Who is Shama Mohamed : नवी दिल्ली : भारतीय क्रिकेट संघाचा कप्तान रोहित शर्मा याच्या फिटनेसबाबत केलेल्या वक्तव्यामुळे कॉंग्रेस प्रवक्त्या डॉ. शमा मोहम्मद चांगल्याच चर्चेत आल्या आहेत. शमा मोहम्मद यांनी रोहित शर्मा जाड असल्याचे सांगत त्याला वजन कमी करण्याचा सल्ला दिला आहे. मोहम्मद यांच्या या वक्तव्यानंतर सोशल मीडियावर एकच गोंधळ सुरू झाला आहे. दरम्यान, डॉ. शमा मोहम्मद यांचे हे वक्तव्य वैयक्तिक असल्याचे सांगत कॉंग्रेसने त्यांच्यापासून अंतर ठेवले आहे. (who is shama mohamed comment on indian cricket captain rohit sharma fitness icc champions trophy)
डॉ. शमा मोहम्मद यांनी यासंदर्भात सोशल मीडियावर एक पोस्ट केली होती. त्यात त्यांनी एक खेळाडू म्हणून रोहित शर्मा जाड असल्याचे म्हटले होते. त्याला वजन कमी करण्याची गरज आहे. तसेत भारतीय संघाचा सर्वात निराशजनक कर्णधार असल्याचेही सांगितले आहे. गांगुली, तेंडुलकर, द्रविड, धोनी, कोहली, कपिल देव अशा आजी – माजी कर्णधारांचा विचार करता रोहित शर्मामध्ये काय वेगळेपण आहे, असा सवालही त्यांनी विचारला आहे. एक सरासरी खेळाडू असण्यासोबतच तो एक सरासरी कर्णधार आहे, ज्याला भारताचा कप्तान होण्याचे भाग्य लाभले असल्याचेही त्यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटले आहे.
डॉ. शमा मोहम्मद यांच्या या विधानावरून गदारोळ उठताच कॉंग्रेसने त्यांच्यापासून अंतर ठेवले आहे. कॉंग्रेसचे प्रसार माध्यम प्रमुख पवन खेरा म्हणाले की, कॉंग्रेस प्रवक्ता शमा मोहम्मद यांनी क्रिकेटपटूबाबत जे विधान केले आहे, ती पक्षाची भूमिका नाही. मोहम्मद यांना त्यांची पोस्ट हटवण्यास सांगण्यात आले असून भविष्यात कोणतेही विधान सावधगिरीने करण्याचा सल्ला दिला आहे.
हेही वाचा – FASTag : गाडी दरवाजासमोर उभी अन् वॉलेटमधून पैसे गेले कापून, महामार्ग प्राधिकरण सांगते-
कॉंग्रेस खेळाडूंचा योग्य सन्मान करते आणि त्यांच्या या योगदानाचा अपमान करणाऱ्या किंवा त्यांचे मनोबल खच्ची करणाऱ्या कोणत्याही विधानाचे समर्थन करत नाही. दरम्यान, कॉंग्रेसच्या आदेशानंतर डॉ. मोहम्मद यांनी आपली ही वादग्रस्त पोस्ट डिलीट केली आहे.
आपल्या पोस्टमुळे मोठ्या प्रमाणात गदारोळ निर्माण झाल्यानंतर शमा मोहम्मद यांनी आपल्या विधानाचे स्पष्टीकरणही दिले आहे. त्या म्हणाल्या की, खेळाडूंच्या फिटनेसशी संबंधित असे हे अत्यंत साधे ट्वीट होते. यात कुठेही बॉडी शेमिंगचा काहीही संबंध नाही. रोहित शर्मा मला ओव्हरवेट वाटला, म्हणून मी ते ट्वीट केले. मला उगाचच लक्ष्य केले जात आहे. ही लोकशाही आहे, आणि मला बोलण्याचा अधिकार आहे. मी फक्त माझे मत मांडले आहे. मी रोहितची इतरांशी तुलना करणे देखील चुकीच्या पद्धतीने घेतले गेले आहे. माझे म्हणणे होते की, विराटला बघा. तो नेहमीच आपल्या सहकाऱ्यांना प्रोत्साहन देत असतो.
कोण आहे डॉ. शमा मोहम्मद? (Who is Shama Mohamed)
शमा मोहम्मद या केरळच्या राहणाऱ्या असून त्या व्यवसायाने डेंटिस्ट आहेत. 2018 मध्ये पहिल्यांदा त्यांना कॉंग्रेसच्या राष्ट्रीय मीडिया पॅनलिस्ट म्हणून मान्यता देण्यात आली. त्यानंतर पक्षाच्या राष्ट्रीय प्रवक्ता म्हणून त्यांची नियुक्ती करण्यात आली. आपली विधाने आणि पोस्टच्या माध्यमातून त्या नेहमीच चर्चेत राहतात. 2019 च्या लोकसभा निवडणुकीदरम्यान शमा यांनी कॉंग्रेसच्या तिकीट वितरण प्रणालीवर प्रश्न उपस्थित केले होते, त्यामुळे त्या चर्चेत आल्या होत्या. संसदेत महिला आरक्षण विधेयक मांडल्याने अशा वेळी कॉंग्रेसने केरळमधील जास्तीत जास्त महिलांना तिकीट द्यायला हवे होता. मात्र, पक्षाने गेल्या वेळच्या तुलनेत एका महिलेचे तिकीट कापल्याचे त्या म्हणाल्या.
डॉ. शमा मोहम्मद यांच्या विधानावर भाजपाची प्रतिक्रिया
डॉ. शमा मोहम्मद यांच्या या प्रतिक्रियेवर भाजप प्रवक्ता शहजाद पूनावाला यांनी कठोर प्रतिक्रिया दिली आहे. जे राहुल गांधी यांच्या नेतृत्वात जे 90 निवडणुका हरले आहेत, ते रोहित शर्मा प्रभावी नसल्याचे सांगत आहेत. दिल्लीत 6 वेळा एकही जागा न मिळवणे, आणि 90 वेळा निवडणुका हरणे हे प्रभावशाली आहे. पण टी20 वर्ल्डकप जिंकणे प्रभावी नसल्याचा टोलाही त्यांनी लगावला.