घरट्रेंडिंगजाणून घ्या! अश्लील व्हिडीओप्रकरणात काय आहेत कायदे आणि अधिकार?

जाणून घ्या! अश्लील व्हिडीओप्रकरणात काय आहेत कायदे आणि अधिकार?

Subscribe

महिलांचे फोटो वापरून त्यांना ब्लॅकमेल केलं जातं. पण अशा काळात महिलांनी न घाबरता पुढे आलं पाहिजे. महिलांसाठी अशा परिस्थितीत त्यांना न्याय मिळवून देणारे अनेक कायदे आहेत, ज्यामुळे आरोपींना कठोरातील कठोर शिक्षा मिळू शकते.

चंदीगड युनिव्हर्सिटीतील एका विद्यार्थिनीने मुलींच्या वसतिगृहातील विद्यार्थिनींचे अंघोळ करतानाचे आक्षेपार्ह व्हिडीओ बनवल्याचा खुलासा झाल्यानंतर गोंधळाचे वातावरण निर्माण झाले होते. याप्रकरणी संबंधित आरोपी विद्यार्थीनी आणि तिच्या प्रियकराला शिमलातून अटक करण्यात आली आहे. या प्रकरणामुळे देशभरातून संताप व्यक्त करण्यात आला. या दोघांवरही कलम ३५४ सी आणि आयटी अॅक्ट अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अशा प्रकरणात काय कायदे आणि अधिकार आहे हे जाणून घेऊयात.

स्त्रीला लज्जा उत्पन्न करणारी आणि तिच्या सभ्यतेला बाधा आणणारी एखादी घटना घडली आणि ती सिद्ध झाल्यास कलम ३५४ सी अंतर्गत गुन्हा दाखल केला जातो. हा दखलपात्र गुन्हा असून याअंतर्गत गुन्हा दाखल झाल्यास ५ वर्षांची शिक्षा आणि दंडात्मक कारवाई केली जाते. आयटी अॅक्टमध्ये अनेक कलम आहेत, पण याचील काही कलम थेट लागू होतात.

- Advertisement -
  • कलम ६६ इ- खासजीपणा भंग केल्यास
  • कलम ६७ – परवानगीशिवाय फोटो, व्हिडीओ प्रसारित केल्यास
  • कलम ६७ ए – इलेक्ट्रॉनिक माध्यमात लहान मुलांचं अश्लिल फोटो, व्हिडीओ प्रसारित केल्यास

अनेकदा खोटी प्रलोभनं दाखवून किंवा प्रेमाच्या जाळ्यात ओढून तरुणींचे किंवा महिलांचे अश्लिल फोटो किंवा व्हिडीओ काढले जातात. हे व्हिडीओ नंतर सोशल मीडियावर प्रसारित करण्याची धमकी देत पैशांची मागणी केली जाते. किंवा कोणत्याही सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर अपलोड करून पैसे कमावले जातात. तसेच, महिलेची बदनामी केली जाते. त्यामुळे अनेकदा अशा प्रकरणात अधिक बदनामी नको म्हणून महिला तक्रार करत नाहीत. अनेकवेळा छुप्या कॅमेरातून महिलांचे छायाचित्र काढले जातात. किंवा महिलेचे छायाचित्र वापरून मॉर्फ केले जातात.

अशाप्रकारे महिलांचे फोटो वापरून त्यांना ब्लॅकमेल केलं जातं. पण अशा काळात महिलांनी न घाबरता पुढे आलं पाहिजे. महिलांसाठी अशा परिस्थितीत त्यांना न्याय मिळवून देणारे अनेक कायदे आहेत, ज्यामुळे आरोपींना कठोरातील कठोर शिक्षा मिळू शकते.

- Advertisement -

हेही वाचा – लम्पीमुळे पशुधनही ‘लॉकडाऊन’; दूग्धव्यवसायावर परिणाम

कोणते कायदे आहेत

महिलांच्या अशोभनीय निर्मितीचा प्रतिबंध कायदा

जेव्हा एखाद्या महिलेचा फोटो वापरून तो अश्लिल रुपात एडीट केला जातो, तो फोटो सोशल मीडियावर व्हायरल केला जातो, अशा प्रकरणात महिलांच्या अशोभनीय निर्मितीचा प्रतिबंध कायदा १९८६ अंतर्गत कारवाई केली जाते.

