नवी दिल्ली : सन 2013च्या ऑगस्टा वेस्टलँड हेलिकॉप्टर (AgustaWestland Chopper scam) घोटाळ्यातील आरोपी ख्रिस्तियन मिशेल (Christian Michel) यांनी लिहिलेल्या पत्रात सिग्नोरा गांधी (Signora Gandhi) यांचे नाव “करता करविता” म्हणून देण्यात आले होते. भाजपाने एका व्हिडीओद्वारे हाच मु्द्दा उपस्थित केला आहे. ‘काँग्रेस फाइल्स’ (Congress Files) नावाच्या या व्हिडीओत ‘सिग्नोरा गांधी’ कोण आहे? असा प्रश्न उपस्थित केला आहे.
भाजपाप्रणित राष्ट्रीय लोकशाही आघाडी 2014मध्ये सत्तेत आल्यापासून काँग्रेसवर जोरदार हल्लाबोल करत आहे. मागील काँग्रेसच्या नेतृत्वाखालील संयुक्त पुरोगामी आघाडी सरकारच्या (UPA) कालावधीत कोट्यवधी डॉलरच्या घोटाळे झाल्याचा आरोप भाजपाने केला आहे. आता टूजी स्पेक्ट्रम, कोळसा घोटाळ्यापाठोपाठ आता ऑगस्टा वेस्टलँड हेलिकॉप्टर घोटाळ्याचा मुद्दा भाजपाने एका व्हिडीओमार्फत लोकांसमोर आणला आहे. हा व्हिडीओ भाजपाने ट्वीट केला आहे.
दाल में काला या दाल ही है काली?
आखिर कौन है सिग्नोरा गांधी?
फिर खुलने जा रही है 𝐂𝐨𝐧𝐠𝐫𝐞𝐬𝐬 𝐅𝐢𝐥𝐞𝐬!
देखिए Season 2, कल सुबह 9 बजे से pic.twitter.com/NVfdBq3oqZ
— BJP (@BJP4India) May 9, 2023
सिग्नोरा गांधींचा उल्लेख इटालियन न्यायालयाच्या निकालात किमान चार वेळा करण्यात आला आहे, ज्याने या घोटाळ्यातील सरकारच्या भूमिकेची पुष्टी केली होती. ज्यात भारतीय हवाई दलासमवेतच्या (IAF) करारावर शिक्कामोर्तब करण्याच्या दृष्टीने एका मध्यस्थाला लाच देण्याच्या मुद्द्याचाही समावेश होता. तत्कालीन राष्ट्रपती, पंतप्रधान आणि इतर व्हीव्हीआयपींना उड्डाण करण्यासाठी 3,600 कोटी रुपयांना 12 ऑगस्टा वेस्टलँड एडब्ल्यू101 (AW101) हेलिकॉप्टर खरेदी केली होती.
ज्यांनी या फर्मशी लॉबिंग केले होते, त्यामध्ये काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या सोनिया गांधी आणि पंतप्रधान मनमोहन सिंग यांचा समावेश होता, असा उल्लेख फिनमेकॅनिकाचे चेअरमन ज्युसेप्पे ओरसी यांनी केला होता. ऑगस्टा वेस्टलँडच्या सीईओसह ज्युसेप्पे ओरसी यांना देखील या प्रकरणात अटक करण्यात आली होती.
सन 2024च्या लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपाने ‘काँग्रेस फाइल्स’ ही व्हिडीओ मालिका सुरू केली आहे. तत्कालीन काँग्रेसप्रणित यूपीए सरकारच्या काळातील कथित मोठे “घोटाळे” उघड करण्याच्या दृष्टीने ही मालिका सुरू केली आहे. ‘सिग्नोरा गांधी’चा मुद्दा उचलून धरत, भाजपाने मंगळवारी आपल्या अधिकृत ट्वीटर हँडलवरून ‘सिग्नोरा गांधी कोण आहे?’ असा प्रश्न उपस्थित केला आहे. तसेच काँग्रेस फाइल्सच्या दुसऱ्या भागाची देखील घोषणा केली आहे. हा भाग बुधवारी, 10 मे रोजी सकाळी 9 वाजता जारी करण्यात येणार आहे.