घरदेश-विदेशअदानी-मोदींचे संबंध काय? लोकसभेत राहुल गांधींचा तिखट शब्दांत हल्ला

अदानी-मोदींचे संबंध काय? लोकसभेत राहुल गांधींचा तिखट शब्दांत हल्ला

Subscribe

काँग्रेस खासदार राहुल गांधी यांनी मंगळवारी लोकसभेत राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरील चर्चेत भाग घेताना हिंडेनबर्ग अहवाल आणि गौतम अदानींच्या मुद्यावरून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर तिखट शब्दांत हल्ला केला. २०१४ मध्ये अदानी जगातील सर्वात श्रीमंत उद्योगपतींच्या यादीत ६०९ व्या क्रमांकावर होते, परंतु अचानक जादू झाली आणि ते थेट दुसर्‍या क्रमांकावर पोहोचले. जनता विचारत आहे की हे यश कसे मिळाले? त्यांचा देशाच्या पंतप्रधानांशी काय संबंध? असे प्रश्न उपस्थित करत राहुल गांधींनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गौतम अदानी यांचा विमानात बसलेला एक जुना फोटोच सभागृहात झळकावला. त्यावर लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी आक्षेप घेत सभागृहात पोस्टरबाजी अयोग्य असल्याचे सांगितले, परंतु बिर्ला यांच्या आक्षेपाकडे दुर्लक्ष करत राहुल गांधींनी आपला हल्ला सुरूच ठेवला.

आपल्या भाषणादरम्यान राहुल गांधी यांनी भारत जोडो यात्रेचा उल्लेख केला. ते म्हणाले की, भारत जोडो यात्रेत मला अनेक राज्यांमध्ये केवळ अदानींचेच नाव ऐकू आले. तरुणांनी मला विचारले की अदानी कोणत्याही व्यवसायात उतरले तरी यशस्वी होतात. ते केव्हाच अपयशी होत नाहीत. तुम्ही जिथे जाल तिथे फक्त अदानींचा धंदा आहे. हिमाचलमध्ये सफरचंदांबद्दल बोलले की अदानी, काश्मीरमध्ये सफरचंदांबद्दल बोलले की अदानींनीच चर्चा होते. पोर्ट व एअरपोर्ट सर्वच ठिकाणी अदानींचा गवगवा आहे. रस्त्यावर चालतानाही अदानी आहेत. त्यामुळे जनतेने मला अदानी एवढे यशस्वी कसे झाले हा प्रश्न विचारला. अदानी याआधी १-२ व्यवसाय करत होते. आता ८ ते १० क्षेत्रांमध्ये काम करत आहेत. ते २०१४ ते २०२२ दरम्यान ८ अब्ज डॉलर्सपासून १४० अब्ज डॉलर्सपर्यंत कसे पोहोचले? मोदीजी स्टार्टअप्सच्या गोष्टी करतात. तरुणांना अदानींच्या यशाचा फॉर्म्युला हवा आहे. मोदींनी त्यांना तो सांगावा.

- Advertisement -

हे नाते खूप जुने आहे. तेव्हा मोदी गुजरातचे मुख्यमंत्री होते. मोदी व अदानी एकमेकांच्या खांद्याला खांदा लावून उभे राहिले. पंतप्रधान दिल्लीला आल्यावर २०१४ मध्ये खरी जादू सुरू झाली. २० वर्षात अदानींनी भाजपला किती पैसे दिले? आधी मोदी अदानींच्या जहाजात जायचे, आता अदानी मोदींच्या जहाजात जातात. मोदी आणि अदानी एकत्र काम करतात, असे अनेक प्रश्न उपस्थित करत राहुल गांधींनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर हल्लाबोल केला.

अग्निवीर ही आरएसएसची कल्पना
अग्निवीर ही योजना लष्कराची नाही, तर आरआरएसची कल्पना आहे. आरएसएसने तसा सल्ला केंद्रीय गृहमंत्रालयाला दिला होता, असे लष्कराचे निवृत्त अधिकारी म्हणत आहेत, तर केंद्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांनी लष्करावर, तरुणांवर ही योजना लादली. यामुळे समाजात बेरोजगारी आणि हिंसाचारामध्ये वाढ होईल, असा गंभीर आरोपदेखील राहुल गांधींनी यावेळी केला.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -