युद्धात पकडलेल्या सैनिकांचं काय होतं? असा आहे जीनिव्हा करार

आंतरराष्ट्रीय जीनिव्हा करारानुसार युद्ध कैद्यांसाठी काही नियम बनवण्यात आले आहेत. हा करार काय आहे. जाणून घ्या.

what is geneva agreement
युद्धात पकडलेल्या सैनिकांचे काय होते?

भारतीय हवाई दलाचे मिग – २१ हे विमान बुधवारी सकाळी पाकिस्तानच्या हद्दीत कोसळले. या विमानाच्या वैमानिकला जिवंत पकडल्याचा दावा पाकने केला होता. तसेच त्यावेळी भारताचा एक पायलट आमच्या ताब्यात असल्याचा दावा पाकिस्तानने केला आहे. तसेच भारत सरकारनेही एक पायलट बेपत्ता असल्याचा वृत्ताला दुजोरा दिला आहे. हे प्रकरण सुरु असताना जीनिव्हा कराराची चर्चा देशभरात होत आहे. यानुसार युद्धाबंधी असलेल्या कैद्यास धमकावणे, मानवी मुल्ल्यांचे, अधिकारांचे उल्लंघन करणे हा गुन्हा आहे. दुसऱ्या महायुद्धानंतर हा कायदा अधिक चर्चेत आला. मानव अधिकारांची जपवणूक करणे हे यामागचे मुळ उद्दीष्ट होते. ते जपण्यासाठी काही कलमांचा समावेश यामध्ये करण्यात आला आहे.

जीनिव्हा करार

आंतरराष्ट्रीय जीनिव्हा करारानुसार युद्ध कैद्यांसाठी काही नियम बनवण्यात आले आहेत. यानुसार युद्ध कैद्यांना घाबरवले अथवा धमकावले जाऊ शकत नाही. तसेच त्यांचा अपमान देखील केला जाऊ शकत नाही. युद्ध कैद्यांना घेऊन जनतेत उत्सुकता देखील तयार केली जाऊ शकत नाही. जीनिव्हा करारानुसार युद्धातील कैद्यांवर खटला दाखल केला जाऊ शकतो. अथवा युद्धानंतर त्यांना परत स्वदेशी पाठवले जाईल. तसेच पकडले गेल्यानंतर युद्ध कैद्याने आपले नाव, सैन्यातील पद आणि नंबर सांगण्याचे प्रावधान करण्यात आले आहे.

मानवाधिकाराचे घोषणापत्र

मानवाधिकार जपणे हे अशाप्रकारे कायदे करण्यामागचा हेतू आहे. सर्व मानवी व्यक्ती जन्मत: स्वतंत्र आहेत आणि त्यांना समान प्रतिष्ठा आणि समान अधिकार आहेत. त्यांना विचारशक्ती आणि सदसद्विवेकबुद्ध लाभलेली आहे. तसेच त्यांनी एकमेकांशी बंधुत्वाच्या भावनेचे आचरण करावे, असे यात म्हटले आहे. प्रत्येकास जगण्याचा, स्वातंत्र्य उपभोगण्याचा, सुरक्षित असण्याचा अधिकार आहे. कोणालाही गुलामगिरीत किंवा दास्यात ठेवता कामा नये; सर्व प्रकारच्या गुलामगिरीस आणि गुलामांच्या व्यापारास मनाई करण्यात आली पाहिजे. कोणाचाही छळ करता कामा नये. त्याचप्रमाणे त्या व्यक्तीस क्रूर, अमानुष किंवा कमीपणा आणणारी वागणूक देता कामा नये. प्रत्येकाला सर्वत्र कायद्याच्या दृष्टीने माणूस म्हणून मान्यता मिळण्याचा अधिकार असल्याचेही या कायद्यामध्ये म्हटले आहे.

देशांनी केले नियमांचे उल्लंघन

जगातील काही देशांनी या नियमांचे उल्लंघन देखील केले आहे. दुसऱ्या महायुद्धानंतर १९४९ मध्ये करार आणि नियमांमध्ये जिनेव्हा कराराचा वापर प्रामुख्याने करण्यात आला आहे. युद्धजन्य परिस्थितही मानवी मूल्य टिकवून ठेवण्यासाठी कायदा तयार करणे हे जीनिव्हा कराराचे मुख्य उद्दीष्ट आहे.

असा सापडला पाकिस्तानला भारताचा पायलट

परराष्ट्रमंत्रालयाचे प्रवक्ते रावीष कुमार आणि एअर वाईस मार्शल आर.जी.के. कपूर यांनी बुधवारी तातडीने पत्रकार परिषद घेतली होती. या परिषदेमध्ये भारताने पाकिस्तानचे एक विमान पाडले असून भारताचे मिग – २१ हे विमान क्रॅश झाल्याची माहिती देण्यात आली. तसेच भारताचा एक पायलट या सर्व घटनेत बेपत्ता झाला असून विंग कमांडर अभिनंदन वर्थमान हा पायलट आमच्या ताब्यात असल्याचा दावा पाकिस्ताकडून करण्यात आला. या दरम्यान, ‘रेडिओ पाकिस्तान’ने एक व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर करण्यात आला आहे. या व्यक्तीला त्याची ओळख विचारल्यानंतर आपला सर्व्हिस क्रमांक २७९८१ असल्याचं त्यानं सांगितलेलं या व्हिडिओत दिसतंय. आपण भारतीय वैमानिक असून आपला धर्म हिंदू असल्याचंही त्यानं म्हटले आहे.


हेही वाचा – पायलटची विनाअट सुटका करा; भारताचा पाकला इशारा

हेही वाचा – ‘माझा वीरपुत्र नक्की परत येईल’, अभिनंदन यांच्या वडिलांचे भावूक पत्र