घरदेश-विदेशजिथे छत्रपती शिवाजी महाराजांचा अवमान झाला, तिथेच गुंजले त्यांचे शौर्यगीत...

जिथे छत्रपती शिवाजी महाराजांचा अवमान झाला, तिथेच गुंजले त्यांचे शौर्यगीत…

Subscribe

आग्रा : ज्या किल्ल्यावर एकेकाळी छत्रपती शिवाजी महाराजांचा अवमान झाला होता, त्याच दिवाण-ए-आममध्ये रविवारी छत्रपती शिवाजी महाराजांचे शौर्यगीत गुंजले. देशभरातील शेकडो शिवभक्त या ऐतिहासिक क्षणाचे साक्षीदार होते. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या 393व्या जयंतीनिमित्त आग्रा किल्ल्यातील दिवाण-ए-आम येथे सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

उत्तर प्रदेशातील योगी सरकारच्या विनंतीवरून महाराष्ट्र सरकारने आग्र्याच्या किल्ल्यात ‘शिवजयंती उत्सव’ साजरी केली. हा कार्यक्रम महाराष्ट्र शासन, आर. आर. पाटील फाऊंडेशन आणि अजिंक्य देवगिरी प्रतिष्ठान, औरंगाबाद या संस्थेच्या संयुक्त विद्यमाने साजरा करण्यात आला. सर्वप्रथम महाराष्ट्रातील प्रसिद्ध गायक नितीन सरकटे, वैशाली माडे आणि हंसराज यांनी स्वागत गीत सादर केले. यानंतर ‘महाराष्ट्र गीत’ सादर करण्यात आले. राजा बढे यांनी लिहिलेले आणि शाहीर साबळे यांनी गायलेले ‘जय-जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा’…. हे गाणे सादर करण्यात आले. महाराष्ट्र सरकारने याला अलीकडेच राज्य गीत म्हणून मान्यता दिली आहे. यानंतर पुण्यातील महाराज शंभू छत्रपती प्रॉडक्शनच्या कलाकारांनी ‘पाळणा गीत’ सादर केले.

- Advertisement -

तर, इंडियाज गॉट टॅलेंटमधील कलाकार सर्वम पटेल यांनी सँड आर्टद्वारे छत्रपती शिवाजी महाराजांचे आकर्षक चरित्र सादर केले. लोकांकडून त्याचे खूप कौतुक झाले. यानंतर महाराज शंभू छत्रपती प्रॉडक्शनच्या 70 कलाकारांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनावर आधारित नाट्यरूपांतर सादर केले. यामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनातील महत्त्वाचे प्रसंग या नाटकातून सादर करण्यात आले. नाटकाचे लेखक, दिग्दर्शक आणि निर्माते महेंद्र वसंतराव महाडिक होते. छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका शंतनू मोघे, औरंगजेबाची भूमिका डॉ. गिरीश ओक, मिर्झाराजे जयसिंग यांची भूमिका अमित देशमुख यांनी साकारली.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची उपस्थिती
या कार्यक्रमाला महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपस्थित होते. मी या कार्यक्रमात मुख्यमंत्री म्हणून नव्हे तर शिवाजी महाराजांचा मावळा म्हणून आलो आहे. शिवरायांनी मोगल, आदिलशाही, निजामशाहीच्या अत्याचाराच्या कालखंडात हिंदवी स्वराज्य स्थापन करून कल्याणकारी राज्याची मुहूर्तमेढ रोवली. छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती आग्र्याच्या लाल किल्ल्यात साजरी होणे हा ऐतिहासिक क्षण आहे, असे प्रतिपादन मुख्यमंत्री शिंदे यांनी केले.

- Advertisement -

उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना प्रमुख पाहुणे म्हणून आमंत्रित करण्यात आले आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त त्यांनी व्हिडिओद्वारे देशभरातील लोकांना शुभेच्छा दिल्या.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -