लखनऊ : पिलीभीत या आपल्या लोकसभा मतदारसंघात आयोजित सभेमध्ये एका साधूचा फोन वाजताच, भाजपा खासदार वरुण गांधी यांनी आपल्या कार्यकर्त्यांना साधूला न अडवण्याचा सल्ला देत उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्यावर निशाणा साधला.
पता नहीं कब महाराज जी मुख्यमंत्री बन जाएं… #VarunGandhi #Pilibhit pic.twitter.com/WvfnjOhDeH
— Nitesh Srivastava (@nitesh_sriv) August 29, 2023
भाजपा खासदार वरुण गांधी हे पिलीभीतमध्ये एका सभेत भाषण करत होते. त्याचवेळी त्यांच्याजवळ उभ्या असलेल्या एका साधूचा मोबाईल वाजला असता वरुण गांधी यांच्या समर्थकांनी त्या साधूला रोखले. त्यावर, अरे अडवू नका, महाराज कधी मुख्यमंत्री होतील माहीत नाही. ते मुख्यमंत्री झाल्यास आमचे काय होईल? अशी कोपरखळी त्यांनी लगावली. त्यानंतर, काळाचा वेग समजून घ्या. आता काळ चांगला येत आहे, असे सांगत मोदी सरकारच्या ‘अच्छे दिन’वरही त्यांनी निशाणा साधला.
हेही वाचा – कोण कुणाकडे पाहतोय आणि…, भाजपा नेते आशिष शेलार यांची ‘इंडिया’वर बोचरी टीका
कोणी आले, भारत माता की जय, जय श्री राम म्हणाले आणि तुम्ही त्याला मत दिले, असे होऊ नये, असे सांगतानाच डोळे झाकून कोणाला मत देऊ नका, असा सल्लाही खासदार वरुण गांधी यांनी नागरिकांना दिला.
गांधी घराण्याचे कौतुक
तुमच्याशी गोड बोलून तुमची मते चोरतील असे गांधी घराणे नाही. ते कटू शब्द बोलू शकतात, पण नेहमी खरे बोलतात. नुसते खोटे नाटक करून तुमची मते घेऊन निघून जाणाऱ्यांपैकी ते नाहीत, असे सांगत वरुण गांधी यांनी गांधी घराण्याचे कौतुक केले.
हेही वाचा – संभाजीनगरच्या विवाहितेचे दहशतवाद्यांशी संबंध? पाक तरुणासोबत पळून गेल्यानंतर 9 महिन्यांनी समोर आले ‘असे’
ग्रामीण भागांमध्ये रोजगारांची गरज
मुलांच्या भवितव्याबाबत मुद्दा उपस्थित करताना खासदार वरुण गांधी म्हणाले की, आमची मुले किती दिवस स्थलांतर करून वीटभट्टीवर काम करणार आहेत? याचा सरकारने विचार करावा. मोठ्या शहरांमध्ये नोकऱ्या आहेत, पण ग्रामीण भागात असे काहीच होत नाही. ग्रामीण भागात कारखाने सुरू करण्याचे आवाहन सरकारने उद्योगपतींना करायला हवे. जेणेकरून येथील लोकांना रोजगार मिळेल आणि ते सुद्धा आपले आयुष्य चांगले करू शकतील, असे त्यांनी सांगितले.