घरCORONA UPDATECovid-19 च्या दुसऱ्या लाटेत भारतीयांनी Google वर काय शोधलं ? वाचा

Covid-19 च्या दुसऱ्या लाटेत भारतीयांनी Google वर काय शोधलं ? वाचा

Subscribe

गुगलवर कोरोनाच्या निमित्ताने युजर्स काय सर्च करतात याचा एक अहवाल नुकताच गुगलच्या माध्यमातून शेअर करण्यात आला आहे. आपल्या भागातील बातम्या, लसीसंबंधीची माहिती, लसीबाबतचे खोटे दावे, लसीकरण केंद्र यासारखी माहिती शोधण्याचा गुगलवरील ट्रेंड आता बदलला आहे. एरव्ही covid-19 बाबतची प्रत्येक छोट्यातली छोटी माहिती शोधण्याचा ट्रेंड आता काळी बुरशी आणि म्युकरमायकोसिस (black fungus & mucormycosis) शोधण्यासाठी शिफ्ट झालेला आहे. covid-19 च्या महामारीच्या काळात आता कोरोनाच्या माहितीची जागा ही काळ्या बुरशीने आणि म्युकरमायकोसिसने घेतली आहे. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत कोरोनापेक्षा आता काळ्या बुरशीची माहिती शोधण्यासाठी नेटकरांचा भर आहे.

कोरोनाच्या पहिल्या लाटेमध्ये युजर्समार्फत कोरोनाच्या आजाराबाबतची माहिती युजर्समार्फत मोठ्या प्रमाणात शोधण्यात येत होती. कोरोनाचा संसर्ग आणि कोरोनाच्या प्रत्येक छोट्या माहितीचा शोध युजर्सने या काळात घेतला. पण कोरोनाच्या दुसऱ्या लाटेनंतर माहितीच्या शोधाचा पॅटर्न मात्र बदलला. पण माहिती शोधण्याचे प्रमाण मात्र अनेक पटीने वाढले असल्याचे गुगल मॅप्सचे (दक्षिण आशिया) चे वरिष्ठ प्रोग्राम मॅनेजर अनल घोष यांनी इंडियन एक्सप्रेस या संकेतस्थळाशी बोलताना स्पष्ट केले.

- Advertisement -

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमध्ये गुगलने एक नवीन फीचर सुरू केले ते म्हणजे रिअल टाईम हॉस्पिटल बेड्स आणि ऑक्सिजनची उपलब्धतता रिअल टाईम पद्धतीने दाखवणे. गुगलने हे फीचर लॉंच केल्यानंतर या शोधासाठी सर्वाधिक अशी मागणी होती. गुगलने क्राऊड सोर्सिंवर आधारीत असे हे फीचर लॉंच केल्यानंतर यासाठी अनेकांनी पसंती दिली. हा प्रचंड प्रतिसाद पाहूनच संपुर्ण भारतभरामध्ये हा प्रयोग करण्याची सुरूवात झाली. कोरोना काळात युजर्सना विश्वासार्ह माहिती पुरवणे आणि वेळीच माहिती देणे हे आमचे उदिष्ट होते. ज्या हॉस्पिटलमध्ये कोरोना रूग्णांवर उपचार होतात, अशा हॉस्पिटलची माहिती देण्याचेच आम्ही लक्ष्य ठेवले. गुगलने गुगल मॅपवर अनेक ऑक्सिजन पुरवठादार समाविष्ट केले होते.

अनेक ठिकाणी युजर्स जेव्हा प्रत्यक्षात त्याठिकाणी पोहचले तेव्हा गुगलमार्फत या युजर्सना प्रश्न विचारण्यात आले. त्यामध्ये बेड्स आणि ऑक्सिजन उपलब्धततेबाबतचे प्रश्न होते. तसेच अनेकांनी प्रायोगिक तत्वावर हे फीचर वापरताना अशा युजर्सचाही फीडबॅक नमुद करून घेण्यात आला. गुगलमार्फत अवघ्या २४ तासांसाठीच हा फीडबॅक घेण्यात आला. कारण अनेकदा माहिती बदलत असल्याने गुगलने हा प्रयोग केला होता. सुरूवातीला मिळणारी माहिती काही ठराविक तासांच्या अंतराने बदलणारी अशी होती. त्यामुळेच जसजसा प्रतिसाद येत गेला, त्यानुसार आम्ही ही माहिती तासानुसार अपडेट करत गेलो. त्यामुळे ज्या तासाला माहिती मिळत होती, त्यानुसार ही माहिती आम्ही प्रसिद्ध करत गेलो.

- Advertisement -

फक्त पाच राज्यांमध्ये हा प्रायोगिक प्रकल्प राबविण्यात आला. पण माहितीचे स्वरूप हे अनिश्चित स्वरूपाचे असल्यानेच अतिशय काटेकोर पद्धतीने माहिती गोळा करण्यात आली. आम्ही हे फीचर संपुर्ण भारतात लॉंच करण्याच्या तयारीत आहोत. तसेच याचा वापर अधिकाधिक लोकांना व्हावा यासाठी प्रयत्नशील आहोत, असेही ते म्हणाले. गुगलने भारतात ही माहिती मिळवण्यासाठी एक टीम नेमली होती. त्यामध्ये कोरोनाशी संबंधित आकडेवारी गोळा करण्यात येत होती. त्यामध्ये सर्वाधिक अपडेटेड माहिती मिळावी हे उदिष्ट टीमने ठेवले होते.

