दसॉल्टने रिलायन्समध्ये गुंतवणूक का केली

राहुल गांधींचा मोदींवर आरोप

rahul gandh

दसॉल्ट या कंपनीने रिलायन्स या बुडत्या कंपनीत २८४ कोटी रुपयांची गुंतवणूक का केली, असा नवा आरोप करत काँग्रेसाध्यक्ष राहुल गांधी यानी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर निशाणा साधला.नवी दिल्लीत पत्रकार परिषदेमध्ये बोलताना राहुल गांधी यांनी राफेल प्रकरणाची माहिती दिली. ते म्हणाले, दसॉल्टचे मुख्य कार्यकारी अधिकारी खोटे बोलत आहेत. रिलायन्सकडे जमीन आहे, म्हणून त्यांच्यासोबत करार करण्यात आला होता, असे दसॉल्टच्या सीईओने म्हटले होते. मात्र, दसॉल्टकडून २८४ कोटी मिळाल्यानंतर रिलायन्सने जमीन घेतली. यावरून सीईओ स्पष्टपणे खोटे बोलत असल्याचे दिसते, असे राहुल यांनी म्हटले आहे.

राफेल प्रकरणामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची झोप उडाली आहे. याची चौकशी झाल्यास पंतप्रधान नरेंद्र मोदी त्यासमोर टिकू शकणार नाही. हा घोटाळा तब्बल ३० हजार कोटींचा आहे. संयुक्त संसदीय समितीद्वारे ते या प्रकरणाची चौकशी करतील, असे वाटत नाही. या सौद्याचा निर्णय केवळ एका व्यक्तीने म्हणजे नरेंद्र मोदी यांनी घेतला आहे. तत्कालीन संरक्षणमंत्री मनोहर पर्रिकर यांची या सौद्यात काहीही भूमिका नाही, असे राहुल गांधी यांनी म्हटले आहे.

जनतेच्या पैशांतूनच ही विमाने विकत घेतली जात आहेत. त्यामुळे त्यांना याच्या किमती समजणे आवश्यक आहे. मात्र भाजप सरकार विमानांच्या किमती सांगायला तयार नाही, असेही राहुल म्हणाले. राफेल प्रकरणात अनिल अंबानी आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यात साटेलोटे झाले असल्याचा आरोप राहुल यांनी केला आहे. तसेच या प्रकरणाची चौकशी करण्यात यावी, अशी मागणीही त्यांनी यावेळी केली आहे. ते पत्रकारांशी बोलत होते.