नवी दिल्ली : पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी 12 दिवसांच्या दुबई आणि स्पेन दौऱ्यावर आहेत. ममतांनी बुधवारी (ता. 13 सप्टेंबर) श्रीलंकेचे अध्यक्ष रानिल विक्रमसिंघे यांची भेट घेतली आणि त्यांना नोव्हेंबरमध्ये राज्य व्यवसाय शिखर परिषदेसाठी पश्चिम बंगालमध्ये आमंत्रित केले. यावेळी श्रीलंकेच्या राष्ट्रपतींनी ममता यांना विचारले की, ‘तुम्ही भारत आघाडीचे नेतृत्व कराल का?’ यावर ममता यांनी उत्तर देत म्हटले की, जनतेचा पाठिंबा मिळाला तर उद्या नक्कीच सत्तेत येऊ. (Will you lead ‘India’? Mamata Banerjee’s reply to Sri Lankan President’s question)
हेही वाचा – PM Crop Insurance Scheme : कृषी खात्याच्या छाननीत अपात्र अर्ज बाद; कृषीमंत्र्यांची समयसूचकता
मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी या भेटीबाबत माहिती देत सांगितले की, श्रीलंकेचे राष्ट्राध्यक्ष विक्रमसिंघे यांनी त्यांना दुबईतील एअरपोर्ट लाउंजमध्ये पाहिले आणि चर्चा करण्यासाठी बोलावले. त्यांनी मला ओळखले असून थेट चर्चा करण्यासाठी बोलावले आहे हे ऐकून मी भारावून गेले. यानंतर मी त्यांची भेट घेतली. तसेच, त्यांना कोलकाता येथे होणाऱ्या बंगाल ग्लोबल बिझनेस समिट 2023 मध्ये सुद्धा आमंत्रित केले. ममता यांनी सांगितले की, श्रीलंकेच्या राष्ट्रपतींनीही त्यांना त्यांच्या देशाला भेट देण्याचे निमंत्रण दिले. हे एक आनंददायी संभाषण होते, असेही ममता बॅनर्जी यांच्याकडून सांगण्यात आले.
ममता बॅनर्जी काल (ता. 12 सप्टेंबर) मंगळवारी दुबईला पोहोचल्या. त्यानंतर त्यांनी बुधवारी दुबईहून स्पेनला जाणारे विमान पकडले. पश्चिम बंगालमध्ये यावर्षी 21 आणि 22 नोव्हेंबर रोजी बिझनेस समिट होणार आहे. दुबई आणि स्पेन दौऱ्यामधून तिथे होणाऱ्या बिझनेस समिटमध्ये सहभागी होणार असून राज्यात गुंतवणूक आकर्षित करण्यासाठी त्या या बिझनेस समिटमध्ये सहभागी होणार असल्याचे सांगण्यात आले आहे.
“जुडेगा भारत… जितेगा इंडिया”चा नारा देत देशातील 28 पक्ष हे भाजप विरोधात लढा देण्यासाठी एकत्र आले आहेत. विरोधी पक्षांनी एकत्र येऊन ‘इंडिया’ आघाडी स्थापन केली आहे. वास्तविक 2024 च्या लोकसभा निवडणुकीत पंतप्रधान मोदींच्या नेतृत्वाखालील NDA च्या विरोधात विरोधी पक्षांनी एकत्र येऊन ‘इंडिया’ आघाडी स्थापन केली आहे. सुरुवातीला काँग्रेस, टीएमसी, राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना उद्धव गट, आरजेडी, आप, जेडीयू, सीपीआय, सीपीएम, जेएमएमसह 26 पक्ष सहभागी झाले होते. मात्र, नंतर आणखी दोन पक्ष त्यात सामील झाले. मात्र, विरोधी पक्षांच्या या आघाडीत पंतप्रधानपदाच्या उमेदवाराबाबत अद्याप निर्णय झालेला नाही. याबाबत भाजपकडून सातत्याने भारत आघाडीवर निशाणा साधला जात आहे.