दिल्ली : नवी दिल्ली रेल्वे स्थानकावर मोठी दुर्घटना घडली आहे. महाकुंभ मेळ्यासाठी प्रयागराजकडे जाणाऱ्या गर्दीत चेंगराचेंगरी होऊन 18 जणांचा मृत्यू झाला आहे. ही घटना शनिवारी रात्री प्लॅटफॉर्म नंबर 13, 14, 15 येथे घडली आहे. या घटनेत जखमी झालेल्यांना लोकनायक जय प्रकाश नारायण रूग्णालय आणि लेडी हार्डिंग मेडिकल कॉलेजमध्ये दाखल केले आहे.
नवी दिल्ली रेल्वे स्थानकावरून शनिवारी रात्री महाकुंभ मेळ्यासाठी प्रयागराजकडे रेल्वे जाणार होती. त्यासाठी प्लॅटफॉर्मवर मोठ्या संख्येने लोक जमा झाले होते. यावेळी अचानक गर्दी झाल्याने एकच गोंधळ उडाला आणि त्यातून ही घडल्याचं सांगितले जात आहे. यात घटनेत 14 महिलांसह 18 जणांचा मृत्यू झाला आहे.
मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबीयांना मदतीची घोषणा केली आहे. मृत झालेल्यांच्या कुटुंबीयांना 10 लाख, गंभीर जखमी असलेल्यांना 2.5 लाख आणि किरकोळ दुखापत झालेल्यांना 1 लाख रूपयांची मदत रेल्वेकडून देण्यात येणार आहे.
18 people including 14 women lost their lives in the stampede that occurred yesterday around 10 PM at New Delhi Railway station: Delhi Police
— ANI (@ANI) February 16, 2025
रेल्वे स्थानकावर घडलेले काय?
अनेक प्रत्यक्षदर्शींनी सांगितले की, स्थानकावरील सगळ्या प्लॅटफॉर्मवर मोठ्या प्रमाणात गर्दी होती. पण, प्लॅटफॉर्म नंबर 12,13,14,15 वर स्थिती गंभीर होती. त्यातच रेल्वेकडून सातत्याने प्लॅटफॉर्म नंबर बदलण्याची घोषणा करण्यात येत होती. त्यामुळे ही घटना घडली.
रेल्वेचे पोलीस उपायुक्त केपीएस मल्होत्रा यांनी म्हटले, “प्रयागराज एक्स्प्रेस प्लॅटफॉर्म नंबर 14 वर थांबली होती. ही रेल्वे पकडण्यासाठी प्लॅटफॉर्मवर मोठ्या प्रमाणात प्रवाशी उभे होते. त्यासह स्वतंत्रता सेनानी एक्स्प्रेस आणि भुवनेश्वर राजधानी सुद्धा उशिरा येणार होती. त्यामुळे त्यांचे प्रवाशी सुद्धा प्लॅटफॉर्म नंबर 12,13 आणि 14 वर उपस्थित होते.
“आम्हाला गर्दीचा अंदाज होता. पण, ही घटना काही सेकंदात घडली. रेल्वेकडून चौकशी करण्यात येईल. कर्मचारी आणि अधिकाऱ्यांची चौकशी केली जाईल. त्यात घटनेचे खरे कारण समोर येईल,” असे मल्होत्रा यांनी म्हटले.
मिळालेल्या माहितीनुसार, नवी दिल्ली रेल्वे स्टेशनवर प्रत्येक तासाला 1500 हजार सामान्य तिकीटांची ( जनरल तिकीट ) विक्री झाली होती. त्यामुळे गर्दी वाढली. प्लॅटफॉर्म नंबर 14 आणि 16 च्या धावत्या जिन्याजवळ ( एस्केलेटर ) चेंगराचेंगरी सारखी परिस्थिती होती.