घरताज्या घडामोडीPakistan political crisis : कोण आहेत शहबाज शरीफ? इम्रान खाननंतर होऊ शकतात...

Pakistan political crisis : कोण आहेत शहबाज शरीफ? इम्रान खाननंतर होऊ शकतात पाकिस्तानचे पंतप्रधान

Subscribe

पाकिस्तानच्या नॅशनल असेंब्लीमध्ये पंतप्रधान इम्रान खान यांच्याविरोधातील अविश्वास प्रस्तावावर कार्यवाही सुरू झाली आहे. सुप्रीम कोर्टाच्या मध्यस्थीने पूर्ववत झालेल्या संसदेतील मतदानानंतर इम्रान खान पंतप्रधान राहतील की पाय उतार होतील यावर लवकरच निर्णय होण्याची शक्यता आहे. त्यामुळे इम्रान खान आपली खुर्ची वाचवण्यात अपयशी ठरतील हे स्पष्ट आहे. यामध्ये पाकिस्तान नॅशनल असेंब्लीमध्ये विरोधी पक्षाचे नेते असणारे शहबाज शरीफ इम्रान खान यांच्यानंतर पुढील पंतप्रधान होऊ शकतात. त्यांचे पंतप्रधान म्हणून सर्वात जास्त नाव समोर येत आहे. शरीफ यांनी विद्यमान पंतप्रधान इम्रान खान यांची तुलना इम्रान हिटलरशी केली आहे. तसेच आम्ही त्यांना उघडे पाडू असेही शरीफ यांनी म्हटलं आहे. 70 वर्षीय शहबाज यांच्याबाबत काही गोष्टी जाणून घ्या.

पंतप्रधान पदाच्या शर्यतीमध्ये सर्वात पुढे असणारे शहबाज शरीफ हे पाकिस्तानचे 3 वेळा पंतप्रधान राहिलेल्या नवाझ शरीफ यांचे छोटे बंधू आहेत. तसेच राष्ट्रीय राजकारणात ते प्रचंड प्रसिद्ध आहेत. त्यांच्या साध्या आणि सरळ कार्यशैलीसाठी त्यांना ओळखले जाते.

- Advertisement -

पाकिस्तानमधील सर्वाधिक लोकसंख्या असलेल्या पंजाब प्रांताचे तीन वेळा मुख्यमंत्री म्हणून शहबाज यांनी प्रतिनिधीत्व केलं आहे. मुख्यमंत्री असताना शाहबाज यांनी अनेक मोठ्या पायाभूत सुविधांच्या प्रकल्पांवर काम केले. यामध्ये लाहोरमधील देशातील पहिल्या आधुनिक मास ट्रान्झिट ट्रान्सपोर्ट सिस्टमचा समावेश होता.

शहबाज शरीफ हे आपल्या भावाच्या उलट नेहमी पाकिस्तानच्या सैन्याशी चांगले संबंध ठेवतात. पाकिस्तानमध्ये असे म्हटलं जाते की, ज्यांच्यावर लष्कराच्या जनरलचा हात आहे, तेच पाकिस्तानात सत्तेवर राहू शकतात. पाकिस्तानी लष्कर यावेळी शहबाज यांच्या बाजूने आहेत. त्यामुळे शहबाज पुढील पंतप्रधान होऊ शकतात.

- Advertisement -

सध्याचे पंतप्रधान इम्रान खान यांच्या प्रमाणे शरीफ कुटुंबाचे संबंध भारतासोबत फार कठोर नसल्याचे मानले जाते. गेल्या काही दिवसांपासून इम्रान खान यांनी अनेक प्रसंगात भारताचे तोंडभरून कौतुक केलं आहे. नवाझ शरीफ 2015 मध्ये जेव्हा पाकिस्तानचे पंतप्रधान होते तेव्हा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अचानक लाहोरमधील त्यांच्या घरी पोहचून सर्वांना आश्चर्यचकित केले आहे.