आयटी अॅक्ट २०००

कोणत्याही व्यक्तीचे खासगी फोटो त्याच्या परवानगीशिवाय काढणे, कोणालाही पाठवणे, प्रकाशित करणे कलम ६६ ए अंतर्गत गुन्हा आहे. या गुन्ह्यात आरोपीला एक लाख रुपये दंडात्मक कारवाईसह तीन वर्षांचा कारावस भोगावा लागतो. जर कोणी एखाद्या महिलेचा अश्लिल फोटो, व्हिडीओ सोशल मीडियावर तिच्या परवानगीशिवाय प्रकाशित करत असेल त्याविरोधात कलम ६७ अंतर्गत कारवाई होते. चंदीगढ प्रकरणात हाच गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

भारतीय दंड संहिता १८६०

एखाद्या महिलेचा व्हिडीओ किंवा फोटोचा वापर करून कोणी लैंगिक संबंधाची मागणी करत असेल तर त्या प्रकरणाला लैंगिक छळ म्हटलं जातं. लैंगिक छळाविरोधात भारतात कलम ३५४ ए अंतर्गत कारवाई केली जाते. यामध्ये ३ वर्ष कठोर कारावास किंवा दंडात्मक शिक्षा सुनावली जाते.

अंघोळ करताना, कपडे बदलताना किंवा विवस्त्र अवस्थेत कोणत्याही महिलेचे फोटो काढले जात असतील तर तो गुन्हा मानला जातो. कलम ३५४ सी अंतर्गत हा गुन्हा नोंदवला जातो. चंदीगढ व्हिडीओ क्लिप प्रकरणात या कलमाखालीही गुन्हा नोंदवण्यात आला आहे. या कायद्यात ५ वर्षांची शिक्षा आणि दंड अशा दोन्ही शिक्षेची तरदूत केली आहे.

जर, एखादी महिला आपले खासगी फोटो काढण्यास परवानगी देते, मात्र ते फोटो कुठेही प्रदर्शित करण्यास परवानगी देत नाही. अशा प्रकरणात जर तिचे फोटो कोणीही प्रदर्शित केले तर संबंधित व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल होऊ शकतो.

पॉक्सो अधिनियम २०१२

जर, अशाप्रकरणात पीडिता १८ वर्षापेक्षा लहान असेल तर संबंधित आरोपीवर पॉस्को अंतर्गत गुन्हा दाखल केला जातो. तसंच, चाइल्ड पोर्नोग्राफीसंबंधित कायदेही कठोर केले आहेत.

हेही वाचा – सत्यनारायणाची कथा इंग्रजीमध्ये सांगणाऱ्या गुरूजींचा व्हिडीओ व्हायरल

आपल्या मुलांना कसं सुरक्षित कराल?

  • सोशल मीडियावर वावरताना सावधानता बाळगा
  • फोटो, व्हिडीओ वापरून कोणी धमकी देत असेल कुटुंबियांना आणि मित्र मंडळींना कळवा
  • ऑनलाईन डेटिंग अॅप आणि सेक्स चॅटपासून लांब राहा
  • तुमचे खासगी फोटो काढण्यास कोणालाही परवानगी देऊ नका
  • सार्वजनिक ठिकाणी, हॉटेल, टॉयलेट आदि ठिकाणी थांबण्याआधी तिथे छुपे कॅमेरे आहेत का तपासा
  • तुम्ही अशा प्रकरणात फसले गेल्यास तुम्ही तक्रार नोंदवू शकता. अशाप्रकरणात तक्रारकर्त्याचं नाव गोपनीय ठेवलं जातं.
  • कोणत्याही माध्यमात पीडितेचं नाव बाहेर येत नाही. पोलिसांकडून पीडितेचं नाव सांगितलं जात नाही.

कुठे कराल तक्रार

  • अश्लिल व्हिडीओ, फोटो प्रकरणात तुम्ही अडकले गेल्यास पुरावे गोळा करा
  • यामध्ये संबंधित आरोपीचा नंबर, फेसबूक आयडी, वॉट्सअॅपमधील ओळख गरजेची आहे. या सर्व गोष्टींचे स्क्रीन शॉट काढून ठेवा.
  • संबंधित व्यक्तीचे मेसेज, ईमेल, व्हॉट्सअॅप-फेसबूक चॅट मजबूत पुरावे होऊ शकतात
  • अशाप्रकऱणात तुम्ही सायबर शाखेत तक्रार नोंदवू शकता. प्रत्येक शहरात सायबर सेल स्थापन करण्यात आले आहे. तसंच, तुम्ही तुमच्या स्थानिक पोलीस ठाण्यातही तक्रार दाखल करू शकता. ऑनलाईन तक्रार करण्याचीही सोय उपलब्ध करून देण्यात आली आहे.
Sneha Kolte
Sneha Koltehttps://www.mymahanagar.com/author/skolte/
6 वर्षांचा माध्यम क्षेत्रात अनुभव. राजकारण, मनोरंजन विषयात लिखाणाची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -