Shashi Tharoor Slams Congress Leaders : नवी दिल्ली : कॉंग्रेसचे ज्येष्ठ खासदार, कॉंग्रेस अध्यक्षपदाची निवडणूक लढवणारे शशी थरूर आणि पक्षाचे संबंध सध्या ताणलेले आहेत. अशातच थरूर यांच्या एका वक्तव्याने हे संबंध अधिक बिघडण्याची शक्यता आहे. एका इंग्रजी वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत थरूर म्हणाले होते की, पक्षाला माझी गरज नसेल तर माझ्यासमोर अनेक पर्याय आहेत. आता तर त्यापुढे जात ते म्हणाले की, कॉंग्रेसमध्ये सारेच नेते आहेत. पण आमच्याकडे काम करणाऱ्या कार्यकर्त्यांची कमतरता आहे. त्यामुळेच आम्ही संघटनात्मक पातळीवर कमी पडत असल्याचे थरूर यांचे म्हणणे आहे. (what is shashi tharoor going to do now what did he say on the speculation of joining bjp)
या मुलाखतीत थरूर यांनी कॉंग्रेसमध्ये असलेल्या नेतृत्वाच्या अभावाबाबतही चिंता व्यक्त केली. पक्षात नेतृत्व नसणे, ही एक गंभीर समस्या आहे. जर कॉंग्रेस आपल्या नेहमीच्याच व्होटबॅंकेवर विसंबून राहिली तर त्यांना तिसऱ्यांदा केरळमध्ये विरोधी पक्षातच बसावं लागेल, असा टोलाही थरूर यांनी लगावला. कॉंग्रेसला राष्ट्रीय तसेच राज्य पातळीवर आपली विश्वासार्हता वाढवावी लागेल. कारण, आपली एकच एक व्होटबॅंक गृहीत धरून कॉंग्रेस कधीच सत्तेत येणार नाही.
हेही वाचा – Amit Shah : 2026 ची सुरुवात स्टॅलिन सरकारच्या अंताने होईल, हिंदी भाषाविरोधी वादादरम्यान शहांचे प्रत्युत्तर
कॉंग्रेसचे खासदार असलेल्या शशी थरूर यांनी भविष्यात आपण काय करणार, या चर्चांना आता पूर्णविराम दिला आहे. माझ्याकडे अनेक पर्याय आहेत असे सांगणाऱ्या थरूर यांनी आपण पक्ष सोडण्याचा विचार करत नसल्याचे सांगितले. तसेच भाजपामध्ये आपण जाणार नसल्याचे त्यांनी सांगितले.
एका इंग्रजी वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीनुसार, भाजप आणि आपली विचारधारा वेगळी असल्याचे सांगत आपण भाजपमध्ये जाणार नसल्याचे त्यांनी सांगितले. प्रत्येक पक्षाची स्वतःची अशी विचारसरणी असते, इतिहास असतो. जर तुम्ही वेगळ्या पक्षात जाऊन त्यांची विचारसरणी स्वीकारू शकला नाहीत तर अन्य कोणत्याही पक्षात जाणे चूक आहे.
आजची राजकीय परिस्थिती पाहता माझे म्हणणे असे आहे की, सर्व पक्षांना एका संघटनेची गरज आहे, जी पक्षाची विचारसरणी पुढे घेऊन जाऊ शकेल. राजकारणात कोणताही पक्ष स्वतःचे विचार, सिद्धांतावर चालणारा असला पाहिजे. तसं नसेल तर कोणत्याही वचननाम्याचा काहीही उपयोग होऊ शकत नाही. यासोबतच पक्षाचा म्हणून स्वतःचा एक वर्ग असतो. आणि पक्षाचे कार्यान्वयन योग्य पद्धतीने व्हावे, यासाठी त्याला संघटनात्मक पाठबळ असणे गरजेचे आहे. ज्यामुळे पक्षाची मूल्ये, विचारसरणीचा प्रसार करणे शक्य होते.
मात्र, सध्याच्या घडीला ही संघटनात्मक शक्ती केवळ भाजपाकडे आहे. आणि भाजपाने ती राष्ट्रीय पातळीवरही नेली आहे. पण, ते कॉंग्रेसला शक्य झालेले नाही. आम्हाला प्रत्येक बूथवर कार्यकर्त्यांच्या कमतरतेचा सामना करावा लागतो. आमच्याकडे नेते बरेच आहेत पण कार्यकर्त्यांची मात्र कमतरता आहे. कारण आमचा पक्ष हा कॅडरवर आधारित पक्ष नाही.
शशी थरूर यांच्याबाबतचे वाद काय?
चार वेळा खासदार असलेल्या शशी थरूर यांनी काँग्रेस अध्यक्षपदासाठी मल्लिकार्जुन खरगे यांच्या विरोधात निवडणूक लढवली होती. 2022 मध्ये त्यांनी सोनिया गांधींना पत्र लिहिलेल्या G23 गटातही होते. या गटाने काँग्रेस नेतृत्व बदलण्याची मागणी केली होती. तसेच, शशी थरूर यांनी अनेकदा राज्य आणि राष्ट्रीय स्तरावर काँग्रेस नेतृत्वाविषयी आपला असंतोष व्यक्त केला आहे. काही दिवसांपूर्वी, शशी थरूर यांनी इंग्रजी वृत्तपत्रात प्रकाशित झालेल्या लेखामध्ये केरळच्या पिनाराई विजयन सरकारचे कौतुक केले होते. तसेच, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या फ्रान्स आणि अमेरिका दौऱ्याचीही प्रशंसा केली होती.
हेही वाचा – Thackeray And Fadnavis : फिक्सरांचा सिक्सर अडवा, ठाकरेंनी केले फडणवीसांचे कौतुक