राज्यसभेत नाटू-नाटू गाण्याचे अभिनंदन करताना जया बच्चन का झाल्या नाराज?

नवी दिल्ली : राज्यसभा खासदार जया बच्चन राज्यसभेतील आपल्या स्पष्टवक्ते शैलीमुळे नेहमीच चर्चेत असतात. त्यांचा संताप संसदेतील अनेक खासदारांनी अनुभवला आहे. दरम्यान, आज राज्यसभेत जया बच्चन नाटू-नाटू या गाण्याला ऑस्कर मिळाल्याबद्दल अभिनंदन करत असताना पुन्हा एकदा त्या संतापल्याचे पाहायला मिळाले. वास्तविक, जया बच्चन आज राज्यसभेत भारतीय सिनेमाचे कौतुक करत होत्या आणि त्यावेळी एका खासदाराने त्यांच्या बोलण्यात व्यत्यय आणला. त्यानंतर जया यांनी आपली नाराजी व्यक्त केली.

राज्यसभेतील भाषणादरम्यान व्यत्यय आणल्याबद्दल नाराजी व्यक्त करताना जया बच्चन यांनी एका खासदाराला चांगलेच सुनावले. त्यांनी नीरज, तू नेहमी असेच करतोस का? असे म्हणताना त्या पुढे म्हणाल्या की, बोलताना व्यत्यय आणणे हा आजकाल एक आजार बनत चालला आहे. कोणी सभ्य बोलत असताना उद्धटपणा दाखवू नये, असेही त्या म्हणाल्या. खरे तर, जया बच्चन म्हणाल्या होत्या की, फक्त भारतानेच ऑस्कर जिंकले आहे, उत्तर-दक्षिण असे कोणी नाही.

जया यांनी खासदारावर नाराजी व्यक्त करत आमचाही आवाज आहे, असे म्हणताच सभापती जगदीप धनखर यांनी त्यांना शांत होण्यासाठी म्हटले की, मॅडम तुमचा आवाज भारदस्त आहे आणि ते आम्हाला माहीत आहे.

ऑस्कर मिळाल्याबद्दल राज्यसभेत अभिनंदन
आज राज्यसभेत विविध नेत्यांनी नाटू-नाटू या गाण्यासाठी ऑस्कर जिंकल्याबद्दल आरआरआर टीमचे अभिनंदन केले आहे. खासदारांनी सांगितले की, यामुळे केवळ आरआरआर चित्रपटाचीच नव्हे तर संपूर्ण देशाची ख्याती जगभर पोहचली आहे. त्याचवेळी जया बच्चन यांनी ही भारतीय चित्रपटसृष्टीसाठी मोठी उपलब्धी असल्याचे म्हटले आहे. भारत ही चित्रपटांची सर्वात मोठी बाजारपेठ आहे आणि अमेरिका मागे राहिली असल्याचेही त्या पुढे म्हणाल्या.
जया बच्चन यांनी आरआरआर चित्रपटाच्या दिग्दर्शकाचेही अभिनंदन करत एसएस राजमौली यांचे दिग्दर्शन उत्कृष्ट असल्याचे सांगितले आहे. हा विजय उत्तर-दक्षिणचा नसून संपूर्ण भारताचा आहे, असेही जया बच्चन म्हणाल्या.