तिरुवनंतपुरम : मुसलमान समाजातील काही लोक आजही त्यांच्या समाजात असलेल्या जुन्या नियमांप्रमाणे राहतात. डोक्याच्या केसापासून ते पायाच्या नखांपर्यंत सर्वकाही झाकून ठेवणे, विधवा महिलेने कोणत्याही कार्यक्रमात सहभागी न होणे किंवा अन्य इतर नियमांचे मुसलमान महिला आजही पालन करतात. तर काही ठिकाणी समाजाचे मौलवी त्यांना समाजाचे नियम काटेकोरपणे पाळण्यास भाग पाडतात. असाच काहीसा प्रकार केरळमध्ये उघडकीस आला आहे. एक विधवा मुसलमान महिला तिच्या मुलींसोबत पर्यटनासाठी हिमाचल प्रदेशला गेल्याने याबाबत मौलवीने तीव्र नाराजी व्यक्त केली. ज्यामुळे आता या महिलेला मानसिक धक्का बसला असून ती महिला घराच्या बाहेर पडण्यास घाबरत असल्याचे तिच्या मुलींकडून सांगण्यात आले आहे. (widow has no right to go out for tourism, Maulvi strange fatwa)
नेमके प्रकरण काय?
समोर आलेल्या माहितीनुसार, केरळमध्ये नफीसुम्मा नावाची 55 वर्षीय महिला राहते. ही महिला रोजंदारीवर काम करत असून ती त्या कामाच्या माध्यमातूनच आजवर आपल्या कुटुंबाचे पोट भरत आली. पदरात तीन मुली असलेल्या नफीसुम्माच्या पतीचे 25 वर्षांपूर्वी निधन झाले. तेव्हापासून ती विधवेचे आयुष्य जगत आहे. पण नफीसुम्माला हिमाचल प्रदेशातील मनाली येथे जाऊन बर्फ पाहायचा होता. त्या बर्फाचा तिला आनंद लुटायचा होता. ज्यामुळे तिने 2024 च्या डिसेंबर महिन्यात मुलींसोबत मनालीला सहलीला जाण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार ती आपल्या मुलींसोबत मनालीला जाऊन सुटीचा आनंद घेऊन आली. तर प्रत्येक महिलेने आपले आयुष्य असे जगले पाहिजे, अशा मताचा एक व्हिडीओही तिने या ठिकाणी बनवला.
नफीसुम्मा मनालीला सुटीकरिता गेल्याचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर टाकण्यात आला. एका व्हिडीओमध्ये नफीसुम्मा ही हातात बर्फ घेऊन आपला आनंद व्यक्त करताना पाहायला मिळाली. पण तिचा हाच व्हिडीओ केरळचे मौलवी इब्राहिम सकाफी पुझक्कट्टीरी यांनी पाहिला. त्यांनी या व्हिडीओवर आक्षेप घेत याचा उल्लेख एका कार्यक्रमात केला. या मौलवींनी या व्हिडीओवर आणि नफीसुम्मा यांच्या आनंदावर आक्षेप घेत म्हटले की, कदाचित तुम्ही एखादा व्हिडिओ पाहिला असेल. एक आजी जिच्या नवऱ्याचे 25 वर्षांपूर्वी निधन झाले होते. ती आता दुसऱ्या राज्यात जाऊन बर्फात खेळत आहे. पण खरे तर त्यांनी असे न करता घरातील एका कोपऱ्यात बसून प्रार्थना केली पाहिजे. त्यामुळे त्यांनी जे काही केले ती एक समस्या असल्याचे मत या मौलवीने काढला.
मौलवी इब्राहिम सकाफी पुझक्कट्टीरी यांनी केलेल्या या विधानानंतर 55 वर्षीय नफीसुम्मा यांच्या मुलीने सुद्धा आपले मत व्यक्त केले. त्यांनी प्रसार माध्यमांसमोर म्हटले की, मौलवी यांचे शब्द ऐकून आम्ही दुखावले आहोत. त्यांच्यामुळे आईच्या मनाची शांतता घालवली आहे. ती आता बाहेर सुद्धा जात नाहीये. कारण मौलवींनी केलेल्या भाषणानंतर आमच्या समाजातील लोकांना आईने काहीतरी चुकीचे केल्याचे वाटत आहे. पण एका विधवा महिलेला बाहेर जाऊन जग पाहण्याचा अधिकार नाही का? असा प्रश्न नफीसुम्माच्या मुलींकडून उपस्थित करण्यात आला आहे. परंतु, मौलवीच्या या अजब फतव्यामुळे आता सोशल मीडियावर अनेक मत व्यक्त करण्यात येत आहेत.