राहुल नेमके कुठले? भारताचे की ब्रिटनचे

काँग्रेस अध्यक्षांच्या नागरिकत्वाला आव्हान

rahul gandhi
काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी

काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी हे नेमके कुठले? भारताचे की ब्रिटनचे असा प्रश्न उपस्थित झाला आहे. अमेठीतील एका अपक्ष उमेदवारांने राहुल गांधींच्या नागरिकत्वाला आव्हान दिले आहे. राहुल गांधी यांनी निवडणूक आयोगाला सादर केलेल्या कागदपत्रांवरून ते ब्रिटनचे नागरीक असल्याचे दिसून येते. त्यामुळे त्यांना भारतात निवडणूक लढवण्याचा अधिकार नाही, असा दावा या अपक्ष उमेदवारांने केला आहे. त्यावरून राहुल गांधी यांच्या नागरिकत्त्वाबाबत स्पष्टीकरण देण्यासाठी मुदतीची मागणी त्यांच्या वकिलांनी निवडणूक आयोगाकडे केली. राहुल गांधी यांच्या वकिलांना मुदत देताना अमेठीतील निवडणूक निर्णय अधिकार्‍यांनी त्यांच्या कागदपत्रांची छाननी २२ एप्रिलपर्यंत पुढे ढकलली आहे.

अमेठीतील अपक्ष उमेदवार ध्रुव लाल यांनी राहुल गांधी यांच्या राष्ट्रीयत्त्वावर प्रश्न उपस्थित करत निवडणूक आयोगाकडे तक्रार केली आहे. लाल यांचे वकील अ‍ॅड. रवी प्रकाश यांनी सांगितले की, आम्ही तीन मुख्य मुद्दे उपस्थित केले आहेत. पहिला मुद्दा हा राहुल गांधी यांच्या इंग्लंडमधील कंपनी नोंदणी प्रमाणपत्राबाबत आहे. त्यात राहुल यांनी स्वत:ला ब्रिटनचा नागरीक म्हटले आहे. भारताच्या नागरीक प्रतिनिधी कायद्यांतर्गत भारताचा नागरीक नसलेल्या व्यक्तीला देशात निवडणूक लढवता येत नाही.

राहुल गांधी ब्रिटनचे नागरीक कसे झाले? त्यांनी आता भारतीय नागरिकत्व कसे मिळवले? जोपर्यंत या मुद्दावर स्पष्टीकरण मिळत नाही तोपर्यंत राहुल गांधी यांचा उमेदवारी अर्ज स्वीकारला जाऊ नये, अशी विनंती आम्ही निवडणूक निर्णय अधिकार्‍याला केली असल्याचे अ‍ॅड. प्रकाश म्हणाले. राहुल गांधी यांनी आपल्या ब्रिटनमधील कंपनीच्या २००३ ते २००९ या कालावधीतील स्थावर, जंगम मालमत्तेबाबत प्रतिज्ञापत्रात काहीच म्हटलेले नाही, असा आरोपही प्रकाश यांनी केला.

राहुल यांच्या शैक्षणिक पात्रतेबाबतही अनेक मुद्दे आहेत. त्यांची शैक्षणिक पात्रता कागदपत्रांमध्ये उल्लेख असलेल्या शैक्षणिक पात्रतेशी जुळत नाही. राहुल गांधी यांनी कॉलेजमध्ये ‘रौल विंची’ हे नाव लावले होते आणि राहुल गांधी या नावे कोणतेही प्रमाणपत्र उपलब्ध नाही, असेही प्रकाश म्हणाले.