रत्येकाने घेऊन आपल्या सभोवताली स्वच्छता ठेवली पाहीजे. ड्रेनेज आणि साचलेले पाणी स्वच्छ करणं महत्त्वाचं आहे.

काय आहे West Nile व्हायरस?

जागतिक आरोग्य संघटनेनुसार, वेस्ट नाईलचे पहिले प्रकरण १९३७ मध्ये नोंदवण्यात आले होते. त्यानंतर युगांडामध्ये राहणाऱ्या एका महिलेला याची लागण झाली आहे.

१९५३ मध्ये, हा विषाणू इजिप्तच्या उत्तर प्रदेशांत पक्ष्यांमध्ये आढळला आहे. त्यानंतर हा विषाणू कावळे आणि कबुतरांमध्ये देखील आढळून आला आहे. १९९७ पूर्वी हा विषाणू पक्ष्यांसाठी जास्त धोकादायक समजला जात नव्हता. परंतु इस्राईलमध्ये या विषाणूचा धोकादायक प्रकार उघडकीस आला. त्यामुळे अनेक पक्ष्यांचा मृत्यू झाला. जागतिक आरोग्य संघटनेनुसार, ५० वर्षांत अनेक देशांमध्ये मानवांना या विषाणूची लागण झाल्याची प्रकरणं नोंदवण्यात आली आहेत.

हा विषाणू माणसांमध्ये कसा पसरतो?

हा विषाणू माणसांमध्ये पसरण्यामागे सामान्यतः डास कारणीभूत असल्याचे सांगितले जात आहे. हा विषाणू पक्ष्यांमध्ये पसरतो. तसेच हा विषाणू पक्ष्यांकडून डासांमध्ये आणि डासांपासून मानवांमध्ये पसरतो.

लक्षणे काय आहेत?

वेस्ट नाईल व्हायरसमुळे ताप, डोकेदुखी, थकवा, उल्ट्या आणि कधीकधी त्वचेवर लाल ठिपके येतात. संक्रमित १५० पैकी फक्त एकात गंभीर लक्षणं आढळून येतात. या व्हायरसपासून बचाव करण्यासाठी आजूबाजूला साफ-सफाई ठेवणं गरजेचं आहे. तसेच या विषाणूची लागण झाल्यानंतर कोणत्याही वयोगटातील लोकांना गंभीर आजार होऊ शकतो. यामध्ये ५० वर्षांवरील व्यक्तींचा समावेश आहे.


हेही वाचा : मंकीपॉक्ससंदर्भात केंद्राकडून नियमावली जारी करण्यात येणार, केंद्र सरकार अलर्ट मोडवर