कोरोना लसीबाबत माहिती

जेव्हा २०२१ मध्ये कोरोना लसीकरणाचा कार्यक्रम सुरू झाला, तेव्हा कोरोना लसीची माहिती शोधण्यासाठीही युजर्सचा शोध सुरू झाला. त्यामुळे लसीबाबत माहिती मिळवण्याची युजर्सची धडपड यामधून दिसून आली. गुगलच्या ट्रेंडमध्येही लसीबाबत नागरिक माहिती मिळवत आहेत, ही आकडेवारी समोर आली. जेव्हा केंद्र सरकारने प्रौढांसाठी लसीकरणाची मोहीम सुरू केली, तेव्हा अधिक युजर्सकडून लसीबाबत माहिती शोधण्याचा ट्रेंड सुरू झाला. त्यामुळे गुगललाही गुगल मॅपवर माहिती देताना लसीकरण केंद्रांची माहिती देण्यासाठी पुढाकार घ्यावा लागला. तसेच कोरोना लसीचे फायदे, लसीकरणाची उपयुक्तता, लसीकरण केंद्राचा पत्ता अशा अनेक प्रकारच्या माहितीसाठी गुगलला उत्तरे तयार करावी लागली.

नपुसंकता ते मासिक पाळीतले लसीकरण

त्यामुळेच जेव्हा कधी युजर्स लसीकरणाबाबत माहिती शोधतात तेव्हा लसीकरणाबाबतच्या गैरसमजुती आणि योग्य माहिती, खरी आकडेवारी, योग्य माहिती अशा स्वरूपाचा डेटा पुरवण्याचा गुगलचा प्रयत्न असतो. अनेक युजर्स गुगलवर लसीकरणाशी संबंधी माहिती शोधताना विविध प्रकारच्या गोष्टी शोधतात. त्यामध्ये पुरूषांकडून infertility वर या लसीचा परिणाम होतो का ? याबाबतची माहिती शोधली जाते. तर महिलांमध्ये लसीचा परिणाम हा मासिक पाळीवर होतो का ? तसेच स्तनदा मातां लस घेऊ शकतात का ? अशा सगळ्या माहितीचा शोध युजर्सने गुगलवर घेतला. अनेक युजर्सच्या माहितीचा शोध हा लसीबाबतचा होता. त्यामध्ये लसीकरण केंद्र शोधण्यावर युजर्सचा जास्त भर होता. त्याचाच उपयोग हा गुगलच्या मॅपवरही करण्यात आला. भारतात २५०० लसीकरण केंद्रापैकी २३०० लसीकरण केंद्राचा डेटा गुगल मॅपवर अपलोड करण्यात आला. तर अनेक युजर्सकडून नजीकच्या लसीकरण केंद्राची माहिती शोधण्यासाठीचा भर होता.

आता काळ्या बुरशी शोधली जातेय

कोरोनाच्या पहिल्या लाटेमध्ये २०२० साली देशभरात लॉकडाऊन घोषित करण्यात आला होता. पण यंदाच्या कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमध्ये कोरोनाच्या परिस्थितीतीचा सामना करण्यासाठी मात्र राज्य सरकारमार्फत नियमावली घोषित करण्यात आली. त्यामुळेच गुगलवर माहिती शोधताना अनेक युजर्स हे आपल्या भागातील नियमावली आणि लॉकडाऊन तसेच अनलॉक याबाबतची माहिती शोधत होते. आपल्या राज्यात आणि आपल्या शहराशी संबंधित माहिती आणि बातम्या मिळवण्यासाठी युजर्सचा भर होता. त्यामुळेच गुगलसमोरही स्थानिक माहिती आणि बातम्या अधिक अचुकपणे पोहचवण्याचे आव्हान होते.

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमध्ये युजर्सकडून अधिकाधिक प्रमाणात हॉस्पिटलची माहिती शोधण्यात आली. त्यासोबतच पल्स ऑक्सिमीटरचाही शोध घेण्यात आला. पण सर्वाधिक कुतुहलाचा विषय ठरला तो म्हणजे काळी बुरशीचा आणि म्युकरमायकोसिसचा. कोरोना चाचणी केंद्रासाठी गुगलने सातत्याने आयसीएमआरची मदत घेतली. त्यामध्ये मॅपमध्ये डेटा अपडेट करण्यातही गुगलने पुढाकार घेतला. लसीकरण केंद्र, कोरोना चाचणी केंद्र यासारख्या माहितीसोबतच आता सर्वाधिक माहिती मिळवण्याचा प्रयत्न आहे, तो म्हणजे म्युकरमायकोसिसचा. त्यामुळेच आता म्युकरमायकोसिसची म्हणजे काळ्या बुरशीची माहिती अधिकाधिक देण्यासाठीचा भर आहे. त्यामध्ये म्युकरमायकोसिसची लक्षणे, काळी बुरशी म्हणून माहिती शोधणे नियंत्रित करणे यासारख्या अनेक गोष्टी गुगलमार्फत सुरू आहेत. तसेच अधिकाधिक खरी माहिती देण्यासाठी गुगलचा भर दुसऱ्या कोरोना लाटेच्या निमित्ताने आहे.


 

Kiran Karande
Kiran Karandehttps://www.mymahanagar.com/author/kiran/
१२ वर्षांपासूनचा प्रिंट, डिजिटल असा प्रसारमाध्यम क्षेत्रातील अनुभव. वाहतूक, शिक्षण, नागरी सुविधा, ऊर्जा, हवामान विषयावर लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -