शपथविधी झाला, आता मंत्रिमंडळ विस्ताराकाडे लक्ष; बिहारमध्ये कोण कोण होणार मंत्री?

nitish-kumar-new-cabinet

बिहारमध्ये सत्ताबदल झाला आहे. नितिश कुमार यांनी आठव्यांदा मुख्यंत्री पदाची तर तेजस्वी यादव यांनी दुसऱ्यांदा उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. दरम्यान, आता सर्वांचे लक्ष लागले आहे ते तेथील मंत्रिमंडळ विस्ताराकडे. महाराष्ट्रात तब्बल ३९ दिवसांनी मंत्रिमंडळ विस्तार झाला. मात्र हा छोटेखानी मंत्रिमंडळ विस्तार असून पुन्हा विस्तार होणार असल्याचं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे. तर, खातेवाट अद्यापही झालेले नाही. त्यामुळे बिहारमध्येही मंत्रिमंडळ विस्तारासाठी असाच वेळखाऊपणा होणार की तत्काळ कार्यवाही होणार हे पाहावं लागणार आहे. दरम्यान, बिहारच्या मंत्रिमंडळात राजदच्या नेत्यांना प्रथम स्थान, जदयूच्या नेत्यांना द्वितीय स्थान आणि काँग्रेसला तृतीय स्थान देण्यात येणार आहे. तर, डावे पक्ष सरकारमध्ये सामील होणार की नाही याबाबत अद्यापही खुलासा झालेला नाही.

भाजपसोबच्या युतीत असताना नितीश कुमार यांच्या मंत्रिमंडळात अनेकांना संधी देण्यात आली होती. मात्र, या जुन्या चेहऱ्यांना आता डावलण्यात येणार असल्याची शक्यता आहे. मात्र, नेमकं कोणाला डावलणार हे अद्यापही ठरलेलं नाही. पक्षातील आधीपासूनच सक्रीय असलेल्या आमदाराला मंत्रीपद दिले जाणार आहे. याबाबत मुख्यमंत्री निर्णय घेणार आहेत.

दोन पक्षातील कोणत्या नेत्यांना मंत्रिपद द्यायचं हा निर्णय दिल्लीतून ठरणार आहे. राजदचे प्रमुख लालू प्रसाद आपल्या मंत्र्यांची नावं दिल्लीत बसून ठरवणार आहेत तर, काँग्रेसमधून कोणाला संधी द्यायचा याचा निर्णय सोनिया गांधी घेणार आहेत. दरम्यान, दोन दिवसांत राजदच्या संभाव्य मंत्र्यांची नावे तेजस्वी यादव जाहीर करणार आहेत.

जदयूचे संभाव्य चेहरे- विजय कुमार चौधरी, विजेंद्र प्रसाद यादव, उपेंद्र कुशवाहा, श्रवण कुमार, अशोक चौधरी, संजय झा, लेशी सिंह, जयंत राज

राजदचे संभाव्य मंत्री – तेजप्रताप यादव, आलोक मेहता, भाई वीरेंद्र, चंद्रशेखर कुमार, शमीम अहमद, भारत भूषण मंडल, अनिल सहनी, समीर महासेठ, वीणा देवी, ललित यादव, कार्तिक सिंह, सुनील सिंह, रणविजय साहू आणि अख्तरुल इस्लाम