Manipur Violence : ‘दिसताक्षणी गोळ्या घाला..’, केंद्रीय गृहमंत्री अमित शाहांनी का दिले असे आदेश?

'दिसताक्षणी समाजकंटकांना गोळ्या घाला...', असे टोकाचे आदेश देशाचे गृहमंत्री अमित शाह यांच्याकडून देण्यात आले आहेत. मणिपूर राज्यात उसळलेल्या हिंसाचारामुळे अमित शाह यांनी हे आदेश दिले आहेत.

Why did Union Home Minister Amit Shah give the order 'Shoot bullets immediately

‘दिसताक्षणी समाजकंटकांना गोळ्या घाला…’, असे टोकाचे आदेश देशाचे गृहमंत्री अमित शाह यांच्याकडून देण्यात आले आहेत. मणिपूर राज्यात उसळलेल्या हिंसाचारामुळे अमित शाह यांनी हे आदेश दिले आहेत. गेल्या दोन दिवसांपासून सुरू असलेल्या या हिंसाचारामुळे या राज्यात वातावरण पेटल्याचे दिसून येत आहे. या राज्यातील वाढता हिंसाचार पाहता केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी तातडीची बैठक बोलावून मणिपूरमधील सुरक्षा वाढवली आहे. तर जे समाजकंटक हिंसाचार करताना दिसतील त्यांना दिसताक्षणी गोळ्या घालण्याचे आदेश शाह यांनी जवानांना दिले आहेत.

मणिपूरमधील हिंसाचाराचे नेमके कारण काय?
बुधवारी मणिपूर राज्यातील चुरचंदपूर जिल्ह्यात असलेल्या तोरबांग येथे ऑल ट्रायबल स्टुडंट्स युनियनने ‘आदिवासी एकता मोर्चा’ काढला होता. यानंतर या मोर्चाला हिंसक वळण लागले. या राज्यात असलेल्या मेईतेई समाजाने त्यांचा अनुसूचित जमातीत समावेश करण्यात यावा, अशी मागणी अनेक वर्षांपासून करत आहे. पण राज्य सरकार या संदर्भात ठोस पावले उचलत नसल्याने बुधवारी यासाठी निदर्शने करण्यात आली.

हेही वाचा – Live Update : आज 11 वाजता होणार राष्ट्रवादीच्या निवड समितीची बैठक

मिळालेल्या माहितीनुसार, हा मोर्चा निघाल्यानंतर काही लोकांच्या जमावाने मेईतेई समाजावर शस्त्रांनी हल्ला केला. ज्यानंतर या समाजाने देखील या जमावाला प्रत्युत्तर दिले. ज्याचे रूपांतर हिंसाचारात झाले. ज्यामुळे राज्यातील अनेक भागांत जाळपोळ आणि तोडफोडीच्या घटना घडल्या. ज्यामध्ये मोठ्या प्रमाणात वित्तहानी झालेली आहे. तर यामध्ये अनेकांनी आपला जीव देखील गमावल्याचे सांगण्यात येत आहे. ही घटना अत्यंत दुर्दैवी असल्याचे मत राज्याचे मुख्यमंत्री एन. बिरेन सिंग यांच्याकडून सांगण्यात आले आहे. तसेच हिंसाचार वाढत असल्याने केंद्र सरकारकडून राज्यातील प्रत्येक गोष्टींवर बारीक नजर ठेवण्यात येत आहे.

बुधवारी या मोर्चाला हिंसक वळण लागल्यानंतर मणिपूर सरकारने कर्फ्यू लागू केल्याची घोषणा केली आहे. संपूर्ण राज्यात मोबाइल इंटरनेट सेवा पाच दिवसांसाठी बंद करण्यात आली आहे. परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी भारतीय लष्कर, आसाम रायफल्स, केंद्रीय सशस्त्र पोलीस दल आणि जलद कृती दल यांचा कडक बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. लष्कर आणि आसाम रायफल्सने गुरुवारी हिंसाचार झालेल्या भागात फ्लॅग मार्चही काढला होता.