मुंबई : आगामी लोकसभा निवडणुकीची तयारी सत्ताधारी आणि विरोधकांकडून जोरदार सुरू आहे. पुढील वर्षी निवडणूक अपेक्षित असताना देखील याचा ज्वर आता चढू लागला आहे. यातूनच आरोप-प्रत्यारोपच्या फैरी झडू लागल्या आहेत. याच पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे दोन व्हिडीओ शेअर करत भाजपावर निशाणा साधला आहे. एक व्हिडीओ कर्नाटक निवडणुकीदरम्यानचा आहे तर, दुसरा बुधवारी झालेल्या रक्षाबंधनाच्या कार्यक्रमाचा आहे.
गोरगरीब घरातून आलेली मुलं काटेरी कुंपणाच्या पलीकडे. उच्चभ्रू घरातली मुलं मात्र अंगाखांद्यावर. हा भेदभाव कशासाठी .. pic.twitter.com/NrJQJYV3ry
— Dr.Jitendra Awhad (@Awhadspeaks) August 31, 2023
कर्नाटक विधानसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कलबुर्गी येथे रोड शो केला. पण त्याआधी पंतप्रधान मोदी यांनी रस्त्यालगत उभ्या असलेल्या मुलांची भेट घेतली. पंतप्रधान मोदी यांनी संवाद साधत मुलांसोबत हास्यविनोद केले. या मुलांसोबत ते खेळ खेळले. तसेच त्यांना मोठेपणी कोण व्हायचे आहे, हेही त्यांनी जाणून घेतले. याचा व्हिडीओ त्यावेळी व्हायरल झाला होता.
हेही वाचा – “माझी भूमिका स्पष्ट म्हणून अजित पवारांनी…” रोहित पवारांची स्पष्ट शब्दांत प्रतिक्रिया
तर, काल (बुधवार) रक्षाबंधन सण देशभरात उत्साहाने साजरा करण्यात आला. पंतप्रधान मोदी यांनी राजधानी दिल्लीतील सात, लोककल्याण मार्ग या आपल्या निवासस्थानी लहान मुलींसह रक्षाबंधन साजरा केला. शाळकरी मुलींनी आपल्या सोबत आणलेली राखी पंतप्रधान मोदी यांना बांधली. नरेंद्र मोदी यांनी या लहान मुलीशी संवाद साधला आणि त्यांना आशीर्वाद दिला. यावेळी काही मुलींनी मोदी यांना कविता म्हणून दाखविली. तत्पूर्वी, कार्यक्रमस्थळी नरेंद्र मोदी येताच मुलांनी ‘भारत माता की जय’च्या घोषणा दिल्या. याचाही व्हिडीओ व्हायरल झाला आहे.
हेही वाचा – ‘INDIA’ आघाडी बैठकीच्या पार्श्वभूमीवर शिंदे गटाकडून उद्धव ठाकरेंवर सडकून टीका; म्हणाले…
माजी मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी हे दोन्ही व्हिडीओ शेअर केले आहेत. गोरगरीब घरातून आलेली मुले काटेरी कुंपणाच्या पलीकडे आहेत तर, उच्चभ्रू घरातली मुले मात्र अंगाखांद्यावर… हा भेदभाव कशासाठी? हा प्रश्न त्यांनी उपस्थित केला आहे.