लाहोरमधील एका श्रीमंत उद्योगपती कुटुंबात शहबाज शरीफ यांचा जन्म 1951 मध्ये झाला. तिथेच त्यांनी शिक्षण घेतले. त्यानंतर कौटुंबिक व्यवसाय हाती घेतला. पाकिस्तानात त्यांची स्टील कंपनीही आहे.

शहबाज शरीफ यांनी 80 च्या दशकात राजकारणात प्रवेश केला. त्यांनी लाहोर विधानसभेची पहिली निवडणूक 1988 मध्ये जिंकली. 1990 मध्ये विधानसभा बरखास्त झाल्यावर झालेल्या निवडणुकीत ते पुन्हा विजयी झाले. 1993 मध्ये त्यांनी लाहोर असेंब्लीसह नॅशनल असेंब्लीची निवडणूक जिंकली पण नॅशनल असेंब्लीचे सदस्यत्व सोडले.

शहबाज पहिल्यांदा 1997 मध्ये पंजाबचे मुख्यमंत्री झाले. परवेज मुशर्रफ यांच्या नेतृत्वाखाली 1999 मध्ये लष्कराने सत्तापालट केला तेव्हा शहबाज यांनाही तुरुंगात टाकण्यात आले होते. 2000 मध्ये त्यांना सौदी अरेबियात पाठवण्यात आले. 2007 मध्ये शहबाज आणि त्याचे कुटुंब पुन्हा पाकिस्तानात परतले आहे. परतल्यानंतर 2008 मध्ये शहबाज शरीफ पुन्हा पंजाबचे मुख्यमंत्री झाले. 2013 मध्ये झालेल्या निवडणुकीत शहबाज शरीफ तिसऱ्यांदा पंजाब प्रांताचे मुख्यमंत्री म्हणून निवडून आले.

नवाझ शरीफ यांना 2017 मध्ये, जेव्हा पनामा पेपर्स लीक प्रकरणानंतर मालमत्ता लपवल्याबद्दल दोषी ठरवण्यात आले, तेव्हा शहबाज शरीफ पाकिस्तान मुस्लिम लीग-नवाझचे अध्यक्ष बनले. यानंतर ते पहिल्यांदाच राष्ट्रीय राजकारणात सक्रिय झाले.

पीएमएल-एनने शाहबाज शरीफ यांना 2018 च्या सार्वत्रिक निवडणुकीत पंतप्रधानपदाचे उमेदवार म्हणून नामांकित केले. मात्र इम्रान खान यांचा पक्ष तेहरीक-ए-इन्साफने या निवडणुकीत बाजी मारली. शहबाज शरीफ विरोधी पक्षनेते झाले. तेव्हापासून ते विरोधी पक्षातील सर्वात मोठे नेते म्हणून इम्रान यांच्या विरोधात भूमिका मांडत होते.

नवाझ शरीफ यांच्यासह शहबाज शरीफ यांच्यावरही अनेक गुन्हे दाखल आहेत. मात्र तो कोणत्याही प्रकरणात दोषी सिद्ध झालेला नाही. सप्टेंबर 2020 मध्ये, शहबाज यांना कोट्यवधी रुपयांच्या गैरव्यवहाराच्या मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात अटक करण्यात आली होती परंतु त्यांना एप्रिल 2021 मध्ये जामीन मिळाला आहे.


हेही वाचा : 26/11 Terrorist Attack : मुंबईवरील हल्ल्याचा मास्टरमाईंड हाफीज सईदला ३१ वर्षांचा तुरुंगवास

Swapnil Jadhav
Swapnil Jadhavhttps://www.mymahanagar.com/author/jswapnil/
मागील तीन वर्षापासून डिजिटल मीडिया क्षेत्रात सक्रिय आहे. सामाजिक, राजकीय विषयांचा अभ्यास आणि लिखाण. डिजिटल मीडियाचा अनुभव, वार्ताहर, अँकरिंगचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -