WHO ने सांगितले लॉकडाऊन काढण्याचे ६ निकष! म्हणे ‘..तरच काढा लॉकडाऊन’!

WORLD LOCKDOWN

जगभरात कोरोनाचा हाहा:कार सुरू असताना आता अनेक देशांमध्ये काही प्रमाणात लॉकडाऊन शिथिल करण्यात आले आहेत. भारतात देखील याची मागणी केली जात होती. या पार्श्वभूमीवर रेड झोन, ग्रीन झोन आणि ऑरेंज झोन यानुसार जिल्ह्यांची वर्गवारी करून सरकारने लॉकडाऊनचे नियम शिथिल करण्यास परवानगी देखील दिली. मात्र, जागतिक आरोग्य संघटना अर्थात WHO ने आता ६ महत्त्वाचे निकष सांगितले आहेत, ज्यानंतरच कोणत्याही देशाने, राज्याने किंवा जिल्ह्याने लॉकडाऊन काढण्याचा निर्णय घ्यावा, असं WHOनं सांगितलं आहे. जागतिक स्तरावर आत्तापर्यंत ३५ लाख कोरोनाबाधित रुग्ण सापडले असून तब्बल अडीच लाख लोकांना कोरोनामुळे आपले प्राण गमवाले लागले आहेत. एप्रिलच्या सुरुवातीपासून आत्तापर्यंत रोज सरासरी ८० हजार कोरोनाच्या नव्या रुग्णांची नोंद होत असल्याची माहिती WHOच्या प्रमुखांनी दिली आहे. या पार्श्वभूमीवर लॉकडाऊन काढण्याचा निर्णय धोकादायक ठरू शकतो, अशी भिती देखील डब्लूएचओने व्यक्त केली आहे.

काय आहेत WHOचे ६ निकष?

जर…

१) कोरोनाबाधितांचा वेगाने शोध घेतला जात असेल, रुग्णसंख्या कमी होत असेल आणि फैलाव नियंत्रणात असेल…

२) कोरोनाबाधित रुग्णांचा शोध, आयसोलेशन, चाचणी आणि उपचार यासाठी आरोग्ययंत्रणेची क्षमता पुरेशी असेल…

३) आरोग्यसुविधा आणि नर्सिंग होमसारख्या ठिकाणी कोरोना फैलावाचा धोका अत्यंत कमी करण्यात आला असेल…

४) जाणं आवश्यकच असेल अशा शाळा, कार्यालयं आणि इतर ठिकाणी सुरक्षेच्या सर्व बाबींची पूर्तता केली असेल…

५) परदेशातून देशात येऊ शकणाऱ्या कोरोनाबाधितांचा संभाव्य धोका लक्षात घेऊन उपाययोजना केल्या असतील…

६) आणि समाजातल्या लोकांना नव्या नियमावलीसंदर्भात पूर्णपणे प्रशिक्षित, सहभागी आणि सक्षम केलं असेल…

या निकषांची पूर्तता केल्यावरच राष्ट्रप्रमुखांनी आपापल्या देशातला लॉकडाऊन उठवण्याचा विचार करावा, असा सल्ला WHO ने दिला आहे.

आयुष्य होतं तसं आता राहणार नाही…!

दरम्यान, WHOच्या प्रमुखांनी बोलताना कोरोनाच्या वापसीची भिती देखील बोलून दाखवली. ‘कोरोनाच्या केसेस कमी होतील. मात्र, त्या कमी झाल्यानंतर लॉकडाऊन उठवल्यानंतर देखील कोरोना पुन्हा उसळी मारू शकतो. त्यामुळे पुन्हा लॉकडाऊन लागू करण्याची वेळ नक्कीच येऊ शकते. यासाठी देशांनी टप्प्याटप्प्याने आणि अत्यंत काळजीपूर्वक पद्धतीने कोरोनाचं हे संकट हाताळायला हवं’, असं टेड्रॉस अधानोम म्हणाले. ‘कोरोना कालांतराने कमी होईलच. पण याआधी जसं आयुष्य आपल्या सगळ्यांचं होतं, तसं आता पुन्हा असणार नाही हे नक्की. त्यामुळे घाबरून गोंधळून न जाता या परिस्थितीला पूर्ण तयारीनिशी आपण सामोरं जायला हवं’, असं देखील त्यांनी नमूद केलं.