घरदेश-विदेशलोक मोहिमेशी जोडले जातात तेव्हा... पंतप्रधान मोदींनी सांगितले अभियानाच्या यशाचे गमक

लोक मोहिमेशी जोडले जातात तेव्हा… पंतप्रधान मोदींनी सांगितले अभियानाच्या यशाचे गमक

Subscribe

नवी दिल्ली : लोक एखाद्या मोहिमेशी जोडले जातात, तेव्हा त्यांना कामाचे गांभीर्यही कळते. यामुळे कोणत्याही योजना किंवा मोहिमेबाबत लोकांमध्ये आपलेपणाची, स्वामित्वाची भावना निर्माण होते, असे सांगत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विविध अभियानाच्या यशाचे गमक सांगितले.

पंतप्रधान मोदी यांनी आज, गुरुवारी दूरदृश्‍य प्रणालीद्वारे राज्यांच्या मंत्र्यांच्या पहिल्या अखिल भारतीय वार्षिक जलपरिषदेला मार्गदर्शन केले. ‘वॉटर व्हिजन @ 2047’ ही परिषदेची संकल्पना असून शाश्वत विकास आणि मानवी विकासासाठी जलस्रोतांचा वापर करण्याच्या मार्गांवर चर्चा करण्यासाठी प्रमुख धोरणकर्त्यांना एकत्र आणणे हा या मंचाचा उद्देश्य आहे.

- Advertisement -

केवळ सरकारच्या प्रयत्नांतून यश मिळत नाही, तर सार्वजनिक-सामाजिक संस्था तसेच नागरी संस्थांचा सहभागही महत्त्वाचा असतो. जलसंधारणाशी संबंधित मोहिमांमध्ये त्यांनी जास्तीत जास्त सहभाग घ्यावा, असे आवाहन पंतप्रधानांनी केले. पण त्याचबरोबर लोकसहभागाला चालना दिल्याने सरकारची जबाबदारी कमी होत नाही आणि सर्व जबाबदारी लोकांवर टाकली जावी, असाही याचा अर्थ नाही, याकडे देखील पंतप्रधान मोदींनी लक्ष वेधले.

लोकसहभागाचा सर्वात मोठा फायदा म्हणजे मोहिमेसाठी घेतले जाणारे प्रयत्न आणि खर्च होणारा पैसा याबाबत लोकांमध्ये जनजागृती होते. लोक त्या मोहिमेशी जोडले जातात तेव्हा त्यांना कामाचे गांभीर्यही कळते. यामुळे कोणत्याही योजना किंवा मोहिमेबाबत लोकांमध्ये आपलेपणाची, स्वामित्वाची भावना निर्माण होते”, असेही ते म्हणाले. स्वच्छ भारत अभियानाचे उदाहरण देत पंतप्रधान म्हणाले, लोक स्वच्छ भारत अभियानात सहभागी झाले, तेव्हा जनतेत एक चेतना जागृत झाली. सरकारने अनेक उपक्रम हाती घेतले, मग ते अस्वच्छता दूर करण्यासाठी संसाधने गोळा करणे असो, विविध जलशुद्धीकरण केंद्रे किंवा शौचालये बांधणे असो, जनतेने निर्णय घेतल्यावर या मोहिमेचे यश सुनिश्चित झाले, असे ते म्हणाले.

- Advertisement -

आपण ‘जल जागृती महोत्सव’ आयोजित करू शकतो किंवा स्थानिक स्तरावर आयोजित केलेल्या मेळाव्यांमध्ये जलजागृतीशी संबंधित कार्यक्रमांचा समावेश करता येईल. शाळेतील अभ्यासक्रमापासून ते उपक्रमांपर्यंत नवोन्मेषी मार्गांनी तरुण पिढीला या विषयाची जाणीव करून देण्याची गरज त्यांनी व्यक्त केली. देशातील प्रत्येक जिल्ह्यात 75 अमृत सरोवरे बांधली जात असून या अंतर्गत आतापर्यंत 25 हजार अमृत सरोवर बांधली गेल्याची माहिती त्यांनी दिली.

प्रत्येक कुटुंबाला पाणी उपलब्ध करून देण्यामध्ये ‘जल जीवन मिशन’ला मिळालेले यश हे राज्याच्या विकासाचा एक मोठा मापदंड आहे. यामध्ये अनेक राज्यांनी चांगले काम केले आहे, तर अनेक राज्ये या दिशेने पुढे जात आहेत. एकदा ही यंत्रणा कार्यान्वित झाली की, भविष्यात आपण तिची देखभाल त्याच पद्धतीने केली पाहिजे, अशी सूचना त्यांनी केली. जलजीवन मिशनचे नेतृत्व ग्रामपंचायतींनी करावे, तसेच काम पूर्ण झाल्यानंतर पुरेसे आणि शुद्ध पाणी उपलब्ध झाल्याचेही त्यांनी प्रमाणित करावे, अशी भूमिका त्यांनी मांडली.

उद्योग आणि कृषी या दोन्ही क्षेत्रांची पाण्याची गरज लक्षात घेत, या क्षेत्रांना जलसुरक्षेची जाणीव करून देण्यासाठी विशेष मोहिमा राबवायला हव्यात, असे मत पंतप्रधानांनी मांडले. फिरती पिके घेणे आणि नैसर्गिक शेती यासारख्या तंत्रांची उदाहरणे त्यांनी दिली, ज्यामुळे जलसंवर्धनावर सकारात्मक परिणाम होईल. पंतप्रधान कृषी सिंचन योजनेंतर्गत सुरू करण्यात आलेल्या ‘पर ड्रॉप मोअर क्रॉप’ (प्रत्येक थेंबा द्वारे अधिक पीक) या मोहिमेचा उल्लेख करत, आतापर्यंत देशातील 70 लाख हेक्टरहून अधिक जमीन सूक्ष्म सिंचनाखाली आणण्यात आल्याचे सांगतानाच, सर्व राज्यांनी सूक्ष्म सिंचनाला सतत प्रोत्साहन द्यायला हवे, असे ते म्हणाले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -