नवी दिल्ली : केंद्र सरकारकडून संसदेत काँग्रेसच्या 10 वर्षांच्या काळातील अर्थव्यवस्थेची श्वेतपत्रिका सादर करण्यात आली आहे. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी ही श्वेतपत्रिका आज (ता. 08 फेब्रुवारी) संसदेत सादर केली. काँग्रेसच्या कार्यकाळाच झालेल्या आर्थिक गैरव्यवहारांची माहिती या श्वेतपत्रिकेच्या माध्यमातून देण्यात आली आहे. परंतु, या श्वेतपत्रिकेमुळे काँग्रेसच्या नेत्यांमध्ये खळबळ उडाली आहे. 1 फेब्रुवारी रोजी अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी अर्थसंकल्प सादरीकरणादरम्यान ही श्वेतपत्रिका संसदेत मांडणार असल्याची माहिती दिली होती. (White paper of 10 years of UPA’s tenure presented in Parliament)
हेही वाचा… Congress : काँग्रेसच्या आंदोलनामुळे विद्यापीठातील 10 हजार विद्यार्थ्यांना न्याय – अतुल लोंढे
यूपीएच्या काळातील आर्थिक गैरव्यवस्थापन आणि एनडीए राजवटीतील आर्थिक व्यवस्थापन यामध्ये मांडण्यात आले आहे. या श्वेतपत्रिकेमध्ये युपीए सरकारचा लेखाजोखा मांडण्यात आला आहे. यूपीए सरकारने देशाचा आर्थिक पाया कमकुवत केला असे या श्वेतपत्रिकेच्या माध्यमातून सांगण्यात आले आहे. यूपीएच्या काळात रुपयाची मोठी घसरण झाली होती. बँकिंग क्षेत्र संकटात होते, परकीय चलनाच्या साठ्यात घट झाली होती, मोठे कर्ज घेतले होते तसेच महसुलाचा गैरवापर झाला होता, असा आरोपही या श्वेतपत्रिकेच्या माध्यमातून करण्यात आला आहे.
काँग्रेसचा “ब्लॅक पेपर”…
मोदी सरकारने युपीएच्या 2004 ते 2014 या काळातील आर्थिक गैरव्यवहाराची श्वेतपत्रिका सादर करण्याआधी काँग्रेसने भाजपा सरकारच्या 10 वर्षांच्या कार्यकाळाची माहिती देणारा ब्लॅक पेपर प्रसिद्ध केला आहे. ‘दस साल अन्याय काल… 2014-2024′ असे या ब्लॅक पेपरला नाव देण्यात आले आहे. आज (ता. 08 फेब्रुवारी) हा ब्लॅक पेपर खर्गे यांनी प्रसिद्ध केला आहे. यानंतर त्यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधला. यावेळी बोलताना काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे म्हणाले की, आम्ही बेरोजगारीचा मुख्य मुद्दा मांडत आहोत, ज्यावर भाजपा कधीच बोलत नाही. केरळ, कर्नाटक, तेलंगणा या बिगर भाजपा राज्यांमध्ये भेदभाव केला जात आहे. देशातील लोकशाही धोक्यात आली आहे, असा आरोप या ब्लॅक पेपरच्या माध्यमातून करण्यात आला आहे.
तर, देशातील सर्वात मोठा प्रश्न बेरोजगारीचा आहे, मात्र मोदी सरकार त्यावर कधीच बोलले नाही. भाजपाची सत्ता नसलेल्या राज्यात मनरेगाचे पैसे सुद्धा सोडत नाहीत आणि नंतर पैसे निघाले पण खर्च झाले नाहीत असे सांगतात. केंद्र सरकार नेहमीच काँग्रेसबाबत, त्या काळातील महागाईबाबत बोलत असते. पण आताच्या महागाईबाबत कोणीही काहीही बोलायला तयार नाही. त्यांच्याकडून आधीची आश्वासने पूर्ण झालेली नाहीत, पण आता ते नवीन आश्वासने देऊ लागले आहेत, असा टोलाही मल्लिकार्जुन खर्गे यांनी लगावला आहे.