नवी दिल्ली : 1984 च्या शीख दंगलीशी संबंधित एका प्रकरणात काँग्रेस नेते आणि माजी खासदार सज्जन कुमार यांना दिल्लीच्या राऊस अव्हेन्यू कोर्टाने जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. या दंगलींशी संबंधित एका प्रकरणात सज्जन सिंग यांना दिल्ली उच्च न्यायालयाने आधीच जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. अशा परिस्थितीत, कनिष्ठ न्यायालयाने दुसऱ्या प्रकरणात दोषी ठरवल्यानंतर, शीख दंगलीतील त्याच्या महत्त्वाच्या भूमिकेबद्दल चर्चा सुरू झाली आहे. त्यामुळे 1984 चे हे शीख दंगल प्रकरण नेमके काय होते? या दंगलीत काँग्रेस माजी खासदार सज्जन कुमार यांची भूमिका काय होती? हे जाणून घेऊ… (What is the reason for Sajjan Kumar life imprisonment)
काय आहे घटना?
सुवर्ण मंदिराला ताब्यात ठेवणारा जनरल सिंह भिंद्रनवाला याला ऑपरेशन ब्लू स्टार अंतर्गत भारतीय सैन्याने ठार मारले. त्याच्यासोबत त्याच्या अन्य साथीदारांनाही त्यावेळी मारण्यात आले. या ऑपरेशनला त्यावेळच्या पंतप्रधान इंदिरा गांधी यांनीच मान्यता दिली होती. इंदिरा गांधींनी या ऑपरेशनबाबत कमालीची गुप्तता ठेवली होती. पण, सुवर्ण मंदिर हे शीख धर्मियांचे सर्वात मोठे धार्मिक स्थळ असल्याने या ठिकाणी झालेला हल्ल्यामुळे अनेक लोकांच्या भावना दुखावल्या गेल्या.
ऑपरेशन ब्लू स्टारनंतर माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांची 31 ऑक्टोबर 1984 साली त्यांच्या शीख अंगरक्षकांनी त्यांच्यावर गोळ्या झाडून हत्या केली. बेअंत सिंह आणि सतवंत सिंह अशी हल्ला केलेल्या आरोपींची नावे होती. यामधील बेअंत सिंह याला त्याच ठिकाणी मारण्यात आलं होतं. केहर सिंह नावाच्या आणखी एका शीख व्यक्तीला या प्रकरणामध्ये अटक करण्यात आली होती. परंतु, या घटनेच्या दुसऱ्याच दिवशी म्हणजे 1 नोव्हेंबरला देशभरात दंगल उसळली. या दंगलीत तीन ते पाच हजार लोकांता मृत्यू झाल्याचे सांगण्यात येते. परंतु, एकट्या दिल्लीमध्ये दोन हजारांपेक्षा अधिक लोकांचा मृत्यू झाला होता. मात्र, या दंगलीमुळे दिल्लीत सर्वात मोठे नुकसान झाले.
दिल्लीत त्यावेळी जे दंगे भडकले होते, त्यामध्ये काँग्रेस नेते, माजी खासदार सज्जन कुमार यांचे नाव समोर आले होते. सज्जन कुमार यांच्या चिथावणीनंतर जसवंत सिंग आणि तरुणदीप सिंग या पितापुत्राची जाळून हत्या करण्यात आली. आता या घटनेच्या जवळजवळ 41 वर्षांनी, सज्जन कुमारला दुसऱ्या एका प्रकरणात शिक्षा सुनावण्यात आली आहे. त्याचवेळी, आणखी एक काँग्रेस नेते जगदीश टायटलर यांच्याविरुद्धही खटले सुरू आहेत. याशिवाय, काँग्रेस नेते एचकेएल भगत आणि कमलनाथ यांनाही शीख दंगलींशी संबंधित प्रकरणांमध्ये आरोपी करण्यात आले आहे.
तर, दिल्लीतील सुलतानपुरी, कॅन्ट आणि पालम कॉलनीसारख्या भागात दंगल उसळली होती. या दंगलीत बळी पडलेल्या पीडित कुटुंबीयांच्यानुसार, 01 नोव्हेंबर 1984 ला जेव्हा दंगल झाली, तेव्हा त्या दंगलीचे नेतृत्व त्यावेळचे खासदार सज्जन कुमार करत होते. त्यांनी दंगलखोरांना संबोधित करताना म्हटले की, यांनी आपल्या आईची (माजी पंतप्रधान इंदिरा गांधी) हत्या केली आहे, आता आपण या सरदारांना मारू. त्यामुळे सज्जन कुमार यांचे दंगलीत प्रथम नाव घेतले जाते. तर, सज्जन कुमार यांच्याविरोधात दाखल केलेल्या खटल्यांमध्ये, अनेक साक्षीदारांनी त्यांच्या जबाबात म्हटले आहे की, सज्जन कुमारांनी शिखांची घरे शोधून दंगलखोरांना त्यावर हल्ला करण्यास सांगितले होते.
तर, सज्जन कुमार यांच्या समर्थकांनी दिल्लीमधील मतदारांच्या यादीमधून शिखांची घरे शोधून काढली होती. त्यानंतर त्याच घरांवर हल्ला करून त्याची तोडफोड केली आणि त्या घरांना आगी लावल्या. तर अनेक शिख लोकांना त्यांच्या घरातून बाहेर काढून मारण्यात आले होते, असारही आरोप त्यावेळी करण्यात आला. मात्र, सज्जन कुमार यांचे नाव हे 31 ऑक्टोबर 1984 ला झालेल्या दंगलीत समोर आले. त्यांनी यावेळी दिल्ली कॅन्ट परिसरातील गर्दीत दंगल घडवून आणली होती. या घटनेमध्ये अनेक घरांना आगी लावण्यात आल्या. सज्जन कुमार यांच्या चिथावणीमुळे दिल्ली कॅन्टमधील राज नगर भागात केहर सिंग, गुरप्रीत सिंग, रघुवेंद्र सिंग, नरेंद्र पाल सिंग आणि कुलदीप सिंग या पाच शीखांची जमावाने हत्या केली.
पीपल्स युनियन फॉर डेमोक्रॅटिक राइट्स (PUDR) आणि पीपल्स युनियन फॉर सिव्हिल लिबर्टीजच्या शोध पथकांनी त्यांच्या अहवालात म्हटले होते की, दिल्लीच्या सुलतानपुरी भागात झालेल्या दंगलीत बळी पडलेल्या बहुतेक शीख लोकांनी काँग्रेस खासदारावर जमावाला भडकावल्याचा आरोप केला होता. नंतर अनेकांनी ते खासदार सज्जन कुमार असल्याचे म्हटले होते.
1984 मधील शिख दंगलीवेळी दिल्लीत विविध ठिकाणी हिंसाचाराऱ्या घटना घडल्या होत्या. यापैकी 1 नोव्हेंबर रोजी सरस्वती विहार भागातील हिंसाचारादरम्यान सज्जन कुमारने जसवंत सिंग आणि तरुणदीप सिंग या दोन पितापु्त्राला जाळण्याचा प्रयत्न केला होता. यात दोघांचाही मृत्यू झाला होता.
सज्जन कुमार कोणत्या प्रकरणांमध्ये दोषी?
- सज्जन कुमार यांच्याविरुद्ध अनेक महत्त्वाचे तथ्य आणि पुरावे असूनही, कोणत्याही प्रकरणात त्यांच्यावर आरोप निश्चित करता आले नाहीत. 2002 मध्ये, दिल्लीतील कनिष्ठ न्यायालयाने त्यांना शीख दंगलींशी संबंधित एका प्रकरणातून निर्दोष मुक्त केले.
- 2005 मध्ये, जीटी नानावटी आयोगाच्या अहवालाच्या आधारे सीबीआयने सज्जन कुमारविरुद्ध नवीन खटला दाखल केला.
- 2010 मध्ये, दिल्लीच्या करकडडूमा न्यायालयात या प्रकरणाची सुनावणी झाली. या प्रकरणात बलवान खोखर, महेंद्र यादव, महा सिंह आणि इतर अनेकांना आरोपी बनवण्यात आले.
- 2013 मध्ये न्यायालयाने सज्जन कुमारला निर्दोष सोडले. तथापि, या प्रकरणात पाच जणांना दोषी ठरवण्यात आले आणि शिक्षा सुनावण्यात आली. या घटनेनंतर पीडित पक्षात प्रचंड संताप निर्माण झाला. एका निदर्शकाने तर खटल्याची सुनावणी करणाऱ्या न्यायाधीशांवर बूट फेकला.
- जगदीश कौर नावाच्या पीडित आणि साक्षीदाराने सज्जन कुमारविरुद्ध सीबीआयकडे खटला दाखल केल्यानंतर दिल्ली उच्च न्यायालयाने हे प्रकरण हाती घेतले. त्याच्यावर पाच शिखांना ठार मारणाऱ्या जमावाला चिथावण्याचा आरोप होता. मारल्या गेलेल्या शीखांमध्ये जगदीश कौर यांचे पती आणि मुलगा यांचा समावेश होता. जगशेर सिंगचे तीन भाऊ देखील त्यात समाविष्ट होते. या प्रकरणातील आणखी एक प्रमुख साक्षीदार निरप्रीत कौर होती.
- या घटनांच्या प्रत्यक्षदर्शींनी चौकशीसाठी स्थापन केलेल्या आयोगाला सज्जन कुमार यांचे नाव दिल्याचे सीबीआयने उच्च न्यायालयात सांगितले होते. यामध्ये सज्जन कुमार यांच्यावरील हत्याकांडातील आरोपांची चौकशी करण्याची मागणी करण्यात आली. तथापि, कनिष्ठ न्यायालयाने प्रत्यक्षदर्शींना साक्ष देण्यास मनाई केली होती. या प्रकरणाच्या सुनावणीदरम्यान, आणखी एका प्रत्यक्षदर्शी चाम कौरने न्यायालयाला सांगितले की, तिने सज्जन कुमारला सुलतानपुरी भागात गर्दीला संबोधित करताना पाहिले होते.